लातूर नगरपालिका बरेच वर्ष दुपारी ३ ते रात्री १० अशी चालायची. यालाही एक कारण होतं.

लातूर एकेकाळी मराठवाड्यातलं एक छोटंसं गाव होतं. चालुक्य राजांपासून या गावाचा इतिहास आहे. निजामशाहीवेळी कापूस, उडीद, ज्वारी, भुईमूग, हरभरा यांची ही आडत व्यापारी पेठ एक सरंजामी शहर होतं. मात्र माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीत या गावाचा अक्षरशः कायापालट झाला. रस्ते उड्डाणपूल बनले, गावात महानगरपालिका झाली.

मात्र स्वातंत्र्यानंतर निजामशाहीची छाप हटवून लातूरला आधुनिक बनवणाऱ्यांमध्ये आणखी काही नेत्यांचा हातभार लागला.

यात प्रमुख नाव येतं माणिकराव सोनवणे आणि केशवराव सोनवणे या दोघा भावांचं.

१७ फेब्रुवारी १९५० रोजी लातूरला नगरपंचायत स्थापन झाली, गिरिधारी प्रसाद हे लातूरचे पहिले मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाले. मात्र, प्रत्यक्षात १९५२ मध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि लोकप्रतिनिधी निवडून देण्यात आले.

स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर दादा बाजपेयी हे लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष बनले.

त्यांच्यानंतर त्यांचे सहकारी माणिकराव सोनवणे यांनी हि निवडणूक जिंकली. या नगरपालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे लातूरमध्ये नगरपालिका दुपारी ३ वाजता उघडायची आणि रात्री १० वाजे पर्यंत तीच काम चालायचं. अनेक वर्षांपर्यंत ही आगळीवेगळी प्रथा कायम होती. या प्रथेमागचं कारण देखील गंमतीशीर होतं.

लातूर हे व्यापारी शहर असल्यामुळे नगरपालिकेत काम करणाऱ्या अनेकांची गंजगोलाई येथे दुकाने असायची. खुद्द नगराध्यक्ष माणिकराव सोनावणे यांचं देखील मार्केट यार्डात अडत दुकान होतं. हि सगळी मंडळी दिवसभर आपलं दुकान सांभाळून दुपारी नगरपालिकेत येत आणि ३ वाजता नगरपालिकेचा कारभार सुरु होई. सभेदिवशीही त्यांचा शिरस्ता कायम असायचा. पुढच्या काळात तो जणू पायंडाच पडून गेला.

मूळच्या औसा गावच्या माणिकराव सोनवणे यांनी स्वातंत्र्य लढ्यात, हैदराबाद मुक्तीसंग्रामात काम केलं होतं. त्यांची लातूरमध्ये लोकप्रियता अफाट होती.

त्यांची लोकप्रियता पाहून खुद्द यशवंतराव चव्हाणांनी त्यांना आमदारकीची निवडणूक लढवण्याची विनंती केली होती मात्र माणिकराव सोनावणे यांनी हि ऑफर स्वीकारली नाही. “आपल्याऐवजी मित्र चंद्रशेखर वाजपेयी यांना उमेदवारी द्या “, असे सांगितले.

यशवंतरावांनी “आम्ही सोनवणेच्या घरात तिकीट द्यायचे ठरवले आहे “, असे म्हटल्यावर माणिकरावांनी नुकतेच वकील झालेल्या धाकटे बंधू केशवरावांचे नाव सुचवले.

संयुक्त महाराष्ट्राच्या काँग्रेस विरोधी लाटेतही केशवराव सोनवणे १९५७ साली सहज निवडून आले. तिथून पुढे तब्बल ४ वेळा त्यांनी आमदारकी जिंकली.

माणिकराव व केशवराव सोनावणे या दोघांनी लातूरमध्ये सहकारी चळवळ रुजवली. कै. वैकुंठभाई मेहता, कै. धनंजय गाडगीळ यांच्यासारख्या दिग्गजांकडून ‘सहकार महर्षी’ म्हणून त्यांचा गौरव झाला.

केशवराव सोनवणे यांची तर यशवंतराव चव्हाणांनी सहकार मंत्री म्हणून नियुक्ती केली होती.

यशवंतरराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत केशवराव सोनवणे यांनी सहकार मंत्रालयाची अवघड जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. त्यांच्याच काळात आशिया खंडातील सहकार तत्त्वावरील पहिली तेल गिरणी (डालडा फॅक्टरी) लातूर येथे उभी राहीली. डालडा फॅक्टरी व जवाहर सूतगिरणीची उभारणी करून केशवरावांनी महाराष्ट्राची किर्ती साता समुद्रापार पोहचवली.

त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान पाहून, व महाराष्ट्राचे आद्य सहकार चळवळीचे नेते म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा यशवंतराव चव्हाण यांनी गौरव केला होता.

लातूर येथे शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, तेरणा सहकारी साखर कारखाना, उदगीरची दुध डेअरी, जिल्हा बॅंक यांची स्थापना करून सहकारी चळवळीला गती दिलीच पण शहराचे रूप पालटून टाकले. जिल्ह्यासह महाराष्ट्रात सहकाराची सुरुवात करणाऱ्या त्यांनीमात्र कुठल्याही संस्थेवर स्वतः न राहता ती उत्तमरीत्या चालवून दाखवली.

लातुरात आज उभी असलेली सातमजली बॅंकेची इमारतसुद्धा केशवराव सोनवणे यांच्याच काळात उभी राहिली.

लातूरला मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतो. दयानंद शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या केशवराव सोनवणे यांचा यात सिंहाचा वाटा आहे.

लातूरची नगरपालिका एक सक्षम प्रशासकीय यंत्रणा म्हणून कायम कार्यरत राहिली याच श्रेय केशवराव सोनवणे यांना जाते . संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श नगरपरिषद म्हणून लातूरला ओळखले गेले. पुढे देशाचे गृहमंत्री बनलेले शिवराज पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असे अनेक नेते सोनवणे यांच्या कारकिर्दीत लातूरमध्ये उदयास आले. 

विलासराव देशमुख यांनी लातूरला स्वतंत्र  जिल्हा बनवलं. त्यांच्याच प्रयत्नातून लातूरच्या नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Laturkar says

    केशवराव सोनवणे साहेबांच लातूरच्या जडणघडणीत , विकासात फार मोठ योगदान आहे. त्यांनी अतीशय निस्वार्थपणे लातूरच्या जनतेची सेवा केली. त्यांना आद्य लातूरचे शिल्पकार असे संबोधल्यास वावगे ठरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.