फक्त लातूर पॅटर्नच नाही हे अख्खं गाव त्याच्यापेक्षाही भारीय पिल्लू!

लातूर म्हटलं की लक्षात राहत ते त्या अभ्यासाच्या लातूर पॅटर्न, विलासराव देशमुख यांच्यामुळे. पण लातूर आणि लातूरकरांचा इतिहास लै मोठ्ठाय.

निजामशाहीच्या काळात लातूर उस्मानाबाद जिल्ह्याच्या ११ तालुक्यांपैकी एक होता. १९८२ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन झालं आणि लातूर हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. लातूरला जिल्ह्याचा दर्जा नव्हता तेव्हा ही त्याची ख्याती व्यापारी पेठ म्हणून होती.

लातूरचे मूळ रहिवासी कोण होते याची माहिती घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा कळलं की आधीच्या पिढीत यल्लम, मारवाडी जैम, लाड आणि मराठे हे लोक होते. ब्राह्मण ही थोड्याफार प्रमाणात होते. नंतर लिंगायत आले, धनगर आले, तसेच रंगारी, भावसार, गुजराती आले. या सगळ्याच्या भरीला जिल्ह्याला लागून कर्नाटकची बॉर्डर असल्याने तिथल्या कानडीचा हेल ही सोबतीला आला.

लिंगायत समाजाला दोन्ही भाषा येत असल्याने उदगीर, औसा, निलंगा तालुक्यात टिपिकल कानडी हेल काढून मराठी बोलणारे जास्त आहेत. तिथे तिथे त्यांनी त्यांनी आपल्या भाषेची स्टाईल फेमस करून टाकल्यानं समदे मग तेच बोलू लागले बघा. हा भाग मुळात हैदराबाद स्टेटचा असल्यानं यांच्या मराठीत आधीपासूनच खुप हिंदी उर्दू शब्द होते.

त्यामुळे लातूरकरांच्या भाषेचा हेल बघावाच लागतोय.

लातूर हा मूळचा उस्मानाबादचा भाग असल्यानं या दोघांच्या जगण्यावागण्यात फार मोठा फरक नाही. संस्कृती आणि बोलीभाषा ही तीच. एखादं वाक्य बोलताना थोडा थोडा ब्रेक लागल्यासारखा आवाजात चढउतार करत येणारा टिपिकल मारवाडी हेल ही तोच.

म्हणजे बघा हं ‘काय करतोस रे’ हे वाक्य ‘काय करू लल्ला रे’ ‘जेवलास का?’ हे वाक्य ‘जेवलाव काय रे’ अशी यांची ढब. शिव्यांचा हेल पण तसाच.

लातूरकडे ग्रामीण भागात साधा बोलायची जणू पद्धतच नाही. वाक्यात एखादी तरी शिवी हासडल्याशिवाय भाषा भारदस्त होत नाही अशी काहीतरी धारणा या लोकांची असावी. त्यामुळे “च्यायला च्यायला” हे शब्द अगदी रुटीन झालेत.

उर्दू भाषेतील अनेक शिव्याही लोकांच्या तोंडी सहजतेने येतात. आपण काही अश्लील बोलतो याची लोकांना गंधवार्ताही नसते. बायकांच्या भांडणात बोडके हे शब्द सर्रास असतात. निजामशाही संपून जमाना झाला असला तरी या भागात भाषेत त्याचा प्रभाव अजूनही टिकून आहे. यांच्या बोलण्यात हिंदी उर्दू तले इतके शब्द असतात की त्यांना हीच भाषा ओरिजनल मराठी आहे असं वाटू लागतं. जसं की,

‘औंदा लई बारिष झाली’ ‘मी लय परेशान झालो’ असं बोलायला त्यांना काहीच वेगळं वाटत नाही. एखाद्या गोष्टीची तीव्रता व्यक्त करण्यासाठी ‘लई’ हा शब्द त्यांना ‘काफी’ वाटतो.

आता लातूरची खास वैशिष्ट्य कोणती असं विचाराल तर इथली खाद्यसंस्कृती, इथली कुस्तीची परंपरा, इथल्या गावांमधले गढीवाडे आणि इथला फेमस लातूर पॅटर्न.

इथल्या खाद्यसंस्कृतीचा बघायला गेलं, तर इकडे फारसा भाजीपाला पिकत नसल्याने जेवणात भाजी असलीच पाहिजे असा काही आग्रह नसतो. पिठलं, रस्सा भाजी, भरपूर रस्सा असलं म्हणजे त्यात भात कुस्करून खायला गडी मोकळा असतो. तूर डाळ, मूग डाळ यांचा भरपूर कांदा घालून केलेला डाळकांदा किंवा कांदवनी, भरपूर तिखट शेंगदाण्याची, कारळ्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा याच्यावर यांचे भागतं.

लातूरचे किसान हलवायाचे पेढे उस्मानाबादचा दुर्बिणीच्या गुलाबजाम इतकेच फेमस आहेत. उजनीची बासुंदी तशीच फेमस. लातुरात पापामियाँचे एक छोट हॉटेल होतं. मुस्लिम पद्धतीच मटन, चिकन ही त्यांची स्पेशालिटी. लोक रांगा लावून जेवायचे. कालांतराने त्यांच्यात फूट पडली आणि एकाची दोन हॉटेल झाली. शिवाय लातुरात जशी मोठी हॉटेल होऊ लागली तसे त्यांचे प्रस्थ मात्र कमी होत गेलं.

लातूरचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कुस्ती…

कोल्हापुरातच नाहीतर लातूरातही कुस्तीची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत. कुस्ती मातीतली असो की मॅटवरची. लातूरचे मल्ल यात मागे नाहीत. कुस्तीला आजही मोठा लोकाश्रय आहे. १९६९ सालचे महाराष्ट्र केसरी असलेले व नंतर ‘रुस्तम-ए-हिंद’ झालेले निलंगा तालुक्यातील रामसिंग आणि मुदरगडचे हरिश्चंद्र बिराजदार आजच्या महाराष्ट्राला माहीत आहेत. काका पवार, गोविंद पवार आप्पासाहेब सगरे हे सगळे नामांकित मल्ल इथलेच.

तिसर वैशिष्ट गढीवाड्यांचा…

लातुरात ग्रामीण भागात आजही गढी चांगल्या स्थितीत दिसतात. गढी म्हणजे लहान आकाराचा भुईकोट किंवा मातीचा किल्ला. पूर्वीच्या काळी देशमुख देशपांडे पाटील हे अधिकारी स्वतःसाठी अशा गढ्या बांधायचे.

मोठ प्रवेशद्वार, पायऱ्या आणि मग मुख्यदालन ते ढाळज, कोठारं अशी प्रत्येक गढीची रचना असायची. साधारणपणे गावाच्या पश्चिमेला या गढ्या असायच्या. लातुरात दगड धोंडे मातीची कमतरता नव्हती, त्यामुळे गढ्या वाढतच गेल्या. त्यांच्या भिंतीची रुंदी वाढायला लागली. त्यामुळे १९९३ साली झालेल्या भूकंपात किल्लारी आणि औसा तालुक्यातील अशी बांधकाम कोसळून साधारण वीस हजार लोक मृत्युमुखी पडले. आताच्या काळात गढ्या ही गेल्या आणि वाढे ही गेले. छोटी-छोटी घर बांधण्याची पद्धत सुरू झाली.

लातूरचा चौथ वैशिष्ट्य म्हणजे इथला लातूर पॅटर्न !

गेल्या काही वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर आज लातूर शिक्षण पंढरी म्हणून नावारूपास आले. शिक्षणातला लातूर पॅटर्न सर्वदूर प्रसिद्ध झालाय. १९७० च्या दशकापर्यंत संपूर्ण मराठवाड्यातले विद्यार्थी स्पर्धेच्या युगात बरेच मागे होते. हे चित्र पाहून बहुजन समाजातील काही ध्येयवादी व्यक्तींनी लातूर इथं शिवछत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना केली. राजर्षी शाहू विद्यालय स्थापन करण्यात आलं.

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगले नियम तयार करण्यात आले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अथक प्रयत्नांमुळे शिक्षणातील एक अनोखा आकृतिबंध निर्माण करण्यात आला. त्यातून लातूर पॅटर्न तयार झाला. पूर्वीच्या काळी इथं १२ हायस्कूल होती. मात्र आता गणती करता येणार नाही एवढी हायस्कूल कॉलेज जागोजागी दिसून येतात. लातुरात कोणता कोर्स उपलब्ध नाही असं नाही.

सगळ्या विषयांची सगळ्या प्रकारची सर्व फॅकल्टीची कॉलेज इथं आहेत. जवळपास ३० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी इथं बाहेरगावाहून येतात. ही क्रेझ महाराष्ट्रात एवढी पसरली आहे की पुण्या-मुंबईसह अनेक ठिकाणी लातूर पॅटर्न प्रमाणे शिक्षण दिले जाते.

आता विषय आहे पिल्लुचा. इथले पॅटर्न जसे फेमस आहेत ना तसंच इथला पिल्लू शब्द पण फेमस आहे. कारण हे लातूर आहे पिल्लू!

Leave A Reply

Your email address will not be published.