त्या दिवशी पासून सह्याद्रीवर लॉरेल आणि हार्डी मराठीत भांडू लागले.
आमच्याकडं लहानपणी केबल नव्हतं. म्हणजे काही दिवस होत पण ते काढून टाकण्यात आलं. वडील हेडमास्तर. त्यामुळे जागतिकीकरणाची फळ आम्हाला उशिरा खायला मिळायची.
झी, सोनी सारखे चॅनल धुमाकूळ घालत असताना आम्ही रविवारी ४ वाजताचा मराठी पिक्चर, शुक्रवार रात्रीचा हिंदी पिक्चर याची आठवडाभर वाट बघायचो. इंग्लिश सिनेमाचा, सिरीयलचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता. नेहमी दोस्त मंडळी डिस्नेच्या, स्मॉल वंडरच्या विकी रोबॉटच्या चर्चा करायचे आणि आम्ही मन लावून ते ऐकायचो.
अशातच एक दिवस बातमी आली की लॉरेल आणि हार्डीचे सिनेमे सह्याद्री वर लागणार आहे.
आता हे लॉरेल आणि हार्डी नेमक काय प्रकरण आहे आम्हाला ठाऊक नव्हत आणि इंग्लिश काय समजणार म्हणून काय बघायचं असं वाटलं. पण ही एक जाड्या रड्याची जोडगोळी आहे ते चार्ली चॅप्लीनसारखी कॉमेडी करतात असं कळाल्यावर बघूया तरी म्हणून शनिवारी संध्याकाळी टीव्ही समोर जाऊन बसलो.
लॉरेल म्हणजे रड्या आणि हार्डी म्हणजे जाड्या टीव्हीवर अवतरले. विशेष म्हणजे दोघे मराठीमध्ये बोलत होते. डीडी सह्याद्रीने हे सिनेमे मराठीत डबिंग करून आणले होते. विदर्भ मराठवाड्यापासून कोकणातल्या वाड्यावस्तीपर्यंत समस्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ही जागतिक दर्जाची कॉमेडी पोहचली.
कधी नव्हे ते सोमवारी आम्ही वर्गात गेल्यावर आमच्या टीव्हीवर गंमती सांगितल्या. सगळे पुढच्या शनिवारी आपल्या टीव्हीवर दूरदर्शन कोणत्या चॅनलवर लागते हे शोधू लागले. सह्याद्रीने तेव्हा त्यांचा हायेस्ट टीआरपी अनुभवला असेल.
पिक्चर जबरदस्त होते. लॉरेल थोडा बावळट असतो आणि हार्डी सुद्धा बावळटचं असतो पण त्याला वाटत असते आपण लॉरेलपेक्षा स्मार्ट आहे. ही दोघे कुठेही जातील तिथे गोंधळ घालून ठेवत असतात. कधी ते जेल मधले कैदी असतात तर कधी डिटेक्टीव्ह तर कधी महायुद्धात लढणारे सैनिक. त्यांच्या निरागस वागण्याने ते काही ना काही गोंधळ घालून ठेवतात आणि त्यातून बाहेर पडण्याच्या नादात आणखी जास्त राडा होऊन जातो.
मराठी डबिंग मध्ये हार्डीचे डायलॉग आणखीन धमाल उडवून द्यायचे.” काय हा तू घातला आहेस गोंधळ?.”
लॉरेलकडे पाहिल्यावर चार्लीची आठवण येते. जगात पहिला स्पाईक हेअरस्टाईल त्याची असेल.
त्याचे टोपी खालचे केस नेहमी उभे असतात. कायम काही झालं की त्याची टोपी उडत असते. त्याला जोक सुद्धा उशिरा कळत असतात. टोपी काढून २ मिनिट आपले स्पाईकवाले केस खाजवल्यावर त्याच्या डोक्यात ट्यूब पेटत असते. जाड्या हार्डीचा पारा तोपर्यंत चढतो आणि तोच त्याच्या डोक्यावर एक ठोसा देतो.
नेहमी या दोघाची कुत्र्या मांजराप्रमाणे भांडणे होत असतात याचा शेवट लॉरेलच्या रडण्याने होत असते. पण त्यांची मैत्री सुद्धा अतूट असते. हार्डी आणि लॉरेल ही नावे कधी वेगळी करताच येत नाही. कधी जंगली अस्वल तर कधी पोलीस त्यांच्या मागे लागतात पण हार्डी स्वतः बरोबर लॉरेलच जीव वाचवायला विसरत नाही.
जास्तीतजास्त अर्धा तासाचे हे सिनेमे असायचे. कधी ब्लॅक अड व्हाईट तर कधी कलर. स्लॅपस्टिक कॉमेडी हा त्यांचा जॉनर होता पण कधी कंबरे खालचे विनोद करायचा मोह त्यांनी टाळला.
लॉरेल आणि हार्डीचे खरे नाव सुद्धा स्टॅन लॉरेल आणि ऑलिव्हर हार्डी असेच होते. लॉरेलचा जन्म इंग्लंड मध्ये झाला तर हार्डी अमेरिकेतच जन्मला आणि वाढला. स्टॅनचे आई वडील हे नाटकात काम करायचे. त्यांचे बघून लॉरेल अभिनय क्षेत्रात आला. चार्ली चप्लीन जिथे काम करायचा त्या फ्रेड कार्नोच्या म्युजिक पथकात तो जॉईन झाला.
फ्रेड कार्नोने त्याच्यातले गुण ओळखून त्याला पुढचा चार्ली बनवण्यासाठी चार्लीचा अंडरस्टडी म्हनून ठेवले. त्यानंतर तो हॉलीवूडला आला. सिनेमात काम करू लागला, स्क्रिप्ट लिहू लागला पण म्हणावं तस यश त्याला नव्हत.
इकडे हार्डीला तर अभिनयाचे कोणतेच बॅकग्राउंड नव्हते. वडील लष्करात होते पण ते त्याच्या जन्मानंतर एका वर्षातच वारले. हार्डीच्या आईने मुलाला शिस्त लागावी म्हणून बोर्डिंग मध्ये ठेवलं. पण हार्डी तिथून पळून गेला. त्याने एक थिएटर ग्रुप पकडला. तिथे पडेल ते काम करू लागला, गाण गाऊ लागला. कबरेमध्ये काम करु लागला. असे करता करता त्याला अखेर चित्रपटात काम मिळाले.
१९२१साली रिलीज झालेल्या द लकी डॉग नावाच्या सिनेमाच्या सेटवर त्याची आणि लॉरेलची पहिल्यांदा भेट झाली. तिथेच दोघांची मैत्री जमली. पण त्यांनी टीम म्हणून आपले सिनेमे बनवण्यासाठी १९२६ हे साल उजाडावं लागलं.
हाल रोच नावाच्या लेखक दिग्दर्शक निर्मात्याने त्यांना द डक सूप नावाच्या सिनेमासाठी त्यांना एकत्र आणलं आणि इतिहास घडवला.
लॉरेल हार्डी यांनी जवळपास तीन दशक तब्बल १०७ सिनेमामध्ये काम केलं. अख्या जगाला आपल्या कॉमेडीने वेड लावून सोडलं. चार्ली चप्लीनचे खऱ्या अर्थाने ते वारसदार होते. द म्युजिक बॉक्स नावाच्या त्यांच्या सिनेमाला ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला. युरोपमध्ये त्यांचे स्टेज शो देखील भरपूर गाजले.
युटोपिया या त्यांच्या शेवटच्या सिनेमावेळी दोघानाही आजारांनी गाठले. आधी स्टॅन लॉरेलला हृदय विकाराचा झटका आला पण ते त्यात वाचले. मात्र त्याच्या पाठोपाठ काही दिवसांनी हार्डीला सुद्धा हार्ट अटॅक आला, त्यात त्यांचे निधन झाले. लॉरेल आणि हार्डी जोडीपैकी लॉरेल हा एकटाच उरला. त्याला हार्डीचं अंत्यदर्शन सुद्धा घेता आलं नाही.
तेव्हापासून त्याने चित्रपटात काम करायचं बंद केलं. हार्डीशिवाय सिनेमा हा विचार सुद्धा तो करायचा नाही. त्यांना ऑस्करचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. शेवटच्या दिवसात ते लॉरेल आणि हार्डी सिनेमाचे स्क्रिप्ट लिहित बसायचे आणि कोणी विचारलं की आता ऑलि नाही आता का लिहिताय ही स्क्रिप्ट? तर भरलेल्या डोळ्यांनी म्हणायचे ,
“मला एवढचं सुचत , मी तरी काय करू?”
या दोन्ही विनोदवीरावर त्यांच्या दोस्तीवर एक सिनेमा आला होता. बघायचं धाडस झालं नाही. जुन्या आठवणी अशाच कप्प्यामध्ये राहिलेल्या चांगल्या असतात.
हे ही वाच भिडू.
Please तुमच्याकडे लौरेल आणि हार्डी चे मराठी डब्बिंग केलेले विडिओ आहेत का मला लिंक शेअर करा