आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी जंगली हत्तींचा कळप त्याच्या अंगणात दाखल झाला.

मार्च २०१२. आफ्रिकेतल्या झुलुलँड येथील थुला थुला गेम अभयारण्य.

तिथल्या लॉरेन्स अँथनी या सुप्रसिद्ध वनप्राणीअभ्यासकाच नुकतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. लॉरेन्सला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याचा मित्रपरिवार, नातेवाईक जमले होते.

अचानक बाहेर धडधड पावलांचा आवाज येऊ लागला. लॉरेन्स यांच्या पत्नीने दार उघडून पाहिलं.

त्यांच्या अंगणात जंगली हत्तींचा कळप उभा होता.

जवळपास ३१ हत्ती होते. दोन हत्तीणी या कळपाच नेतृत्व करीत होत्या. हा हत्तींचा कळपदेखील लॉरेन्स यांना मानवंदना देण्यासाठी अनेक मैलांचा प्रवास करून आला होता.

काही वर्षांपूर्वी लॉरेन्सने या हत्तीची सुटका व पुनर्वसन केलं होतं. आपल्या मित्राच्या ओढीने हे जंगली हत्ती तिथे जमा झाले होते.

जवळपास दोन दिवस हा कळप लॉरेन्सच्या अंगणात काहीही न खाता पिता बसून राहिला.

हे विलक्षण दृश्य तिथं जमलेल्या प्रत्येकाचं उर भरून आले. पण अनेक प्रश्न होते, या हत्तींना लॉरेन्सच्या मृत्यूचं कस काय कळाल?, लॉरेन्सच्या घराचं ठिकाण त्यांना कुठून कळले? लॉरेन्सचे उपकार त्या हत्तींच्या कस काय लक्षात राहील होतं?

या प्रश्नांची उत्तरे अजूनही सापडलेली नाहीत.

लॉरेन्स अँथनी मूळचा जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेचा. वडिलांच्या इन्श्युरन्स कंपनीच्या बिजनेसमुळे आफ्रिकेतल्या अनेक देशांमध्ये त्याच लहानपण गेलं. वन्यप्राण्यांच्या आयुष्याशी ओळख झाली.

शिक्षण झाल्यावर तो देखील इन्श्युरन्स सेक्टरमध्येच आला. नोकरीच्या निमित्ताने झुलू जमातीच्या लोकांशी त्याचा संबंध आला. त्यांच्याशी त्याची मैत्री झाली.

पूर्वापार चालत आलेलं वन्यजीवांच ज्ञान त्यांनी लॉरेन्सला दिलं.

लॉरेन्स जंगलातल्या या दोस्तांच्या नादाने झपाटून गेला. त्याला हत्तीची भाषा समजू लागली. त्याने इन्शुरन्सची नोकरी सोडून थुला थुला येथे 5000 एकरांचं जंगल विकत घेतलं आणि वन्यजीव संरक्षणाच काम हाती घेतल.

एकदा काही रानटी हत्ती आपल्या जंगलातुन चुकून नागरी वस्तीमध्ये शिरले होते. गोंधळलेल्या या हत्तींनी मोठा उच्छाद सुरू केला होता. या हत्तींना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश सुटले होते. पण कोणी तरी लॉरेन्स अँथनीला बोलावलं.

लॉरेन्सने हत्तींच्या भाषेत त्यांना खाणाखुणा केल्या, आवाज काढले. हत्तींनाही ते समजले. त्याच्याच प्रयत्नातून हत्ती परत आपल्या जंगलात सुखरूप जाऊ शकले.

याच घटनेपासून लॉरेन्स ची ओळख एलिफंट व्हीस्परर अशी निर्माण झाली.

२००३ साली इराकवर अमेरिकेने हल्ला चढवला होता. अनेक दिवस तिथल्या राजधानीवर म्हणजेच बगदादवर अमेरिकन विमानांनी बॉम्बचा वर्षाव केला. यात हजारो माणसे मृत्युमुखी पडली मात्र सोबतच बगदाद झु मध्ये असणाऱ्या अनेक प्राण्यांचा देखील मृत्यू झाला.

७०० पैकी फक्त ३५ प्राणी जिवंत वाचू शकले मात्र अन्नपाण्याविना ते आणखी किती दिवस सर्वाईव्ह करू शकतील याची शक्यता कमी होती.

मात्र त्यांना जगवण्याची जबाबदारी लॉरेन्स अँथनीने उचलली.

युद्धाच्या धामधुमीत तो इराकला पोहचला. तिथे त्याने प्रचंड कष्ट घेतले. त्याची तळमळ बघून इराकी नागरिक, झुचे व्यवस्थापन यांच्याबरोबरच अमेरिकन सैनिकांनीही मदत पुढे केली.

बगदादच्या झु मधील वाघाच्या बछड्यांपासून गेंड्यापर्यंत अनेक प्राण्यांना वाचवण्यात यश आले.

त्याच वर्षी लॉरेन्सने द अर्थ ऑर्गनायझेशन नावाची संस्था स्थापन केली.

त्याच्या प्रयत्नातून झुलुलँडमध्ये आणखी दोन अभयारण्याची निर्मिती झाली. फक्त वन्यप्राणीच नाही तर आफ्रिकेतल्या जंगलात राहणाऱ्या अनेक आदिवासी जमाती यांना रक्षणासाठी, त्यांच्या पारंपरिक जमिनीचं संवर्धन करण्यासाठी लॉरेन्सने केलेल कार्य अतुलनीय आहे.

लॉरेन्सने केलेल हत्तींच्या संदर्भात केलेलं कार्य , तेव्हाचे अनुभव त्याने आपल्या एलिफंट व्हीस्परर या पुस्तकात लिहून ठेवलेले आहेत.

हत्तींनाही भावभावना आहेत, हा बुद्धिमान प्राणी मानवी हस्तक्षेपामुळे संकटात सापडला आहे असे लॉरेन्स यांचे निरीक्षण होते.

हत्तीसखा लॉरेन्स अँथनी हा जिवंतपणीच एक दंत कथा बनला होता.

या हत्तींच्या मित्राचे २ मार्च २०१२ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन तिथल्या विद्यापीठाने मरणोत्तर डॉक्टरेट प्रदान केला.

त्याच्या मृत्यूवेळी भेटायला आलेल्या हत्तींची माहिती लॉरेन्सच्या मुलांनी एका मुलाखतीत सांगितली व ती न्यूयॉर्क टाईम्समध्ये ही छापून आली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.