बिष्णोई गॅंगला सलमानला मारायचं होतं; प्लॅन फसला, आता मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतलीये

रविवार संध्याकाळपासून सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे पंजाबी गायक हिपहॉप, स्टार सिद्धू मुसेवालाची हत्या. प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर ‘हे कुणी केलं असेल?’ याच्या वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. तपासाला नुकतीस सुरुवात झाली असावी…

आणि तेवढ्यात एका फेसबुक पोस्टनं सगळेच जण हादरले. ही पोस्ट सिद्धू मुसेवालाबद्दलच होती, पण पोस्ट पडली कॅनडामधून. पोस्ट करणाऱ्यानं पहिल्या वाक्यात सगळ्यांना नमस्कार केला आणि दुसऱ्या वाक्यात,

आपण सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेत असल्याचं सांगितलं.

ही पोस्ट होती गोल्डी ब्रारची. आणखी स्पष्ट सांगायचं झालं, तर गँगस्टर गोल्डी ब्रारची.

त्यानं आपल्या पोस्टमध्ये सांगितलं, की ‘मी गोल्डी ब्रार, सचिन बिष्णोई धत्तरनवाली आणि लॉरेन्स बिष्णोई ग्रुप या हत्येची जबाबदारी घेतोय. आमच्या भावाच्या खुनाचा बदला आम्ही मुसेवालाच्या खुनानं घेतला. आम्ही जयपूरवरुन मुसेवालाला फोन करुन सांगितलं होतं, की त्यानं जे केलं ते चुकीचं होतं. त्यानं मला सांगितलं की मला त्याची पर्वा नाहीये. मी माझी हत्यारं लोड करुन ठेवलीयेत, म्हणून आम्ही बदल घेतला. पण ही तर फक्त सुरुवात आहे, जे कुणी आमच्या भावाच्या हत्येमध्ये सामील होते त्यांनी सतर्क रहा.’

हत्या झाली भारतात, पोस्ट लिहून हत्येची जबाबदारी घेणारा गँगस्टरही भारतीयच, पण कॅनडामध्ये स्थायिक.

कॅनडात बसून भारतातली सूत्रं हलवणारा हा गोल्डी ब्रार आहे कोण हे पाहुयात…

याचं खरं नाव सतींदर सिंग. हा स्थायिक कॅनडामध्ये असला, तरी भारतातल्या काही केसेसमध्ये गोल्डी ‘वॉन्टेड’ आहे. २०२१ मध्ये फरीदकोटला जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष गुरलाल सिंग पैलवान याची हत्या झाली होती. या हत्येच्या तपासात संशयाची सुई गोल्डीकडे वळली, दिल्ली पोलिसांनी त्याच्या एका नातेवाईकालाही अटक केली होती. या मागचं कारण सांगण्यात आलं होतं, की गुर्लाल ब्रार नावाच्या गोल्डीच्या चुलतभावाच्या हत्येचा बदला म्हणून गुर्लाल पैलवानचा खून करण्यात आला.

सध्या मुसेवालाच्या केसमध्येही बदल्याची भाषा बोलली जातीये, हा बदला ‘विक्की मिद्दुखेडा’चा असल्याचं सांगण्यात येतंय.

हा विक्की मिद्दुखेडा कोण होता ?

याचं खरं नाव विक्रमजीत सिंह मिद्दुखेडा. याचं पॉलिटिकल कनेक्शन होतं, अकाली दलाशी. तो अकाली दलाचा युवा नेता होता. २०२१ च्या ऑगस्ट महिन्यात भर दिवसा त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यात नाव पुढं आलं शगन प्रीतचं. आता हा शगन प्रीत म्हणजे मुसेवालाचा मॅनेजर. त्यामुळं साहजिकच मुसेवाला रडारवर आला, हा रडार होता… लॉरेन्स बिष्णोई गॅंगचा.

लॉरेन्स बिष्णोई, मुसेवालाच्या मर्डरमधलं आणखी एक नाव

हे या प्रकरणातलं सगळ्यात डेंजर नाव. कारण मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेणारी गॅंगच याच्या नावावर चालवली जाते. लॉरेन्सचं नाव चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१७ मध्ये एका प्रकरणात लॉरेन्सला अटक झाली आणि त्याची रवानगी राजस्थानच्या जेलमध्ये झाली.

२०१८ मध्ये मात्र त्याच्या नावाची चर्चा सगळ्या देशात झाली, कारण पोलिसांनी त्याच्या एका साथीदाराला अटक केली आणि कबुली देताना त्यानं सांगितलं, ‘की त्याचा प्लॅन बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा मर्डर करायचा होता. तसं त्याला लॉरेन्सनं सांगितलं होतं.’

२९ वर्षाचा असेपर्यंत लॉरेन्सची किमान ५० वेळा जेल एंट्री झाली होती. दिल्ली-एनसीआर, राजस्थान, पंजाब, हरियाणा अशा राज्यात ५०० शूटर्स असण्यापर्यंत लॉरेन्सचं जाळं पसरलंय, असं सांगण्यात येतं.  

माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार लॉरेन्स सध्या तिहार जेलमध्ये आहे आणि त्याच्यावर केसेस सुरू आहेत, खुनाचा प्रयत्न, चोरी, हल्ला अशा.

नाव गुन्हेगारी विश्वातलं असलं, तरी लॉरेन्सचा जन्म सुखवस्तू घरात झाला. त्याच शिक्षणही चंदिगढच्या चांगल्या कॉलेजमध्ये झालं. पंजाब युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट असोसिएशनचा तो अध्यक्षही होता. तिथं एका इलेक्शनमध्ये तो हरला आणि गुन्हेगारीकडे वळला असंही सांगितलं जातं. मोठे राडे करुन त्याच्या नावाची जितकी चर्चा झाली नाही, तितकी झाली ती सलमानची हत्या करण्याच्या प्लॅनची.

पण लॉरेन्स बिष्णोई आणि त्याच्या गॅंगला सलमानला का मारायचं होतं..?

तर त्यांना बदला घ्यायचा होता, पण माणसांच्या नाही तर काळवीटांच्या हत्येचा. सलमानचं गाजलेलं काळवीट हत्या प्रकरण त्यांच्या डोक्यात होतं. बिष्णोई समाजात काळवीटांना पवित्र आणि आपलं मानलं जातं. त्याच्याच बदल्याची कहाणी लॉरेन्स बिष्णोई गॅंग खुनानं लिहिणार होती…

सलमान बाबतचा त्यांचा प्लॅन फसला खरा, पण मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी याच लॉरेन्स बिष्णोई गॅंगनं घेतलीये. पंजाब पोलिसांनी गोल्डी ब्रार, बिष्णोई गॅंग आणि सिद्धू मुसेवालाची हत्या यांच्या कनेक्शन बाबत अजूनही काही सांगितलेलं नाही. पण त्यांनी चार जणांना अटक केलीये. त्यांच्याकडे तपास करताना कदाचित यांचीच नावं पुढे येतील, किंवा वेगळंच काही पुढे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.