कर्मचारी कपातीमुळे अमेरिकेतल्या भारतीयांचे तिकडे राहायचे पण वांदे झालेत…

२०२२ मध्ये अनेक टेक कंपन्यांकडून कर्मचारी कपात करण्यात आली. ही कर्मचारी कपात आता २०२३ मध्येही सुरूच आहे. मुख्यत: अमेरिकेतल्या टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली गेली. अ‍ॅमोझॉन, गूगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, एचपी, ट्विटर या कंपन्यांनी कर्मचारी कपात केलीये.

या कर्मचारी कपातीमुळे सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं होणार असेल तर, परदेशातून आलेल्या कर्मचाऱ्यांना. या कर्मचाऱ्यांचं नुकसान हे फक्त नोकरी जाणं इतकंच नाहीये. या कर्मचाऱ्यांपैकी बऱ्याच जणांसाठी नोकरी जाण्याचा अर्थ हा अमेरिकेत राहण्याचा व्हिजा संपणं असाच होतो.

अमेरिकेतल्या टेक कंपन्यांमधून किती कर्मचारी कपात करण्यात आलीये ते बघुया…

अ‍ॅमेझॉनमधून अठरा हजार, गूगलमधून बारा हजार, मेटामधून अकरा हजार, मायक्रोसॉफ्टमधून दहा हजार, एचपी मधून सहा हजार, ट्विटरमधून तीन हजार सातशे कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं. याशिवाय इतरही कंपन्यांमुधून कर्मचारी कपात करण्यात आली.

या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय कर्मचारी सुद्धा आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांकडे एच-१ बी व्हिजा आहे अशा कर्मचाऱ्यांचं या कर्मचारी कपातीमध्ये सगळ्यात जास्त नुकसान होतंय.

मुळात हे एच-१ बी व्हिजा काय असतं ते बघुया.

हा एक तात्पुरता व्हिजा आहे. हा व्हिजा नियोक्त्यांना उच्च शिक्षित परदेशी व्यावसायिकांसाठी विशेष व्यवसायात काम करण्यासाठी परवानगी देतो. ज्यासाठी कमीत कमी पदवीचं शिक्षण आवश्यक असतं.

एच-१ बी व्हिजा हा युनायटेड स्टेट्समधील अनेक टेक कंपन्यांकडून परदेशी कर्मचारी नियुक्त करण्यासाठी वापरला जाणारा व्हिजा आहे. हा नॉन-इमिग्रंट वर्क व्हिसा आहे जो अमेरिकन कंपन्यांना तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असलेल्या विशेष व्यवसायांमध्ये परदेशी कामगारांना कामावर ठेवण्याची परवानगी देतो.

अमेरिकेतल्या जवळपास सगळ्याच टेक कंपन्यांसारखंच अ‍ॅमेझॉन कंपनीमध्येही अधिकतर कामगार हे परदेशीच आहेत. आतापर्यंत तरी कंपनीने कोणत्या कामगारांना कामावरून कमी करणार आहे हे सांगितलेलं नाही १८ जानेवारी पर्यंत ही यादी जाहीर केली जाईल.

२०१८ च्या एका रीपोर्टनुसार जगातलं टेक्नॉजीचं प्रमुख केंद्र असलेलं सिलिकॉन व्हॅली या ठिकाणी ७०% टक्के लोक हे परदेशीच आहेत.

आता या सगळ्या परिस्थितीमुळे एच-१ बी व्हिजा असलेल्या अ‍ॅमेझॉन कंपनीमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे. मुळातच अमेरिकेतला कायमस्वरुपीचा व्हिजा यांच्याकडे नसतो. हा एच-१ बी व्हिजा कंपनीत काम करत असलेल्या लोकांना कर्मचारी म्हणून दिला जातो.

नोकरी जाण्याचा थेट अर्थ हा व्हिजाही जाणार असा होतो.

नोकरी गेल्यानंतर या कर्मचाऱ्यांपुढे काही पर्याय असतात.

आता नोकरी गेली म्हणजे समोर काहीच पर्याय उरला नाही असं नाहीये. या कर्मचाऱ्यांसमोरही काही पर्याय आहेत.

सगळ्यात पहिली बाब म्हणजे आज कामावरून कमी केलं म्हणजे लगेच उद्या देश सोडावा लागेल असं नसतं. नोकरी गेल्यानंतरही ६० दिवस म्हणजेच २ महिन्यांचा कालावधी हा या कर्मचाऱ्यांकडे आहे.

या दोन महिन्यात ते दुसऱ्या एखाद्या अमेरिकन कंपनीत नोकरी शोधू शकतात. ही कंपनी जर त्यांना एच-१ बी व्हिजा मिळवून देणार असेल आणि त्यांच्या व्हिजा साठी खर्च करणार असेल तर, हे लोक अमेरिकेत राहू शकतील.

दुसरा पर्याय असतो तो म्हणजे, अमेरिकेतलं त्यांचं वास्तव्य वाढवायचं असेल तर , हे लोक त्यांचा एच-१ व्हिजा बी-१ किंवा बी-२ मध्ये बदलून घेण्यासाठी अप्लाय करू शकतात. ज्यामुळे त्यांंचं या ठिकाणचं वास्तव्य त्यांना वाढवता येऊ शकेल.

पण बी-१ किंवा बी-२ ची मागणी त्यांना ६० दिवसांचा कालावधी सुरू होण्याआधी करावी लागेल.

या सर्वांशिवाय शेवटचा पर्याय असेल तो म्हणजे भारतात परतणं. जे की, सहज शक्य होणार नाही त्यामागचं कारण म्हणजे, परदेशी विशेषत: अमेरिकेत काम करत असलेले बरेचसे भारतीय हे अनेक जबाबदाऱ्यांखाली असतात आणि अश्या परिस्थितीत अमेरिकेतून भारतात परत येऊन डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये कमाई करून जबाबदाऱ्या पार पाडणं कठीण जाईल.

अमेरिकेतल्या माध्यमांमधल्या वृत्तांनुसार अमेरिकेत जवळपास ५०,००० भारतीय कर्मचारी हे नोकरी गेल्यामुळे अडचणीत सापडलेत. सध्या हे कर्मचारी नवी नोकरी शोधतायत आणि जर नोकरी मिळाली नाही तर, काय करायचं याबाबत विचारही करतायत.

आताचं टेक कंपन्यांची परिस्थिती बघता या कर्मचाऱ्यांना सहजासहजी अमेरिकेतल्या दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळण्याची चिन्ह दिसत नसल्याचंही बोललं जातंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.