हे नेते जेलमध्ये गेले पण भाजपविरोधी भूमिका काय सोडली नाही…
महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन झालं आहे. आता मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केली पण शिवसेनेतून बंड करत. ज्यांनी एकनाथ शिंदेंना मोठं केलं त्यांच्या उपकाराला शिंदे जागले नाहीत आणि इडीच्या भीतीने भाजपसोबत जाऊन मिळाले, अशी टीका अजूनही एकनाथ शिंदेंवर केली जातीये.
फक्त शिंदेच नाही तर त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांवर हाच शिक्का लगावला जातोय.
पण राजकारणाच्या खेळात ही काही नवीन गोष्ट नाहीये. इडी, सीबीआय एकूणच जेल जाण्याचा प्रसंग ओढवला की पक्षनिष्ठा संपते, अशी नेहमीच धारणा राहिली आहे आणि ही धारणा तयार होण्यासाठी ढिगाने उदाहरणं इतिहासात आहेत. जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आलं आहे तेव्हापासून अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचं दिसून आलं आहे.
मात्र राजकारणाच्या इतिहासात असेही काही नेते आहेत, जे वेळ पडली तर जेलमध्ये गेले आहेत, मात्र त्यांनी भाजपविरोधी भूमिका सोडली नाहीये. आपली पक्षनिष्ठा सिद्ध केलीये. बघुयात कोणते…
१. लालू प्रसाद यादव
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव याचं नाव या लिस्टमध्ये अग्रस्थानावर येतं. गेली कित्याक वर्ष ते एकाच घोटाळ्यामुळे चर्चेत राहिले आहेत – चारा घोटाळा.
लालू यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना १९९० ते १९९५ या काळात जनावरांना चारा देण्याच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून ९५० कोटी रुपये फसवणूक करून काढण्यात आले होते. १९९६ मध्ये या घोटाळ्यावरून पडदा निघाला. अमित खरे नावाच्या IAS अधिकाऱ्यांनी हे प्रकरण समोर आणलं होतं. खरे म्हणजेच तोच व्यक्ती ज्यांची ऑक्टोबर २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.
खरे यांची नियुक्ती जेव्हा चाईबासा इथं उपायुक्त म्हणून करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी या घोटाळ्याबद्दल खुलासा केला होता.
लालू प्रसाद यादव आधीपासून भाजपचे विरोधक राहिलेले आहेत. भाजपचा जो मतदार आहे त्या उच्चवर्णीय जातींच्या नेत्यांविरुद्ध आंदोलनं करत लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री बनले.
उत्तर भारतात तेव्हा रामजन्मभूमीचं आंदोलन जोर पकडून होतं. तेव्हा बिहारमध्ये आल्यावर अडवाणींना अटक करण्याचं धाडस लालूंनी दाखवलं. गेल्या अनेक निवडणुका भाजपने लालूप्रसाद यादव यांच्या विरुद्ध लढवल्या. लालूंनी आयुष्यभर भाजपला विरोध केला, मोदींची नक्कल करण्यापासून अगदी नोटबंदीवर खालच्या पातळीवर टीका करण्यापर्यंत लालू प्रसाद यादव सर्वात आघाडीवर होते.
त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र यामागे भाजपच आहे याची त्यांच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे. म्हणून लालू पूर्वी पण जेलमध्ये गेले होते आणि आत्ता सुद्धा जेलमध्ये आहेत. पण त्यांनी भाजपकडे वळूनही बघितलं नाहीये.
२. पी चिदंबरम
काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी नेहमीच भाजपवर हल्ला केला आहे. चिदंबरम यांनी मोदींचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या अमित शहा यांच्यासाठी अडचणी निर्माण केल्या होत्या. २०११ साली पी. चिदंबरम गृहमंत्री असताना सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणात हत्येच्या आरोपाखाली सीबीआयने गुजरात सरकारमधील तत्कालीन मंत्री अमित शहा यांना अटक केली होती.
शिवाय चिदंबरम यांनी थेट मोदींवर देखील मोर्चा काढला होता. २००२ च्या गुजरात दंगलीची चौकशी विशेष तपास पथकाकडून करण्यात येत होती. तेव्हा मोदींना निशाणा करण्यात आलं होतं. भाजपने तेव्हा चिदंबरम यांनी हे केलंय, असा आरोप केला होता. २०१० साली ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द वापरून त्यांनी भाजपला टार्गेट केलं होतं.
मात्र भाजप २०१४ ला सत्तेत आल्यानंतर दिवस पालटले. पी चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली.
इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी २००७ मध्ये INX मीडिया या नावाने कंपनी बनवली. या कंपनीला मॉरिशसमधल्या 3 कंपन्यांकडून बेकायदेशीररित्या पैसे येत होते, असं अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक गुप्तचर शाखेने म्हटलं होतं. या बेकायदेशीर परकीय गुंतवणुकीला पी. चिदंबरम यांनी परवानगी दिली, असा आरोप होता. त्यानुसार ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने कार्ती चिदंबरम यांच्या तपासाचे आदेश दिले.
बऱ्याच आरोप प्रत्यारोप आणि उलथापालथीचा खेळीनंतर अखेर पी चिदंबरम यांना ऑगस्ट २०१९ मध्ये अटक करण्यात आली. त्यांना तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. जवळपास १०६ दिवस चिदंबरम जेलमध्ये राहिले. ४ डिसेंबर रोजी त्याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
यानंतर त्यांची हिम्मत तुटेल असं भाजपला वाटलं. मात्र अजूनही चिदंबरम स्वपक्षात राहून भाजपसाठी अडचणी निर्माण करताना दिसतात.
३. डी. के.शिवकुमार
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना २०१९ मध्ये जेलवारी झाली होती. याबद्दल २०२१ मध्ये बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ‘भारतीय जनता पक्षात प्रवेश न केल्यामुळे मला तिहारमध्ये जावं लागलं’ असं उघडउघडपणे डी. के.शिवकुमार म्हणाले होते.
ईडीने २०१९ मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली शिवकुमार यांना अटक केली होती आणि त्यांना ५० दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. शिवाय २०१७ मध्ये आयकरने डीके शिवकुमार यांच्या ६४ ठिकाणांवर छापे टाकले होते. त्या काळात डीके शिवकुमार आणि इतर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर राजकीय सूडबुद्धीने हे काम केल्याचा आरोप केला होता.
त्यांनी वेळोवेळी भाजपला धारेवर धरलं आहे. २०१८ च्या मे महिन्यात येडियुरप्पांचं अडीच दिवसांचं सरकार पाडण्यात डीके शिवकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि अमित शहांच्या रणनीतीवर पाणी फेरलं होतं. तेव्हापासून त्यांना कर्नाटकच्या राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं.
भाजपने कायद्याचा दुरुपयोग करण्याची वारंवार टीका त्यांनी केली आहे. शिवाय कोरोनाच्या माध्यमातून भाजपने लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम केलं आहे, असंही ते म्हणाले होते. त्यांनी बसवराज बोम्मई, बी. एस. येडियुरप्पा यांच्या वक्तव्याचीही अनेकदा खिल्ली उडवली आहे.
काँग्रेसच्या अंतर्गत लोकशाही आणि कार्यसंस्कृतीचा भाजपला हेवा वाटतो. म्हणून राज्यातील काँग्रेस संपवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं ते बोलत असतात.
४. कनिमोझी
हिजाब घालणं किंवा न घालणं हा स्त्रीचा अधिकार आहे. मात्र यासारखे विषय काढून भाजपने लोकांना लोकांच्या विरोधात नेण्याचं काम सुरु केलंय. इतकंच काय भाजप नेहमीच स्त्री विरोधी राहिलेलं आहे…हे वाक्य आहे द्रमुकच्या नेत्या कनिमोझी यांचं. पत्रकार म्हणून करियरची सुरुवात करणाऱ्या कनिमोझी यांनी राजकारणात उतरल्यावर भाजपवर नेहमीच प्रश्नांची झोड उठवली आहे.
भाजप सत्तेत आल्यापासून त्यांचे नेते पत्रकारांना उत्तरं देत नाही, अशी नेहमीच टीका केली जाते. मात्र भाजप नेते निवडून आलेल्या नेत्यांचे देखील प्रश्न सांभाळू शकत नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. केंद्रातील पियुष गोयल ते महाराष्ट्रातील नारायण राणे यांच्यापर्यंत कनिमोझी यांच्या प्रश्नांपासून भाजप नेते दूर राहत असल्याच्या चर्चा होत असतात.
भाजप विरुद्धच्या या आक्रमक भूमिकेमुळे कनिमोझी यांना २०११ मध्ये जेलवारी झाली होती. ए राजा ज्या केसमध्ये अडकले होते, त्या 2G घोटाळ्यात कनिमोझी यांना दोषी ठरवण्यात आलं होतं.
नवी दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने कलैग्नार टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुमार यांच्यासह कनिमोझी यांना जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. तिहार तुरुंगात १९० दिवस त्यांनी काढले. नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
डिसेंबर २०१७ मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 2 जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात ए. राजा यांच्यासह इतर १९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यात यांचीही मुक्तता झाली. मात्र अजूनही त्यांच्यामागील सत्र संपलेलं नाहीये आणि त्यांनी देखील भाजपला निशाणा करणं सोडलेलं नाहीये.
आता देशपातळीवरील नेते झाले, राज्याकडे येऊ…
५. नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर गेल्या कित्येक महिन्यांपासून ईडीची कारवाई सुरु आहे. सध्या तर ते जेलमध्ये आहेत. जेलमध्ये असल्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीला देखील त्यांना मतदान करता येणार नाही, याची योग्य खबरदारी भाजपने घेतली असल्याच्या चर्चा होत असतात.
२३ फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. या कारवाईने मोठी खळबळ उडाली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली होती. लँड डीलशी संबंधित हे प्रकरण असून टेरर फंडिंग आणि मनी लाँडरिंगचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला आहे.
याच प्रकरणात १३ एप्रिलला नवाब मलिक यांच्या ८ मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. कुर्ल्यातील गोवावाल कंपाऊंड इथली मालमत्ता, उस्नानाबाद इथली १४७ एकरांची जमीन, मुंबईतील ३ सदनिका आणि दोन राहत्या घरांचा यात समावेश असल्याचं समजतं.
अशी जेलची साडेसाती मागे लागली असूनही नवाब मलिक राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहेत. अनेक नेत्यांनी ईडी मागे लागली की त्यांचा पक्ष सोडला आहे. ताजे उदाहरण आहेत आपल्याकडे. मात्र यांच्यासमोर नवाब मलिक पक्षनिष्ठेचं उदाहरण आहे.
हे ही वाच भिडू :
- ‘पक्ष संपणार नाही’ असं कार्यकर्ते म्हणतायेत पण महाराष्ट्राचा इतिहास वेगळंच सांगतो….
- बंडखोरीच्या चर्चांमध्ये महाविकास आघाडीच्या या ११ नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे…
- नवाब मलिक, अनिल देशमुख मतदान करू शकणार नाहीत, पण भुजबळांनी मतदान केलेलं..