एक शून्य टाकायला विसरली आणि १ कोटीची पोटगी १० लाख झाली.

भिडू नजर हटी दुर्घटना घटी असा प्रकार तुम्ही कधी अनुभवलाय काय? एक छोटीशी चूक लई मोठा घोळ घालू शकते. आम्ही असे घोळ रोज घालतो. जरा व्याकरणात चूक झाली तर मायबाप वाचक पट्टी घेऊन झोडत्यात आणि संपादक कात्री घेऊन कापत्यात. असो.

पण एक लिखाणातली एका शून्याची चूक  करोडोच नुकसान करु शकते हे कधी बघितल नव्हत. 

ही गोष्ट आहे रिया पिल्लई या महामायेची. जरा लक्ष देऊन वाचा. स्टोरी जरा कॉम्पलीकेटेड आहे.

रिया पिल्लई ही एक सुपरमॉडेल. हैदराबादच्या दरबारातील नरसिंगराज धनराजगिर या सरदाराची पणती. म्हणजे तिची आई राजघराण्यातील होती. तिच्या आज्जीने भारतातला पहिला बोलपट आलमआरा मध्ये काम केलेलं.

रियाच्या आईने रेमंड पिल्लई या एका मल्याळी ख्रिश्चन माणसाबरोबर लग्न केलं. यामुळे रियाच्या जडणघडणीतच अनेक कल्चरची भेळ झालेली आहे. ते मेट्रोसेक्सुअल की काय म्हणतात तसं बिनधास्त मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये तिची वाढ झाली.

वयाच्या अठराव्या वर्षी रिया पहिल्यांदा प्रेमात पडली. अमेरिकन मायकल वाझ नावाच्या माणसाशी तीच लग्न झालं. जवळपास चार वर्षे त्यांचा अमेरिकेत सुखाचा संसार चालला. पण कुठे माशी शिंकली काय माहित रिया ताई रुसून माहेरी परत आल्या.

१९९४ ला त्या दोघांचा डिव्होर्स झाला.

असच दोन चार वर्षे गेली. रिया पिल्लई बॉलीवूडमध्ये हातपाय मारून बघत होती. तेव्हा मुंबईत तिची ओळख संजूबाबाशी झाली. तरुण देखण्या आडदांड संजय दत्तच्या ती प्रेमात पडली. संजू बाबा तेव्हा बॉम्बस्फोट प्रकरणात जेलमध्ये गेला.

तस बघायला गेलं तर संजू बाबाच पण एक लग्न झालेलं.

त्याची पहिली बायको रिचा शर्मा हीच नुकतच निधन झाल होतं. त्यांना एक मुलगी पण होती. संजू बाबाची ओळख फिल्म इंडस्ट्रीचा बॅडमॅन, प्ले बॉय अशी होती. माधुरी पासून ते टीना मुनीमपर्यंत त्याच्या शेकडो गर्लफ्रेंड होत्या.

पण जेलच्या वातावरणात असताना तो रियाच्या प्रेमात पडला. या इमोशनल प्रसंगी सगळ जग विरोधात गेलं असताना फक्त रिया हीच त्याच्या पाठीशी उभी होती. तुरुंगातून संजू फक्त रियाला फोन करायचा. तिथेच दोघांची स्टोरी रंगली.

संजय दत्त सुटून बाहेर आला आणि सगळ्यात पहिल्यांदा रिया पिल्लई बरोबर लग्न केलं.

थोडे दिवस संसार चांगला चालला पण आणि घोळ झाला.  संजय दत्तला तुरुंगातून बाहेर आल्यावर लई पिक्चरच्या ऑफर मिळाल्या. एका वेळी भरपूर सिनेमांची शुटींग सुरु झाली. संजू बाबाने एका पाठोपाठ एक धडाक्यात सात आठ सिनेमे साईन केले होते.

या पिक्चरच्या नादात तो एवढा बिझी झाला की त्याच घराकड बायकोकड दुर्लक्ष झालं. 

खुद्द संजू मुलाखती मध्ये ही चूक मान्य करतो. एकमेकाला सोलमेट समजणारे रिया आणि संजय एकमेकापासून दूर होत गेले. दोघांनीही लग्नाच्या बाहेर वेगळे जोडीदार शोधले. संजू बाबाला मान्यता मिळाली.

खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेली रिया आता प्रेमात पडली होती वयाने ७-८ वर्षांनी लहान असलेल्या स्टार टेनिसपटू लिअँडर पेसच्या.

रिया आणि संजय वेगळे कधी झाले हे नक्की माहित नाही पण २००५लाच ती आणि लिअँडर पेसबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. २००८ साली संजय दत्तने मान्यता बरोबर लग्न करण्यापूर्वी रियाला डिव्होर्सचे पेपर पाठवून दिले. तिने सुद्धा आनंदाने सही केली.

अस म्हणतात की त्यानंतर लिअँडर आणि रियाने गुपचूप लग्न केलं. दोघांना एक गोड मुलगी देखील झाली. दरम्यानच्या काळात रियाने कॉर्पोरेट सिनेमात छोटा रोल करून मोठ्या पडद्यावर देखील एन्ट्री मारली.

काही का असेना रिया तिसऱ्या लग्नात का असेना सेटल झाली. पण नाही. यावेळी पण तिच्या पदरी धोकाच आला.

२०१४ साली अचानक बातमी आली की लिअँडर पेस रिया पिल्लईला घरात मारहाण करतोय आणि तिने त्याच्या विरुद्ध केस केली आहे.

लिअँडर पेस म्हणजे भारताला ऑलिंपिक मेडल मिळवून देणारा, जागतिक पातळीवर आपल नाव कमावलेला सुसंस्कृत समजला जाणारा टेनिसपटू. तो असे काही करेल अस कोणाला वाटत नव्हतं. यामुळे ही बातमी आल्यावर सगळ्यांना धक्का बसला. काही का असेना रियाचा तिसरा संसार पण मोडकळीस आला.

यावेळी मात्र तिला जोरात धक्का बसला होता. रिया आणि लिअँडरच्या भांडणाने कुरूप वळण घेतले होते.

भांडणे कोर्टात गेली. लिअँडरने दावा केला की आमच लग्नच झाल नव्हत. आम्ही शेवटपर्यंत लिव्ह इन मध्येच राहत होतो. उलट रियावर त्याने बरेच आरोप केले. लग्न झाले असेल तर लग्नाचा फोटो दाखव असा दावा केला.

रियाने तो फोटो पैदा केला आणि वर सांगितले की

जर आमच लग्नच झालच नसेल तर लिअँडर आपल्या पासपोर्ट मध्ये बायकोच्या जागी माझ नाव का लिहितो?

कोर्टाने लिअँडरला २०१४ चे पासपोर्ट दाखवायला सांगितले. पण नेमक म्हणे ते पासपोर्ट  हरवले आहे अस त्याच म्हणन पडल. आता मिया बीबीच्या भांडणात कोण बरोबर कोण चूक हे ठरवायला जाऊ नये म्हणतात. पण दोघांच्या मध्ये त्यांच्या पोरीचा बिचारीचा बळी जात होत. सुप्रीम कोर्टाने देखील सहा महिन्यात निकाल द्या म्हणून आदेश दिले.

दिवाणी कोर्टाने रियाकडे आयानाची म्हणजे तिच्या पोरीची कस्टडी दिली. 

रियाने लिअँडरकडे पोरगीच्या शिक्षणाचा, राहण्याखाण्याचा, तिच्या मेडिकलचा खर्च संभाळण्यासाठी पोटगीची मागणी केली. तिला लिअँडरने १ कोटी रुपये देणे अपेक्षित होते. पण “गडबडीत” तिच्या वकिलांनी पोटगीचा अर्ज भरताना १ शून्य देण्यास विसरले म्हणे. रियाने सुद्धा खातरजमा न करता सही केली.

आणि १ कोटीच्या ऐवजी १० लाखांचा पोटगीचा अर्ज गेला. 

दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरात बातमी छापून आली. एका शून्यने रिया पिल्लईला चांगलाच धोका दिला. गुंजन मंगला आणि आमना उस्मान या महेश जेठमलानी यांच्या चेम्बरमधील वकिलांनी हा घोळ घालून ठेवला होता.

मग काय परत तारखावर तारखा पडण्याच सत्र सुरु झाल.

सुप्रीम कोर्टाने किती जरी आदेश दिले असले तरी खालचा कोर्ट या गुंतागुंतीच्या केसमध्ये निकाल लावायला कमी पडल. आता २०२० उजाडले आहे निकाल काय लागलाय की बाहेर सेटलमेंट झालीय हे कुठ सापडत नाही. फायनल आकडा शोधणाऱ्या मिडियाला पण वेगळ्या चटपटीत बातम्या मिळत गेल्या आणि हा विषय मागे पडला.

आत्ताचा अपडेट म्हटला तर ४७ वर्षांचा लिअँडर पेस अजूनही रिटायर होण्याच नाव घेत नाही. टेनिसमध्ये जिंकण्याच जिद्द घेऊन तो कोर्टात उतरतोच आहे. पण फमिली कोर्टात दाद मागून मागून दमलेली रिया पिल्लई आता ५५ वर्षांची झाली आहे. मॉडेलिंग नाही, ग्लमर नाही, चर्चेत नाही. प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून लांब ती आणि तिची मुलगी आहेत.

अजूनही खर प्रेम मात्र तिला मिळाल नाही हे नक्की.

तर भिडूनो ही स्टोरी किती जरी फिल्मी वाटत असली तरी खरी आहे. खर प्रेम तेन सोडा आणि कामावर लक्ष द्या. नाही तर रियाच्या वकिलासारखं लाखाचं बारा हजार करशीला.

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.