मेंदूत गाठ सापडल्यामुळे सगळ्यांना वाटलं होत, लिएण्डर पेसचं टेनिस कायमचं संपल
१९९६ अटलांटा ऑलिम्पिक. भारताचा लिएण्डर पेस विरुद्ध आंद्रे अगासी यांच्यात टेनिसची सेमीफायनल मॅच होती.
पत्रकार परिषदे मध्ये आगासीला पत्रकार फायनलच्या तयारीचा प्रश्न विचारत होते. त्यांच्या दृष्टीने भारताचा खेळाडू म्हणजे आगासीने ही मॅच सहज जिंकलीच आहे.
पण आगासी म्हणाला,
अजून माझी लिएण्डरबरोबरची मॅच बाकी आहे आणि त्याच्यासारखा चपळ प्लेअर सध्याच्या टेनिसमध्ये कोणीच नाही.
ते अगदी खरं होत.
त्या सेमीफायनलमध्ये पेसने आगासीला प्रत्येक पॉईंट साठी रडवलं.
जगात तेव्हा दुसऱ्या क्रमांकाचा मानला जाणारा आगासी ती मॅच जिंकला पण त्या साठी त्याला खूप मोठी झुंज द्यावी लागली.
लिएण्डर पेस ती सेमिफायनल हरला पण ब्राँझ पदकासाठी झालेल्या मॅच मध्ये त्याने फर्नांनडो मॅलीगणी याला हरवलं आणि
भारताला तब्बल ४४ वर्षांनी खाशाबा जाधवांच्या नंतर पहिलं ऑलिंपिक मेडल मिळवून दिलं.
त्याचे आई वडील दोघेही खेळाडू. वडील व्हेस पेस हे सुद्धा ऑलिंपिकपटू. १९७२ च्या ब्रॉंझविजेत्या हॉकी टीममध्ये त्यांचा समावेश होता. आई देशाची महिला बास्केटबॉल टीमची कॅप्टन.
खेळ आणि खिलाडूपणा लिएण्डरच्या रक्तातच वाहत होता.
पण त्याने आई आणि वडिलांचा दोघांचाही खेळ निवडला नाही. त्यानं निवडलं टेनिसला. मद्रासच्या अमृतराज अकादमीमध्ये त्याने वयाच्या १२ व्या वर्षी प्रवेश घेतला.
खरंतर टेनिस हा भारतीयांना सूट न होणारा खेळ आहे. स्टॅमिनाची अत्युच्च परीक्षा पाहणाऱ्या खेळत उंच तगडे खेळाडू यशस्वी ठरतात. यामुळे भारतीयांची संख्या टेनिसमध्ये कमी आढळते.
पण अमृतराज, रामनाथ कृष्णन यांच्या सारख्या खेळाडूंनी भारतात टेनिस रुजवल.
लिएण्डरने ज्युनिअर लेव्हललाच अमेरिकन ओपन आणि विम्बल्डन ओपन जिंकुन आपण अमृतराज यांचा वारस असल्याचं दाखवून दिलं.पुढच्याच वर्षी त्याने डेव्हीसकपच्या माध्यमातून सिनियर लेव्हलला प्रोफेशनल टेनिस खेळायला सुरवात केली.
ऑलिंपिकमध्ये त्याने ब्रॉंझ मेडल मिळवलंच पण त्याच्या पुढच्याच वर्षी जगातला अव्वल खेळाडू पिट सँप्रास याला हरवलं.
पण कितीही झालं तर ताडमाड उंचीच्या युरोपियन खेळाडूंशी स्पर्धा करणे जमणार नाही हे पेसला उमगलं होत.
त्याने आपला मोर्चा दुहेरीकडे वळवला. तिथे भूपती आणि त्याची जोडी जमली.
१९९९ सालची विम्बल्डन, फ्रेंच ओपन ही स्पर्धा त्यांनी जिंकून दाखवली. त्याच वर्षी लिसा रेमंड हिच्या साथीने पेसने मिक्सड डबल्सची विम्बल्डन सुद्धा जिंकली.
दुहेरीत पेस नावाचं युग सुरू झालं होतं. अनेक दिग्गज जोडयाना त्याने आणि भूपतीने हरवले.पण दुर्दैवाने त्यांची जोडी फुटली. त्यानंतर दुसऱ्या जोडीदारासह त्यांना चमत्कार घडवता आला नाही.
दरम्यान २००३ साली लिएण्डरने सर्वात महान महिला टेनिसपटू मार्टिना नवरातीलोव्हा हिच्या सोबत जोडी जमवली.
मार्टिनाच वय तेव्हा जवळपास पन्नाशी पर्यंत पोहचलेल. या दोघांनी ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डन ओपन जिंकली.
अशातच एक दिवस बातमी आली की लिएण्डर पेसला ब्रेन ट्युमर आहे.
त्याला अमेरिकेच्या सुप्रसिद्ध कॅन्सर सेंटर मध्ये दाखल करण्यात आलं. सगळ्या टेनिसजगताला धक्का बसला होता. अनेकांना वाटलं की आता त्याच करियर संपलं.
मार्टिनाने मात्र खंबीरपणे त्याला साथ दिली,
पेस जोपर्यंत बरा होत नाही तो पर्यंत मी दुसऱ्या कोणासोबतही खेळणार नाही
असं तिने जाहीर केलं. सुदैवाने कळाल की पेसला मेंदूचा कॅन्सर नाही पण न्यूरो इन्फेक्शन मुळे त्याच्या मेंदूत गाठ झाली आहे.
या असाध्य रोगाशी लढा देऊन पेस परत आला.
अफाट जिद्दीच्या जोरावर त्याने टेनिस कोर्टवर रिएन्ट्री केली. मेहनत करून आपला जुना फॉर्म परत मिळवला.
या रोगानंतर त्याने जवळपास 9 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
आज तो ४७ वर्षांचा झाला. पण तो आजही फिट आहे. सगळ्या टेनिस वर्तुळात त्याला चॅम्पियन म्हणून ओळखतात. फेडरर सारख्या खेळाडूला देखील लिएण्डर पेस या वयात संपूर्ण टेनिस कोर्टात चपळतेने धावतो याच कौतुक आणि आश्चर्य वाटत.
७ ऑलिंपिक स्पर्धा खेळण्याचा विश्व विक्रम लिएण्डर पेसच्या नावे आहे.
दुहेरी खेळणाऱ्या टेनिसपटूमध्ये सर्वात महान खेळाडूंच्या यादीत लिएण्डर पेस हे नाव अग्रभागी असेल.
मागच्या वर्षी एका भावनिक पोस्ट मध्ये लिएण्डरने सांगितलेलं की २०२० हे माझ्या टेनिस कारकिर्दीसाठी शेवटचे वर्ष असणार आहे. मात्र यावेळी कोरोनामुळे अनेक स्पर्धा रद्द कराव्या लागल्या.
यंदा टेनिस खेळले जाईल का या बद्दल शंका आहे. लिएण्डर पेसला शेवटचं टेनिस कोर्टवर पाहता येईल का हाच प्रश्न अनेक चाहत्यांना पडलाय.
हे ही वाच भिडू.
- सानिया सोबत कमबॅक करणारी ती, इतिहासातील त्या एका मॅचमुळेच ओळखली जाते !
- एकेकाळी क्रिकेटच्या मैदानात सिक्सर मारणारी ती आज टेनिस सम्राज्ञी बनली आहे.
- आपल्याच देशात शोध लागलेल्या खेळात नंबर वन होण्यासाठी प्रकाश पदुकोण जन्मावा लागला.