छपरी थेरं करण्यापेक्षा, इंस्टाग्रामवरुन पैसे कसे छापायचे हे माहिती करुन घे भिडू

आजकाल झटक्यात फेमस व्हायचा आणि पैसे कमवायचा ट्रेंड आलाय. आणि ही सर्वोच्च देणगी दिलीये इंस्टाग्रामनं. तशी सुरुवात केली टिकटॉकनं, पण नंतर  टिकटॉकचा बाजार उठला आणि इन्टाग्रामनं आपलं रिल्स मार्केटमध्ये उतरवलं आणि ते सुद्धा विथ प्रॉफिट. मग काय होणार होतं एकामागून एक ट्रेंड येत राहिले आणि रिल्सस्टार्स बनत गेले. 

रिल्स बनवून, पोस्ट करून,  फेमस होऊन, पैसे कमवण्यासाठी गल्ली बोळात स्पर्धा तयार झालीये. कोणी डान्स करून, अॅक्टिंग करून, डायलॉगबाजी मारून, मिम्स टाकून वेगवेगळ्या पोस्टचा वापर करून फेमस व्हायला बघतंय. काहीही करून आणि कसंही करून फक्त फेमस व्हायचं हे ‘एकचि ध्येय’ या रिल्सस्टार समोर आहे.  बरं त्याला वयाची अट नाही बरं का.. फक्त फेमस व्हायचं.

पण कधी कधी हे फेमस व्हायचं फॅड खूळ बनत आणि भलतंच प्रकरण अंगाशी येत. उदाहरणासहित स्पष्टीकरण द्यायचं झालं  तर ‘थेरगाव क्वीन’. पुण्यातल्या मंडळींना तर हे नाव आधीच ओळखीचं असेल पण सध्या अख्ख्या महाराष्ट्रात हे नाव चर्चेत आलय. कारण ह्या थेरगाव क्वीनला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलीये.  

कारण जाणून घ्यायचं असेल तर अख्खी स्टोरी वाचून झाली की, तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जा आणि ताईंचे रिल्स चेक करा. थेरगाव क्वीन या नावं अकाउंट चालवणारी साक्षी हेमंत श्रीश्रीमल. फक्त १८ वर्षाची आहे. पण तिचा असा एकही व्हिडिओ सापडणार नाही, ज्यात शिव्या नसतील. त्या शिव्या पण अश्या की एखाद्याच्या कानातून रक्त येईल. फेमस होण्यासाठी या ताईनं शिव्या, धमकी, गुन्हेगारीच्या तथाकथित भाषेचा वापर केलाय. 

बरं या थेरगाव क्वीनचे फॉलोवर्स म्हणाल तर ३० हजार ८०० च्या आसपास आहेत. अटक होण्याच्या आधी हा आकडा जास्त होता पण नंतर तो कमी कमी होत गेला. काहींना तिच्या त्या व्हिडिओचं कौतुक वाटत, तर काहीजण तिला त्याच भाषेत उत्तर देऊन निघून जात.

आता भलेही असल्या व्हिडिओंमुळं ही थेरगाव क्वीन फेमस झाली असेल, तिने पैसेही कमवले असतील. पण भिडू असले छपरी चाळे करूनच फेमस होता येतं आणि पैसे कमवता येतात अश्यातला भाग नाही. या सोशल मीडियाचा चांगला वापर करून सुद्धा फेम आणि पैसा कमवता येतो. 

 म्हणजे कसं ना सोशल मीडियावर कुठलीही गोष्ट व्हायरल होते. पण चांगल्या गोष्टीला, चांगल्या कन्टेन्टला जास्त आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो. आपल्यात जे कोणतं चांगलं टॅलेंट असेल, कॉमेडी डान्स, अॅक्टिंग, चांगलं लिहिण्याचं ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकायचं. आणि एकदा का लोकांची दाद चांगली मिळाली की, मग काय युजर्स आपल्याला आपोआप वर नेतात. 

मग फॉलोअर्स, लाईक्स, प्रमोशन, ब्रँडची जाहिरात असे पैसे कमवायचे सगळे मार्ग तुमच्यासाठी खुले होतात. आता याचं सुद्धा उदाहरणासकट स्पष्टीकरण द्यायचं झालं तर आपल्याकडे काही भिडू आहेत, जे शिव्या किंवा अश्लील कन्टेन्टशिवाय फेमस झालेत आणि पुरेसे पैसे सुद्धा कमवतायेत.

तर आपल्या कॉमेडी व्हिडीओजमुळे जबरदस्त फेमस असलेला अथर्व सुदामे सांगतो,

”मी गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून कंटेंट बनवतोय. माझे व्हिडीओ लोकांना हसवणारे असतात. मी अगदी ठरवून व्हिडीओ बनवत नाही, तर जे वाचतो किंवा डोळ्यांसमोर येतं त्यावर व्हिडीओ बनवतो. जसा माझा सोशल मीडियावरचा प्रेझेन्स वाढला, तसे माझ्याकडे ब्रॅण्ड्स येत गेले आणि त्यातून कमाईही होत गेली. सध्यातरी मी याकडेच मुख्य व्यवसाय म्हणून बघतोय.”

आपल्या कोट्ससाठी आणि गाण्यासाठी फेमस असलेली मैथिली आपटे सांगते, 

”लॉकडाऊनच्या काळाला संधी मानणाऱ्यातली मी एक असेल. माझ्या असं काही डोक्यात सुद्धा नव्हतं कि सोशल मीडियावर काही लिहिलं किंवा करेल. पण लॉकडाऊनमध्ये व्यक्त होण्यासाठी मी इंस्टाग्रामवर माझे कोट्स लिहायला सुरुवात केली. तशी मी आधी माझ्या गाण्यांचे विडिओ टाकायचे. पण सगळ्यात जास्त रीस्पॉस मिळाला तो कोट्समधून. लोकांना ते जबरदस्त आवडायला लागले. त्यातूनच मी त्याचे ‘विचारांत’ नावाने  कॅलेंडर सुद्धा बनवायला सुरवात केली. त्यातूनही काम होतं, सोबतच काही ब्रँडचं प्रमोशन सुद्धा होतं.” 

डान्सहोलिक्स स्टुडिओ या नावानं डान्स क्लास असणारी रेणुका कारंडे सांगते, 

”आम्ही १२ वर्षांपूर्वीच आमचा प्रवास सुरु केला. दोन-अडीच वर्षांपूर्वी आम्ही सोशल मीडिया पेज सुरू केलं. त्यावर आम्ही सातत्यानं डान्सचे व्हिडीओज टाकत असतो, त्यातून काही आर्थिक कमाई होत नसली. तरी आमच्या कलेबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचते आणि त्यातून डान्स शिकण्यासाठी अनेक विद्यार्थी आमच्याकडे येतात. सोशल मीडियाचा आम्हाला अशा प्रकारे फायदा होतो.”

त्यामुळं भिडू आपल्याला यातून घ्यायचं काय, तर शिव्या आणि छपरी चाळे करून प्रकरण अंगाशी आणण्यापेक्षा चांगला आणि चार- चौघात बसून पाहता येईल असा कन्टेन्ट बनवून लोकांच्या मनात चांगली जागा बनवलेली कधीही चांगलं. आणि राहिला प्रश्न पैशांचा तर ‘देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के…’

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.