राजकारण्यांचा सोडा आपलाही फोन टॅप होऊ शकतोय..

फोन टॅपिंग हा विषय काय आपल्यासाठी नवीन नाही. इतिहासात पाहायला गेलं तर खुद्द पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचा फोन टॅप केला होता असाही आरोप झाला होता.

इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर पंतप्रधान पदाची जबाबदारी राजीव गांधी यांच्यावर आली होती. त्यावेळी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग होते. इंदिरा गांधी यांची हत्या होण्यापूर्वी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग सुवर्णमंदिराला भेट देऊन खलिस्तानवाद्यांना भेटले होते. राजीव गांधी यांना संशय होता की, झैलसिंग हे खलिस्तानी नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राष्ट्रपती झैलसिंग यांचा फोन टॅप केल्याचे सांगण्यात आलं होतं.

तर फोन टॅपिंग प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, 

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय अधिनियम कलम २६ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्ला या सध्या हैद्राबाद येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. 

शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागात (स्टेट इंटिलिजन्स डिपार्टमेंट-एसआयडी) आयुक्त होत्या. त्यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल शासनाने स्वीकारून फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आपला फोन टॅप होतोय हे कळू शकतं का?

फोन टॅपिंग प्रकरणात ज्यांचा फोन टॅप होतोय त्यांना हे कळत नाही. तसेच करणाऱ्या विरोधात पुरावा नसतो. असं सांगण्यात येत की, शासकीय यंत्रणेबरोबरच अनेक खासगी कंपन्या हा फोन टॅप करत असतात. पैसे घेऊन कोणाची तरी हेरगिरी करण्याचे काम या कंपन्या करतात.

पेगॅसस प्रकरण आपल्याला चांगलंच माहित आहे. लहान-लहान एजन्सी सुद्धा अशा प्रकारे फोन टॅप करतात असं सांगण्यात येतं. 

अनेकवेळा आपल्या आजूबाजूचे सांगतात की, मला असं वाटत की माझा फोन टॅप होत आहे. मात्र काही ट्रिक्स आहेत ज्यामुळे आपल्याला समजू शकतं की, आपला फोन टॅप होतोय. 

-सर्वात महत्वाचं म्हणजे फोन टॅप करण्यात येत असेल तर आपला डेटा लवकर संपतो. जर पोस्टपेड असेल तर बिल जास्त येतं. 

-इतर वेळेपेक्षा बॅटरी लवकर संपते आणि बॅटरी गरम होऊ लागते. 

-फोनची हेरगिरी होत असेल तर अचानक ऍप ओपन होतात. फोन आपोआप रिबूट होतो.

-फोन सुरु असतांना मध्येच काही क्लिक केल्याचा आवाज येतो.

-जर फोनच्या कॉन्टॅक्ट मधील लोक तुमच्या फोनवरून येत असलेल्या अशा संदेशांबद्दल तक्रार करत असतील तर फोन टॅप होण्याची अधिक शक्यता असते.

 काही अ‍ॅप, ट्रिक्स वापरून तुम्ही फोन टॅप होण्यापासून वाचवू शकता  

-आयफोन वापरणारे भिडू  Cydia नावाचे ॲप वापरून डिव्हाइस जेलब्रेक आहे की नाही हे तपासू शकतात. 

– याशिवाय  3 UTOOLS सारखी काही टूल्स वापरू शकता.

फोनमध्ये अँटी-मालवेअर ॲप्स जसे की, Certo Anti Spyware इंस्टॉल करू शकता.

कायदा काय सांगतो 

१३६ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यामुळे सरकारला फोन टॅप करण्याचा अधिकार मिळाला आहे. भारतीय टेलिग्राफिक कायदा १८८५ च्या कलम ५ च्या नुसार, केंद्र आणि राज्य सरकारांना कोणाचाही फोन टॅप करण्याचा अधिकार मिळतो. मात्र, २००७ मध्ये या कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर फोन टॅपिंगसाठी केंद्र सरकारच्या गृहसचिव स्तरावरील अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी सुरुवातीला ६० दिवसांसाठी असते, जी १८० दिवसांपर्यंत वाढवता येते.

२००० च्या आयटी कायद्याच्या कलम ६९ नुसार सरकारला फोन टॅप करण्याचा किंवा कोणत्याही संगणकावर उपस्थित किंवा पाठवलेली कोणतीही माहिती किंवा डेटा मिळविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.