पोटचा मुलगा गेला तरी लावणी कला त्यांनी खेडोपाड्यात पोहचवली..

महाराष्ट्रातील लोककलावंताचं आयुष्य हे खडतर जगणं असतं. रंगमंचावर कलेचा आविष्कार सादर करताना रोजच्या जगण्यात खूप वेळेस या कलावंतांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. पण कलेच्या प्रेमापोटी प्रत्यक्ष जीवनातली सर्व दुःख बाजूला सारून हे कलाकार लोकांसमोर कलेचा आविष्कार सादर करत असतात.

सध्याच्या जमान्यात लावणीचे इतके कार्यक्रम होत नसले तरीही जुन्या काळात लावणीचे अस्सल कार्यक्रम रात्रभर रंगायचे.

आपण दोन – तीन तास कलाकारांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध होऊन जातो. परंतु या कलाकारांना पायातले घुंगरू काढल्यानंतर आणि चेहऱ्यावरचा रंग उतरवल्यानंतर कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं असेल याची आपण कल्पना करू शकत नाही.

ही कहाणी अशाच एका लावणीसम्राज्ञीची,

त्यांचं नाव लीला गांधी.

आता जरी लावणी कलेला समाजमान्यता मिळाली असली तरीही पूर्वीच्या काळी परिस्थिती काहीशी वेगळी होती. धनाढ्य, श्रीमंत व्यापारी पैसे उधळण्यासाठी आणि रात्र घालवण्यासाठी लावण्या बघायला जायचे. लावणी सादर करणाऱ्या महिलांना समाजात दुय्यम स्थान मिळायचं.

अशाच काळात एक नृत्यांगना स्वतःच्या कलाविष्काराने लावणी गावोगावी पोहोचवण्याचं काम करत होती. त्या लीला गांधी.

नव्या पिढीला लीला गांधी यांच्याविषयी सांगायचं झालं तर…

‘कुण्या गावाचं आलं पाखरू’, ‘ऐन दुपारी यमुनातीरी’, ‘बुगडी माझी सांडली गं’ ही लावणी प्रकारातली गाणी आजही लोकप्रिय आहेत. कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि विशेषत: लावण्यांच्या कार्यक्रमात कलाकार या लावण्यांवर हमखास नृत्य करताना दिसतात.

या लोकप्रिय लावण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे लीला गांधी यांनी.

जयश्री गडकर यांचा ‘सांगते ऐका’ या सिनेमातल्या सर्व गाण्यांची कोरियोग्राफी लीला गांधी यांनी केली आहे.

लीला गांधी यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून नृत्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं. त्यांच्यात असलेले नृत्याचे कलागुण मास्टर भगवान यांनी हेरले. आणि १९५१ साली ‘रंगेला’ या हिंदी सिनेमात त्यांना पहिल्यांदा नृत्याची अदाकारी दाखवण्याची संधी मिळाली. पुढे डान्समास्टर राजाभाऊ ठाकूर यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं.

त्या काळात मराठी सिनेमांची स्थिती काहीशी वेगळी होती. केवळ ६० हजार रुपयांमध्ये सिनेमे बनत असत. त्यामुळे कलावंतांना फार कमी पैसे मिळायचे. अशा वेळेस लीला गांधी स्टुडिओमध्ये पायी चालत जात.

त्यांना महिन्याला दीडशे रुपये बिदागी मिळायची.

१९५९ साली स्वतःची राजलक्ष्मी थिएटर ही नृत्य संस्था त्यांनी स्थापन केली. या संस्थेअंतर्गत त्यांचे सुरुवातीचे २५ कार्यक्रम हाऊसफुल झाले.

तर महाराष्ट्रभर केलेल्या अनेक कार्यक्रमाची रसिकांनी तारीफ केली. लोकं जरी भरपूर प्रशंसा करत असले तरी त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. कार्यक्रमांमध्ये मिळालेला पैसा त्यांनी कधी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला नाही.

घरच्या गरिबीमुळे त्यांचा पोटचा मुलगा दुधाअभावी काविळीने गेला. साहजिक त्यांना खूप दुःख झालं. परंतु नृत्याविषयी असलेलं प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.

शांताराम बापू आणि त्यांची पत्नी संध्या या दोघांचं लीला गांधी यांच्यावर प्रेम होतं. दोघेही लीला गांधी यांची विचारपूस करायचे.

लीला गांधी या कार्यक्रमाच्या सादरीकरणाची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायच्या. लावणीचे कार्यक्रम खूपदा मोकळ्या मैदानावर होत असत. पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये कार्यक्रम बंद व्हायचे. त्यामुळे खूपदा पैशांअभावी अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागायचं.

लीला गांधी यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण म्हणजे…

अनंत माने यांनी त्यांच्यावर ‘सांगते ऐका’ सिनेमाच्या कोरिओग्राफीची जबाबदारी सोपवली.

या सिनेमात जयश्री गडकर, हंसा वाडकर यांसारखे मोठे कलाकार होते. इतक्या मोठ्या कलाकारांना नृत्य शिकवण्याचं काहीसं दडपण लीला गांधी यांच्यावर होतं. परंतु या मोठ्या कलाकारांनी लीला गांधी यांना सांभाळून घेतलं आणि अगदी नम्रपणे या सर्वांनी लीला गांधी यांच्याकडून सिनेमासाठी नृत्य शिकून घेतलं.

याच सिनेमात ‘सांगा या वेडीला’ या सिनेमात लीला गांधी यांच्या नृत्याची अदाकारी पाहायला मिळते.

‘सांगते ऐका’, ‘पडछाया’ या सिनेमात लीला गांधी यांनी नृत्यदिग्दर्शन केलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. लावणीला समाजामध्ये मान्यता मिळावी, लोकाश्रय मिळावा यासाठी त्यांनी ‘लीला गांधी नृत्यदर्शन’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सादर केला.

खूपदा ज्या ठिकाणी त्या कार्यक्रम सादर करायच्या तिथे राहण्याची, जेवणाची व्यवस्था नीट नसायची. परंतु अशा गोष्टींची तमा न बाळगता त्यांनी लावणी या कलेचा प्रसार करण्याचं कार्य सुरू ठेवलं. पुढे शारीरिक व्याधींमुळे त्यांनी हा कार्यक्रम बंद केला.

वाट्याला आलेल्या खडतर परिस्थितीला सामोरं जाऊन लावणी आणि नृत्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या लीला गांधी यांना सलाम!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.