तिरंग्यावरनं शाहरुखला ट्रोल करताय पण त्याचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते हे विसरू नका

देशाचा स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्याचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानाची सुरवात केली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद देखील मिळाला. सामान्य नागरिक ते सेलेब्रिटी सगळे आपापल्या घरी तिरंगा फडकवत होते. यातलाच एक नाव होतं बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचं.

त्याने आपल्या सहकुटुंब त्याच्या घरावर म्हणजेच मन्नत बंगल्यावर तिरंगा फडकवला.

याचे फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले. सोशल मीडियावर आलाय म्हटल्यावर त्यावर दोन मतं नसणार असं कसं होईल. शाहरुखचे फॅन यामुळे जबरदस्त खुश होते तर बाकीचे मात्र शाहरुख हे सगळं पब्लिसिटीसाठी करत असल्याचं म्हटलं. त्यामुळं कोण चूक कोण बरोबर हे लागलीच कन्क्लुजन काढायच्या आधी शाहरुखच्या अब्बाजानचा हा किस्सा वाचा.

ऐतिहासिक पेशावर शहर. खैबरखिंडीची सुरवात होते इथूनच होते.  हजारोवर्षापासून भारताच्या ओढीने येणारे प्रवासी, व्यापारी उपखंडातलं पहिलं पाउल इथेचं ठेवायचे. इथून अफगाणिस्तान जवळ आहे.  या गावात पठाण लोक जास्त राहतात. तब्येतीत खातात, लाईफ एन्जॉय करतात. बटरचिकनचा वगैरे शोध याच गावात लागला आहे. याचा अर्थ इथे फक्त पठाण आहेत असं नाही. शिखांनी देखील या गावावर अनेक वर्ष राज्य केलंय.

हे गाव अनेक संस्कृतींच सरमिसळ आहे. एकेकाळी हिंदू मुसलमान सिख इथे गुण्यागोविंदाने राहायचे. या गावची दुसरी ओळख म्हणजे हे खादाडयासोबत गप्पिष्ट लोकांचही गाव आहे. इथल्या एका भागाला किस्सा खावन्की बाजार म्हणजेच गप्पा मारणाऱ्याचा भाग म्हणतात.

म्हणूनच काय या गावात बरेच कलाकार जन्माला आले. इथल्या दहकी नालबंदी नावाच्या मोहल्यात पृथ्वीराज कपूर राहायचे. तिथून जवळच हिंदी फिल्मइंडस्ट्रीचा सुपरस्टार दिलीपकुमारचं बालपण गेलं होत. राज कपूर दिलीपकुमारच्या घराजवळ एका छोट्याशा गल्लीत एक घर होत. शाहरुख खानच्या आजोबांचं घर.

मीर ताज महंमद म्हणजेच शाहरुख खानच्या वडिलांचा जन्म इथे झाला. मीर सगळ्यात धाकटे. त्यात दिसायला एखाद्या हिरो प्रमाणे देखणे. त्यामुळे सगळ्यांचे लाडके. त्यांच्या वडीलांचा बांबूचा व्यापार होता पण त्यात लक्ष नव्हत. सगळ लक्ष्य होतं स्वातंत्र्यलढ्यात.

खान अब्दुल गफ्फार खान म्हणजे ज्यांना अख्खं जग सरहद्द गांधी बादशहा खान या नावाने ओळखते असे नेते. त्यांनी या उंचनिंच तगड्या रगेल पठाणी तरुणांना अहिंसेच्या मार्गाला लावलं. या मार्गाने स्वातंत्र्यमिळू शकते हे पटवून दिल. शाहरुखचे आजोबा त्याचं अख्खं कुटुंब बादशहा खान यांच्या खुदा ई खिदमदगार या संघटनेसोबत ब्रिटिशासोबत सत्याग्रहाच्या माध्यमातून लढा देत होतं.

हीच परंपरा शाहरुखच्या वडिलांनी आणि काकांनीही पुढे चालू ठेवली. मीर महमदचे सर्वात मोठे भाऊ गामा हे तर पेशावरचे लोकप्रिय नेता होते.इंग्रजाविरुद्ध निषेध मोर्चे काढणे मेळावे भरवणे यात त्यांना धन्यता वाटे. स्वतः मीर हे उत्तम वक्ते होते. त्यांची जहाल व वीरश्री पूर्ण भाषणे ऐकण्यासाठी तुफान गर्दी लोटत असे. बादशाह खान या सगळ्यांसाठी देव होते.

१९४२ साली भारत छोडो आंदोलन सुरु झालं आणि स्वातंत्र्यलढ्याला हिंसक वळण लाभल. बॉम्ब फुटू लागले, सरकारी इमारतींची नासधूस होऊ लागली. इंग्रज सरकारने धरपकडीचं सत्र सुरु केलं.या रणधुमाळीत पेशावरच्या खैबर पख्तुन्वाला भागातील हजारो नागरिक मारले गेले. जवळपास साठ हजार जणांना अटक झाली. यात होते शाहरुखचे वडील मीर महंमद आणि काका दारा.

पुढे १९४६ पासून देशाच्या स्वातंत्र्याची चाहूल लागली होती. पण मोहम्मद अली जिना यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी पुढे ठेवली. यातून मुस्लीम बहुल सिंध, पंजाब, बलुचिस्तान या प्रांतात हिंसाचार उफाळला. बादशाह खान आणि खुदा ई खिदमदगारला मुसलमानांच्या वेगळ्या देशात सामील व्हायचं नव्हत.  म्हणून रागावलेल्या पाकिस्तानवाद्यांनी या पठाणांवरही हल्ले सुरु केले. 

याचा परिणाम पेशावरमध्ये होणे साहजिक होते. आधीच अटक झाल्यामुळे मीर महंमद यांची महत्वाची वर्षे जेलमध्ये वाया गेली होती. घरात कॉलेजपर्यंत पोहचलेला एकमेव मुलगा म्हणून त्यांच्या भावांना इच्छा होती की त्याला खूप शिकवायचं. पण पेशावर मधल्या वातावरणात ते अवघड होते. त्यामुळे त्याची रवानगी दिल्लीला करण्यात आली.

मीर ताज महंमद खान यांनी दिल्लीविद्यापिठात कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. वर्षभर झालं असेल तोवर १५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. सगळीकडे आनंद साजरा होत होता. पण हा आनंद निर्भेळ नव्हता. या खुशीला देशाच्या फाळणीच गालबोट लागलं होतं.

सर रॅडक्लिफ यांनी एक रेष आखून भारताचे दोन तुकडे केले होते. सरहद्दीच्या दोन्ही बाजूला हिंसाचाराचे आगडोंब उसळले. जवळपास ११ लाख कुटुंबे आपलं गाव आपला संसार सोडून विस्थापित झाली.  पाकिस्तानमधून हिंदू शीख कुटुंबे भारतात येत होती तर भारतातून मुस्लीम लोक पाकिस्तानला जात होते. दरम्यानच्या रस्त्यात दंगलीमध्ये हजारो लोक कापले जात होते. भारत पाकिस्तानच्या इतिहासातला सर्वात वाईट काळ म्हणता येईल.

पुढे कायम टिकलेल्या द्वेषाची, भीषण युद्धाची बीजे त्या रॅडक्लिफ रेषेने आखून ठेवली.

दिल्लीत देखील दंगल सुरु होती. पण या काळात दिल्ली युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी मीर महंमद जानचा जीव वाचवला. रोज रात्री त्याचे मित्र त्याच्या पलंगाभोवती वेढा मारून झोपायचे. त्याच्या खोलीबाहेर पहारा ठेवला जात होता. मीरचं आयुष्य या मित्रांच्या उपकाराखाली होत. यातच होता कन्हैयालाल पोसवाल.

मीरचं अख्खं कुटुंब त्याच गाव पाकिस्तानमध्ये राहिलं होतं. तो भारतात अडकला होता. तेव्हा त्याच रक्त सळसळत होतं. गांधीजी, खान अब्दुल गफार खान यांच्या विचाराने भरवलेला हा तरुण त्याला पाकिस्तानमध्ये जायची इच्छा देखील नव्हती. त्याकाळी त्याला आदर्शवादी स्वप्न पडत होतं की हा सगळा घोळ काही वर्षात शांत होईल आणि दोन्ही देश परत एक होतील.

म्हणून मीर भारतातचं थांबला. त्याने आपलं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. कन्हैयालाल च्या घरात त्याने आसरा घेतला होता. हा कन्हैयालाल पुढे राजकारणात गेला आणि मंत्री देखील झाला . मीरला सुद्धा दिल्लीत वकिली करून राहता आलं असत. स्वातंत्र्यलढ्यात असल्यामुळे राजकारणात देखील हातपाय मारता आलं असत. पण मीरच्या डोक्यात मात्र वेगळच चाललेलं.

१९५०च्या दशकात तो दिल्ली सोडून मुंबईला आला. हिरो बनण्यासाठी.

पेशावरच्या प्रत्येक लहानमोठ्या मुलाप्रमाणे मीर महंमदला देखील हिरो व्हायचं होत. पण तेव्हा त्याला काम द्याव असं कोणीही ओळखीचं नव्हत, न कोणता वशिला होता. मुंबईच्या रस्त्यावर झोपून त्याने स्ट्रगल केला. नाही म्हणायला के असिफच्या महत्वाकांक्षी मुघल ए आझम या सिनेमात गाववाले पृथ्वीराजकपूर, दिलीपकुमार यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. पण अभिनयाच्या बाबतीत गाडी शून्य असल्यामुळे एका आठवड्यात सिनेमातून बाहेर काढलं गेलं.

अखेर कन्हैयालालने मुंबईला येऊन त्याची समजूत काढली आणि मीर महमद मुंबईच्या स्वप्ननगरीला अश्रुभरल्या नयनांनी बायबाय करत परत दिल्लीला आले.

मीर ताज महंमद दिल्लीला परत आले. तोपर्यंत त्यांचे पाकिस्तानला आपल्या कुटुंबाकडे जाण्याचे रस्ते देखील बंद झाले होते. पाकिस्तानच्या नव्या सरकारने खान अब्दुल गफार खान यांच्या संघटनेच्या व कॉंग्रेसच्या लढ्यात सहभागी असणाऱ्यांना भारतवादी ठरवून पाकिस्तानात प्रवेशबंदी घातली होती.

मीर महंमद भारतातच राहिले. इथेच एका फातिमा नावाच्या मुलीशी त्यांनी विवाह केला. त्यांना दोन गोंडस मुले झाली. त्यात होता शाहरुख खान. त्यांनी अनेक बिझनेस करून पाहिले पण यातले कोणते चालले नाही. पुढे काही वर्षे त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा च्या कँटीनचं कॉण्ट्रॅक्ट मिळालं. तिथे कायम सुरु असलेली नाटके बघून शाहरुखवर अभिनयाचे संस्कार झाले.

शाहरुख खान लहान असताना मीर महंमद यांनी खूप वर्षे प्रयत्न करून पाकिस्तानचा व्हिसा मिळवला. त्याला आपलं गाव आपली माणसे भेटवायला घेऊन गेले. सुरवातीला तर त्यांच खूप स्वागत झालं. छोट्या शाहरुखचं त्याच्या आजोबाच्या घरात खूप कोड कौतुक झालं. पण परत जेव्हा काही वर्षांनी ते परत पाकिस्तानला गेले तेव्हा त्यांना जुना जिव्हाळा, आपलेपणा जाणवला नाही. शहारुखने कारण विचारताच कोणीतरी सांगितलं,

“मागच्या वेळी तुझ्या पाहुण्यांना तुझ्या वडिलांनी प्रोपर्टीवरचा हक्क सोडायला लावायचा होता. म्हणून सगळे तुझ्याशी गोड वागले. पण मतलब साधल्यावर गोड वागायचा काय संबंध? “

या घटनेन मीर महंमद यांना धक्का बसला. आपली माणसे आपली राहिली नाहीत यामुळे त्यांना आतल्या आत खात राहिले. यातच त्यांना कॅन्सर झाला आणि भारतात आलेल्याला काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.

मीर महमद खान हे सच्चे भारतीय होते, शेवटपर्यंत भारतीय राहिले. त्यांचं हिरो व्हायच स्वप्न चाळीस वर्षांनी त्यांच्या मुलान पूर्ण केलं. आजही शाहरुखला कोणी म्हणाले की भारत देश सोडून पाकिस्तानला जा तेव्हा तो चिडून उत्तर देतो,

“अगर वो मेरा देश होता तो मेरे पिता उसे छोडकर यहा नही आते. सब मुसलमान पाकिस्तान को जा रहे थे तब मेरे वालीद दुनिया से लडकर भारत मै रुके. अंग्रेजोको देश को भगा दिया. मै उसं शेर का बच्चा हुं. मेरा देश छोडकर थोडेही जाउंगा.”

source: King of Bollywood: Shah Rukh Khan and the Seductive World of Indian Cinema by anupama chopra

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.