सात वेळा मरून जिवंत झालेला अंडरटेकर रिटायर होतोय यावर आपला तरी विश्वास बसत नाही

आज कालच्या WWE मध्ये मजा नाही राहिली. खरी मजा यायची जेव्हा ती WWF होती. पडद्यावरची ही हिंसक कुस्ती बघणं घरच्यांना पसंत नसायचं तरी आपण टीव्ही ला चिकटून WWF बघायचो.

ही कुस्ती खरी असते असे वाटण्याचा तो निरागस काळ होता. द रॉक तेव्हा अजून पिक्चर मध्ये गेला नव्हता. हल्क होगन सारखे सुपरस्टार हळूहळू गायब झाले होते. जॉन सीना अजून बच्चा होता. रे मिस्टेरीओ बद्दलची मिस्ट्री कायम होती. शॉन मायकल, स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन, ट्रिपल एच सारखे रेसलर रिंगवर राज्य करायचे आणि हो केन न तेव्हा मास्क काढलं नव्हतं या सगळ्यांमध्ये मात्र एक रेसलर असा होता की ज्याच्या येण्यान सगळ्यांचीच फाटायची.

त्याचं नांव “द अंडरटेकर.” 

प्रेक्षागृहात सर्वत्र अंधार झाला की ओळखायचं की “तो” येतोय. त्याच्या एन्ट्री पूर्वी घंटा वाजायची. लाईट आली की काळ्या कपड्यातला पांढऱ्या डोळ्याचा काळी टोपी घालून स्टायलिश बाईक वर बसलेला तो दिसायचा. इतर रेसलर प्रमाणे त्याच्या सोबत मादक पोरी असायच्या नाहीत.

विशिष्ट असं गूढ संगीत वाजू लागलं आणि तो रिंग च्या दिशेन निघाला की विरोधी रेसलरच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसायची. कारणच होत तसं. त्याच्यासारखी धुलाई कोणीच करायचं नाही. कधी त्याला डायलॉगबाजी करायची गरज पडायची नाही. कधी बोललाच तर त्याच्या खर्जातल्या आवाजात तो प्रतिस्पर्धीला उत्तर द्यायचा. 

त्याचा दराराच इतका असायचा की त्याच्या असण्यान निम्मी लढाई जिंकली असायची. झटपट कुस्ती संपवून आला तसा अंधारात तो निघून जायचा. त्यानं मॅच हरलेलं कधी आठवतचं नाही.

त्याला जमिनीत गाडला तरी तो वर येतो – 

अंडरटेकर बद्दल अनेक दंतकथा होत्या. त्याला जमिनीत गाडल तरी तो वर येतो. त्याला आग ही काही करू शकत नाही. कोणी म्हणायचं की तो सातवेळा मरून जिवंत झाला आहे तर कोणी सांगायचं की अंडरटेकर कधी मरू शकत नाही कारण तो DEADMAN आहे. मग त्याला कोणी कसं हरवू शकणार ? त्याला हरवण्यासाठी काही ना काही चीटिंगच करावी लागायची.

अंडरटेकरचा सावत्र भाऊ केन. त्याचं तोंड अंडरटेकरने जाळलय आणि त्यामुळे केन नेहमी मास्क घालतो. ही गोष्ट सांगीतली की लहान भावंड अंथरून ओली करायची.

एकदा योकोझुनाने त्याला हरवलं आणि आपल्या सहकाऱ्यांचा सहायाने अंडरटेकरला शवपेटीत घालून त्यावर खिळा ठोकला. त्यानंतर काही महिने तो गायब होता. सगळ्यांना वाटलं तो संपला. मध्यंतरी त्याचा ड्यूप्लीकेट येऊन गेला. मग अंडरटेकरच WWF मध्ये आगमन झालं ते शवपेटीतच.  आल्या आल्या त्याने योकोझुनाचा बदला घेतला.  तिथून पुढे तो त्या शवपेटीतच येऊ लागला.

Screen Shot 2018 09 21 at 7.19.54 PM

त्या शवपेटीसोबत हातात कंदील घेतलेला त्याचा मॅनेजर असायचा.”पॉल बेअरर”.

याच पॉल ने अंडरटेकर ला मॅनकाइंड सोबतच्या सामन्यात धोका दिला.पुढे सगळ्या रेसलरनी मिळून अंडरटेकरला जमिनीत गाडले.

पुढच्या सिझनला अंडरटेकर मॅनकाइंड सोबतच्या मॅचसाठी परत आला मात्र यावेळी त्याच बक्षीस होत पॉल बेअरर. पॉल ला २०फूट उंचीच्या तुरुंगात टांगलेलं. बदल्याच्या आगीत धुमसणाऱ्या अंडरटेकर ने मॅनकाइंड ला हरवलं पण पॉल त्याच्या हातातून सुटून पळून गेला.

अंडरटेकर चे हजारो किस्से आहेत. रेसेल मेनिया मध्ये २१ सलग लढती जिंकण्याचा विक्रम केलाय. ४ वेळा वर्ल्ड चॅम्पियन होता. गेली साधारण तीन दशके तो दर्शकांच मनोरंजन करतोय.

भारतातही त्याची प्रसिद्धी अफाट आहे. खिलाडीयोंका खिलाडी या पिक्चर मध्ये  जेव्हा अक्षयकुमार अंडरटेकरची पिटाई करताना दिसला तेव्हा त्याच्या बद्दलचा आदर वाढला होता. नंतर कळाल की तो ड्यूप्लीकेट होता. कार्ड गेम्स असू दे की व्हिडीओ गेम्स. कायम फेवरेट अंडरटेकरच होता.

“मार्क कॅलवे” हे त्याचं खर नांव.

कॉलेजमध्ये असताना त्याला बास्केटबॉलपटू व्हायचं होत. खेळायचा ही तो सुंदर पण आयुष्याच्या वळणावर तो रेसलिंगमध्ये आला. आजही त्याचा दरारा तितकाच कायम आहे.तो खऱ्या आयुष्यात अतिशय शांत आहे. समाजकार्यात तो नेहमी सहभाग घेतो. प्राण्यांच्या रक्षणासाठी तो विशेष काम करतो.

२०१७ च्या एप्रिल मध्ये त्याने रिटायरमेंट जाहीर केली होती. मात्र मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बातमी आली की तो परत येतोय. त्याची ट्रिपल एच सोबत मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे कमबॅक मॅच झाली, तीच नाव होतं , “The Last Time ever”. रिंगसाइड ला केन आणि शॉन मायकल सुद्धा होते.

आठवणीचा उजाळा देणारी ही मॅच ६ ऑक्टोबरला झाली. कधीही न हरणारा अंडरटेकर हरला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातही अंडरटेकर आणि केन ही जोडी आपल्या जुन्या brothers of destruction नावाने रिंगणात उतरले. पण तिथेही त्यांना हार सहन करावी लागली.

अंडरटेकरला हरताना पाहावलं नाही. आमच्या आठवणीमध्ये कधीही न हरणारा, गाडल तरी तिथून बाहेर येणारा, सातवेळा मरून जिवंत झालेला अंडरटेकर अमर होता. त्याने रिटायरमेंट नंतर परत यायला नको होतं असंच काहीजणांना वाटत होतं.

तस त्याने वयोमानानुसार रेसलिंग कमी केली होती मात्र अधून मधून सरप्राईज व्हिजिट द्यायचा, नव्या भिडूंना बडवून आपली दहशत कायम ठेवून जायचा.

काल मात्र त्याने फायनली डब्ल्यू डब्ल्यू ई ला शेवटचा अलविदा केला. तो दिवस त्याच्या जगभरातल्या फॅन्सनी अंडर टेकर साठी सेलिब्रेट केला. न्यूयॉर्क मॅडिसन स्क्वेअरमध्ये त्याचे बॅनर लागले होते.

सर्व्हायव्हर सिरीज च्या शेवटच्या एपिसोड मध्ये तो आला. नेहमी धडकी भरवणारा त्याचा आवाज काल थोडासा हळवा झाला होता.

“My time has come to let The Undertaker Rest in Peace.”

अंडर टेकर किती जरी म्हणू दे पण तो पुन्हा मरून पुन्हा येईल अशीच आपल्या मनाची तरी खात्री आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू –  

Leave A Reply

Your email address will not be published.