सेटवरच्या सांगकाम्या म्हणून असलेल्या पोरानं भारतीय सिनेमाला रंगीबेरंगी रूप दिलं…

सिनेमा हा विषय म्हणजे आपल्या सगळ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. थेटरात जाऊन सिनेमा पाहणारे कट्टर सिनेप्रेमी एका बाजूला तर सध्या ओटीटीवर रात्रीतून वेबसिरीज संपवणारे कार्यकर्ते एका बाजूला. पण भारतीय सिनेमाला रंगीत स्वरूप कुणी दिलं, समीक्षक लोकं जेव्हा सिनेमाच्या कलर कॉम्बिनेशन वर टीका टिप्पणी करत असतात तेव्हा एक प्रश्न पडणं साहजिकच असतं की सिनेमाला रंगीबेरंगी केलं कोणी ? ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना घालवणारा कोण सिनेमा शौकीन होता तर अशाच एका महान हिरो,दिग्दर्शक आणि बऱ्याच गुणांचा महामेरू असणाऱ्या कलाकाराबद्दल जाणून घेऊया.

सिनेमा हा राष्ट्रीय असो किंवा आंतराष्ट्रीय पण पूर्ण जगात व्ही शांताराम यांच्यासारख्या कलावंत झाला नाही. एक परिपूर्ण अभिनेता, दिग्दर्शक, एडिटर अशी बहुमुखी कला व्ही शांताराम यांच्याकडे होती. व्ही शांताराम यांनी सिनेमा कसा असावा याची एक स्वतंत्र शैली निर्माण केली आणि सिनेमाचं व्याकरण इथून सुरू झालं. हुकूमशाहीविरुद्ध संघर्ष असणारा सिनेमा असो किंवा समाजातील अनेक प्रश्नांची चिरफाड करणारे सिनेमे असो अशा अनेक गोष्टींना एक अर्थपूर्ण रूप व्ही शांताराम यांनी दिलं.

सिनेमात टेक्निकल टीम आणि एकदम परफेक्ट टेक्निकल वर्क याचे उद्गातेसुद्धा व्ही शांताराम मानले जातात आणि सोबतच भारतीय सिनेमाला रंगीत दिवस दाखवण्याचा मान सुद्धा व्ही शांताराम यांनाच जातो. आता जसे हिरो लोकं सेलिब्रिटी असतात ना तस व्ही शांताराम तेव्हा दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध सेलिब्रिटी होते. बोलपटांच्या काळात त्यांनी स्वतःचा एक जॉनर तयार केला. आपल्या दिर्घकार्यकाळात व्ही शांताराम यांनी 92 सिनेमांची निर्मिती केली, 55 सिनेमांचं दिग्दर्शन केलं तर 25 सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.

18 नोव्हेंबर 1901 साली शांताराम राजाराम वाणकुद्रे यांचा जन्म झाला. वडील राजाराम हे एक गरीब दुकानदार होते आणि संगीत नाटकांच्या प्रयोगात पेट्रोमॅक्सचे कंदील विकत असे. शाळेत काय व्ही शांताराम यांचं मन रमत नसायचं म्हणून ते जास्त खोडकर निपजले. एकदा शाळेत मिमिक्री करताना गोविंदराव टेंबे यांनी त्यांना बघितलं आणि बालगंधर्व यांच्या गंधर्व नाटक कंपनीत भरती केलं. तिथं ते सेटवर सांगकाम्या पोरगा म्हणून काम करू लागले तेही पाच रुपयाच्या रोजगाराने.

पण नाटक कंपनीत असताना लवकरच व्ही शांताराम यांना कळलं की ना आपल्याला वाजवता, गाता येतं ना आपल्याला अभिनय करता येतो म्हणून ते तिथून तडक निघाले आणि पुन्हा शाळेत जाऊ लागले. किशोरवयीन काळात एका मित्राने व्ही शांताराम यांना रेल्वे वर्कशॉपमध्ये नोकरी मिळवून दिली. त्यामुळे आर्थिक स्थैर्य आलं. पुढे बाबुराव पेंटर यांच्याशी भेट झाल्यावर पाच जणांनी मिळून प्रभात फिल्म कंपनी सुरू केली. 1927 साली नेताजी पालकर यांच्यावर सिनेमा बनला त्याचं दिग्दर्शन व्ही शांताराम यांनी केलं होतं.

1931 साली स्वराज्याचे तोरण हा सिनेमा आला याचंही दिग्दर्शन व्ही शांताराम यांनी केलं आणि यात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिकाही रंगवली. आलम आरा आल्यानंतर व्ही शांताराम यांनी मराठी बोलपट म्हणून अयोध्येचा राजा हा सिनेमा बनवला. नंतर अग्निकंकण, माया मच्छिंद्र असे एकूण आठ सिनेमे त्याकाळात बनवले. अमृत मंथन, अमर ज्योती,दुनिया न माने, आदमी, दो आंखे बारा हात, कुंकू,पिंजरा अश्या माईलस्टोन सिनेमांची निर्मिती व्ही शांताराम यांनी केली.

एका सिनेमावेड्या माणसाने भारतीय सिनेमाची दिशा बदलवून टाकली होती आणि तो महान व्यक्ती म्हणून ओळखले जातात व्ही शांताराम…!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.