सुपर हिरोंचा बापमाणूस..!

धुमधडाका मधल्या अशोक सराफ च्या शब्दात सांगायचं झालं तर, “आपण अति सामान्य आयुष्य जगत असतो. अशा या आपल्या अतिसामान्य आयुष्यात आपल्या काही सुपरपॉवरची स्वप्नं असतात. ती कधी प्रत्यक्षात येणार नाही हे आपल्यालाही माहित असते पण मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या या कल्पनांना आपण कधी पंख लावत असतो तर कधी पर्वत उचलून फेकत असतो.”

स्टॅन लीने अशी अतिसामान्यांच्या स्वप्नांचं एक व्हर्चुअल विश्व बनवलं,

मार्व्हल युनिव्हर्स.

स्पायडरमॅन, हल्क, आयर्नमन, थॉर, एक्स मेन, कॅप्टन अमेरिका असे हे अनेक सुपरहिरो हे स्टॅन ली यांचे मानसपुत्र. मार्व्हल कॉमिक्सच्या या विश्वातल्या सुपरहिरोनी अख्ख्या जगभरात वेड लावलं.

स्टॅन ली म्हणजेच स्टॅनली मार्टिन लायबर. न्यूयॉर्क मध्ये जन्मलेला स्टॅनली आपल्या मावसबहिणीच्या वशिल्याने तिच्या नवऱ्याच्या कॉमिक्सच्या ऑफिस मध्ये नोकरीला लागला. तिथे कर्मचाऱ्याना डब्बे देण्यापासून ते कॉमिक्स रंगवणाऱ्याच्या पेन मध्ये शाई भरणाऱ्या पर्यंत पडेल ती काम केली. दुसऱ्या महायुद्धात सैनिक म्हणून ही गेला. तिथं सुद्धा आपली कलात्मक दृष्टी मरू दिली नाही. परत आल्यावर मात्र अखेर या होतकरू तरुणाला मार्व्हलमध्ये क्रिएटीव्ह रायटरची जबाबदारी मिळाली .

त्या काळात कॉमिक्स क्षेत्रात एकप्रकारची स्तब्धता आली होती. लहान मुलांच्या गोष्टी म्हणून या इंडस्ट्रीकडे कोणी सिरीयसली बघत नव्हते. कोणतेही नवीन प्रयोग होत नव्हते. जुन्या स्टोर्या चित्रमालिकेच्या स्वरुपात येत होत्या. स्टॅन लीला तो पर्यंत या इंडस्ट्रीचा कंटाळा आला होता. त्याला नवीन क्षेत्रात हातपाय मारायची इच्छा झाली होती. मार्व्हलचा सर्वेसर्वा स्टॅन लीचा भावोजी मार्टिन गुडमन हा होता. त्याने कॉमिक्स मध्ये क्रांन्ती करण्याची जबाबदारी स्टॅनलीकडे दिली.

सुपरहिरो म्हणजे आदर्श मर्यादा पुरूषोत्तम. त्यांच्या शक्तीला कोणीही आव्हान देऊ शकत नाही वगैरे गोष्टी स्टॅन लीने कालबाह्य केल्या.

जॅक किर्बी या ग्राफिक्स आर्टीस्टला सोबत घेऊन स्टॅन लीने अनेक नवीन सुपरहिरो जन्माला घातले. हे सुपरहिरो  महामानव असले तरी त्यानाही मानवी भावभावना असलेले होते. त्यांच्यातही राग लोभ सारखे गुण दोष होते आणि मुख्य म्हणजे ते अजातशत्रू नव्हते. त्यानाही हरवता येऊ शकत होत. या नव्या कल्पनामुळे काय झालं की हे सगळे अतिप्रचंड ताकद असणारे सुपरहिरो हे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या जास्त जवळ आले.

राग आल्यावर हिरवा होणारा अफाट शक्तीचा आवरता न येणारा हल्क, अतिश्रीमंत अतिबुद्धिमान पण प्लेबॉय असलेला टोनी स्टार्क स्वतः डोके लढवून सुपरहिरो सूट बनवतो आणि सामन्य माणसापासून आयर्नमॅन बनतो, कॉलेजला जाणारा ढापण्या पीटर पार्कर कोळी किडा चावल्यावर त्याची शक्ती मिळून स्पायडरमॅन बनतो.

सुरवातीला त्याला आपल्या मिळालेल्या शक्तींची किंमत कळत नाही पण त्याचे काका त्याच्या चुकीमुळे मेल्यावर स्पायडरमॅनच्या शक्तींची जबाबदारी त्याला समजते. अशा एक ना अनेक गोष्टी स्टॅन लीनी रचल्या.

फक्त सुपरहिरोच नाही तर कॉमिक्समधल्या खलनायकांना सुद्धा त्यांनी मानवी रूप दिले. त्यांना सुपरहिरोच्या तोडीस तोड ताकद दिली. खऱ्या अर्थाने ज्यांना सुपरव्हिलन म्हणावं असे थॅनोस, डॉ.डूम, रेड स्कल, ग्रीन गोब्लीन असे खलनायक रंगवले. कारण खलनायक जर शक्तिशाली नसेल तर हिरोचा जिंकण्यासाठीचा संघर्ष दिसणार नाही आणि त्याच्या विजयाला अर्थ राहणार नाही.

एके काळी सुपरहिरो आणि कॉमिक्स हे फक्त लहानमुलांनी वाचायची गोष्ट आहे अशी समजूत होती. पण स्टॅन ली यांच्यामुळे या संकल्पनेला छेद दिला गेला.

कॉमिक्सच विश्व तरुणाई पर्यंत पोहचवल.  फक्त गोष्टीवेल्हाळ परीकथा  न राहता कॉमिक्सला विज्ञान तंत्रज्ञानाशी  त्यांनी जोडलं.जर्मनीमधल्या अलिशान बुकस्टोअरपासून ते  परभणीच्या बसस्टँडवरच्या छोट्या पुस्तकाच्या दुकानापर्यंत सगळी कडे हे मार्व्हल कॉमिक्स खपू लागले.

फँन्टास्टिक फोर, एक्समेन, अव्हेंजरस सारख्या सुपरहिरोच्या टीमच्या माध्यमातून स्टॅन लीने फक्त मनोरंजनच नाही तर सामाजिक राजकीय भाष्य करण्यास सुरवात केली. ब्लॅक पँथर सारखा पहिला निग्रो सुपरहिरो ही सुद्धा स्टॅनली यांची कल्पना. भारतात सुद्धा चक्र नावाचा अस्सल भारतीय सुपरहिरो त्यांनी सादर केला. त्यांच्या कॉमिक्स मध्ये कायम वर्णभेद, साम्राज्यवादातून होणारा अन्याय, असत्याविरुद्ध वाचा फोडली होती. नेहमी एकदा चांगला संदेश आपल्या कॉमिक्स मधून दिला जाण्याकडे स्टॅन ली यांचा कटाक्ष असायचा. यामुळे मुलांच्या पालकांमध्ये ही मार्व्हल लोकप्रिय होता.

काळानुरूप बदल हे स्टॅन ली यांचे आणखी एक वैशिट्य ठरले. जो थांबला तो संपला हे त्यांचे सूत्र होते. कॉमिक्स हे चित्रपटरुपात मोठ्या स्क्रिनवर दिसू लागले. स्टॅन ली यांचा उत्साह तेव्हा सुद्धा कायम असायचा. मार्व्हल कॉमिक्स वर बनलेल्या आता पर्यंतच्या सगळ्या चित्रपटामध्ये त्यांनी काही सेकंदासाठी का असेना दर्शन दिले.

कायम  व्यवसायाच्या आर्थिक गणितापेक्षा कॉमिक्समधल्या कथा लिहिण्यामध्ये रमणारा हा सुपरहिरोचा महानायक मागच्या वर्षी १२ नोव्हेंबरला वयाच्या ९५ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला. कॉमिक्सचा एकमात्र लिजंड सगळ्या सुपरहिरो बरोबरच जगाच्या कानाकोपऱ्यातल्या फॅन्सना पोरका करून गेला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.