लेनिनचे पुतळे पाडले मात्र आजही शास्त्रीजींचा पुतळा उझबेकिस्तानमध्ये अभिमानाने उभा आहे..

भारताचे लालबहादूर शास्त्री म्हणजे एक आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांच्या साधेपणाचे प्रामाणिक पणाचे आणि राष्ट्रभक्तीचे अनेक किस्से आपणाला ठाऊक आहेत. पण त्यांचा एक पुतळा उझबेकिस्तान देशात उभारण्यात आलाय हे तुम्हाला ठाऊक आहे का?

मध्य आशियातील महत्वाचा देश उझबेकिस्तान. मुघलांची जन्मभूमी. तैमूर सारखा क्रूर शासक याच भूमीत जन्माला आला. मुस्लिम लोकसंख्या असणारा हा देश एकेकाळी सोव्हिएत रशियन साम्राज्याचा भाग होता. मात्र या देशाची संस्कृती आणि रशियन संस्कृती पूर्णतः वेगवेगळी होती. रशियाच्या शासनाखाली तिथली जनता खुश नव्हती.

१९६५ साली भारत पाकिस्तानमध्ये मोठं युद्ध छेडलं गेलं. चीन कडून पराभूत झालेल्या भारताला सहज हरवता येईल असं वाटून पाकिस्तानने हल्ला केला होता. त्यावेळचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाणांच्या साहायाने रणनीती आखली. भारताच्या जवानांनी पाकिस्तनला चोख उत्तर दिलं. अमेरिकन मदतीच्या पॅटन रणगाडयांना स्मशानात रूपांतरित केले.

भारताची आर्मी सीमापार पोहचली होती. मनात आणलं असत तर लाहोर देखील सहज जिंकता येणे शक्य होते. पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताला माघार घ्यावी लागली. तेव्हा या युद्धामुळे जगात अमेरिका रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा स्फोट होऊन जगात तिसरं महायुद्ध सुरु होण्याची शक्यता बोलली गेली.

अखेर भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री पाकिस्तानसोबत शांततेचा करार करण्यास तयार झाले. सोव्हिएत रशियाने हा करार करण्यासाठी ठिकाण निवडले उझबेकिस्तान मधील ताश्कंद.

ताश्कंद हे उझबेकिस्तानमधील सर्वात मोठे शहर.

४ ते १० जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे झालेली ही बठक संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली झाली. सोव्हिएत युनियनचे प्रमुख अलेक्सी कोसिजीन यांच्या आग्रहानंतर भारत आणि पाकिस्तानने या युद्धात परस्परांच्या घेतलेल्या प्रदेशांवरील हक्क सोडून १९४९ साली नक्की केलेल्या युद्धबंदी रेषेपर्यंत माघार घेतली.

ताश्कंदच्या या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी, ११ जानेवारी १९६६ रोजी एक दु:खद घटना घडली. भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन त्यांचे अकस्मात निधन झाले.

फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगभरासाठी हा मोठा धक्का होता. शास्त्रीजींच्या निधनामागे घातपात असण्याची शक्यता असल्याचं बोललं गेलं. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेपासून ते भारतातील राजकीय प्रतिस्पर्धी पर्यंत अनेकांचा या हात असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण तसे कधी सिद्ध झाले नाही.

उझबेकी जनतेला देखील या महान नेत्याचा आपल्या भूमीत मृत्यू झाल्याचं दुःख झालं. आपल्या स्मितहास्य आणि नम्र वृत्तीने तिथल्या लोकांची देखील मने जिंकली होती. शास्त्रीजींच्या स्मृती जपण्यासाठी सोव्हिएत सरकारने ताश्कंद मध्ये त्यांचा एक पुतळा उभा केला आणि एका रस्त्याला देखील त्यांचं नाव दिलं. 

मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं.

जवळपास ऐंशी वर्ष राज्य केल्यावर कम्युनिज्मच्या पडत्या काळात रशियाने उझबेकिस्तानवरील सत्ता गमावली. १९९१ साली हा देश स्वतंत्र झाला. त्यांनी आपलं सार्वभौम सरकार स्थापन केलं. या नव्या सरकारने स्वातंत्र्यानंतर लगेच जागतिकीकरणाचा स्वीकार केला.  रशियन राजवटीच्या खुणा पुसण्यास सुरवात केली.

याचाच भाग म्हणून देशात रशियाने उभे केलेले पुतळे पाडण्यास सुरवात केली. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि साम्यवादी क्रांतीचे जनक व्लादिमिर लेनिन यांचा भला मोठा  पुतळा उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमधल्या मुख्य चौकात उभा होता. उझबेकिस्तानने तो पुतळा पाडून तिथे स्वातंत्र्य चौक बनवला. काही वर्षातच तिथे स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा देखील उभा करण्यात आला.

आजही ध्वजारोहणापासून ते लष्करी संचलनापर्यंत देशातील प्रमुख कार्यक्रम याच चौकात साजरे केले जातात. 

उझबेकिस्तानमधील नवीन पिढी जुन्या सरकारच्या कोणत्याही आठवणीचा भार वाहण्यास तयार नाही. त्यांनी त्याकाळातले सर्व स्मारके तोडून टाकले आहेत. पुस्तकातून धडे गायब झाले, रस्त्यांची नावे बदलली गेली. देशाची मुस्लिम आयडेंटिटी जपण्याकडे देखील तरुणाईचा ओढा असलेलं पाहावयास मिळते.

फक्त एक पुतळा यातून वाचला तो म्हणजे लालबहादूर शास्त्री यांचा.

१९७६ साली रशियन सरकारने याची निर्मिती केली होती. तेव्हापासून लालबहादूर शास्त्री यांची जयंती पुण्यतिथी तिथे साजरी केली जाते. सरकारे बदलली तरी ही परंपरा कायम राहिली. आजही उझबेकिस्तानमध्ये हा सोहळा उत्साहात साजरा केला जातो. भारतातून पंतप्रधान किंवा इतर कोणतीही महत्वाची व्यक्ती उझबेकिस्तान दौऱ्यावर गेली तर ते या पुतळ्याला हमखास भेट देतात. भारत उझबेकिस्तान या दोन्ही देशातील मैत्रीचे प्रतीक म्हणून शास्त्रीजींच्या पुतळ्याला ओळखलं जातं.

कालच हा पुतळा उभारणाऱ्या शिल्पकाराचे याकोव्ह शापिरो याचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.