पोलीस पाटलांच्या झटापटीत बिबट्या खल्लास !!!
कस काय पाटील खरं हाय का ?? काल काय ऐकलं ती खरं हाय का ???
पाटलांना फोन करु करु सगळी लोकं हेच विचाराय लागल्यात. त्याचं कारण पण तितकचं खतरनाक आहे.
तर किस्सा प्लस बातमी अशी की,
गडचिरोली जिल्हातील कोरची गावचे पोलीस पाटील जुमैन चमाजी काटेंगे वय वर्ष ३५ हे रोजच्या प्रमाणे प्रात:विधीसाठी गावाशेजारी असणाऱ्या पांदी अर्थात बांधा शेजारी गेले. पहाटेच्या गारव्यात मोकळं होण्याची त्यांची रोजची सवय. शिवाय पहाटे पहाटे जावून आल्यामुळे आपल्या घरात संडास नसल्याची बातमी देखील मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाणार नाही आणि सीएम साहेबांच लक्ष्य पण पुर्ण होईल असा त्यांचा दुहेरी हेतू.
तर पोलीस पाटील काटेंगे पहाटेच्या गारव्या डालड्याचा डब्बा घेवून पांदींच्या दिशेने चालेल होते. आपल्या नेहमीच्या संरक्षीत स्थळावर पोहचल्यानंतर त्यांनी डब्बा बाजूला ठेवला. आत्ता मनाला शांती मिळेल या विचारात ते असतानाचं त्यांना समोर दिसला तो दोन वर्षांचा बिबट्या.
माणूस काय करतोय, आत्ता त्याला डिस्टर्ब करावं का ? मुख्यमंत्र्यांच्या हागदारी मुक्त योजनेचं काय होईल ? अशा कोणत्याही प्रश्नांची तमा न बाळगतां या बिबट्याने थेट पोलिस पाटलांवर झेप घेतली. पोलिस पाटील पण काही कच्चे नव्हते. घरात संडास नसताना त्यांनी पोलिस पाटील पद मिळवलेलं तर हा दोन वर्षाचा बिबट्या काय जिझएं. पोलिस पाटलांनी थेट बिबट्यांच्या नरड्याचा घोट घेतलां. चांगली अर्धा तास झुंज चालली आणि शेवटी बिबट्या शहीद झालां.
आज पाटलांना जरा जास्तच वेळ लागलां म्हणून पाटलांचा लहान भाऊ पाटलांचा उरकलं ते पहायलां पांदिकडे आलां. त्यानं पाहीलं पाटील रक्ताने माखले आहेत. तर त्याच्या शेजारी डालड्याची बाटली आडवी झाली आहे. पाटलांच्या भावाने पहिला पाटलांना उचललं आणि दवाखान्यात दाखलं केलं.
त्यानंतर नेहमीप्रमाणे वनअधिकारी आले. त्यांनी रितसर पंचनामा केला. जवळपास शोधाशोध केली बिबट्याचा मृतदेह सापडलां त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि झालं गेलं विसरुन पाटलांना पाच हजार रुपयांची मदत जाहिर करण्यात आली.
सध्या गडचिरोली परिसरात जुमैन काटेंगे यांनी पाटील स्टाईल काटेंगे टक्कर देवून बिबट्याला खल्लास केल्याची बातमी एक नंबरला चर्चेत असून त्यानंतर लोकप्रिय बातमी म्हणून अजूनही मुख्यमंत्र्यांच्या नदी बचाव व्हिडीओला स्थान असल्याचं दिसून येत आहे.