जगतसुंदरी किताब मिळवो न मिळवो, ती बॉलीवूडमध्ये येणार ही गोष्ट पक्की होती.

अनिल कपूरच्या ‘पुकार’ मध्ये माधुरी वैतागून नम्रता शिरोडकरला प्लास्टिक ब्युटी म्हणते. खरंतर त्या रोलला ऐश्वर्याच जास्त शोभली असती आणि डायलॉग बदलून प्लास्टिक ऐवजी आयव्हरी शब्द करावा लागला असता.

परफेक्ट सौंदर्य. ती कॉलेजमध्ये असतानापासूनच तिचे प्रचंड फॅन्स होते. तेव्हा ती मॉडेलिंग करायची. तिला बघायला म्हणून खास दुसऱ्या कॉलेजची पोरं तिच्या कॉलेजला जायची.

ऐश्वर्याने जगतसुंदरी किताब मिळवो न मिळवो, ती बॉलीवूडमध्ये येणार ही गोष्ट पक्की होती. मात्र बॉलीवूडने तिचं स्वागत धुमधडाक्यात केलं नाही. ही आश्चर्याची गोष्ट. पण तमिळमध्ये मात्र मणीरत्नम सारख्या मातब्बर दिग्दर्शकाने इरुवर मध्ये ॲश ला पदार्पण करायची संधी दिली आणि ते सुद्धा डबल रोल मध्ये.

हिंदी सिनेमात तिचं आगमन बॉबी देओल बरोबरच्या ‘और प्यार हो गया’ ने झालं. पिक्चर पडेल होतं. पण नुसरत साहेबांनी दिलेली गाणी अप्रतिम होती. 

ॲशची अशी जेवढयांनी सिनेमा पाहिला त्यांना आवडली. त्यावेळीच तमिळ ‘जीन्स’ मधलं हाय रे हाय रे हाय रब्बा गाजत होतं आणि ॲश  तरुणांमध्ये लोकप्रिय होत होती. एक अति विसरण्यासारखा आ अब लौट चले सारखा सिनेमा आल्यानंतर मात्र ॲश  ला मोठे निर्माते कधी साइन करतायत किंवा मोठ्या हिरोंबरोबर ती कधी दिसतेय किंवा ॲश  ला तिचं much deserving stardom मिळेल की नाही याची जास्त शंका येऊ लागली होती.

आणि मग आला, “हम दिल दे चुके सनम”.

भन्साळीचा ‘खामोशी द म्युजिकल’ चांगला असूनही चालला नव्हता. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ ने उत्सवी सिनेमांचा नवा ट्रेंड चालू केला होता. “हम दिल दे चुके सनम” भारतीय प्रेक्षकांना आवडेल अशी कथा घेऊन आला. अजय, सलमान आणि ऐश्वर्या याच क्रमाने चित्रपटात भाव खाऊन गेले. आणि एका नायिकेला भारतीय प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळायला जशी भूमिका हवी असते, (करिश्माला राजा हिंदुस्थानी, माधुरीला बेटा, श्री ला सगळ्याच) तशी भूमिका नंदिनीची होती.

फायनली.. ऐश्वर्याला तिच्या तोलामोलाची भूमिका मिळाली होती (स्टार पॉवर, अभिनय नव्हे)

नंतर आलेल्या ‘ताल’ मध्ये ॲश ची भूमिका नायक अक्षय खन्ना आणि अनिल कपूर पेक्षा मोठी, मध्यवर्ती होती. ‘ताल’ महा गंडलेला सिनेमा असूनही ठीकठीक चालला. ॲश  आणि अनिल कपूरचा ”हमारा दिल आपके पास हैं” मात्र बराच बरा म्हणावा लागेल. यात ॲश चं कामही छान झालेलं आहे. जोश मध्ये मात्र शर्लि म्हणून ती मनात भरली नाही. जोश हा सुद्धा मन्सूर खानसारख्या दिग्दर्शकाचा फसलेला सिनेमा.
पण आतापावेतो ॲश  मोठ्या नायिकांमध्ये गणली जात होती.

ती एक अशी नायिका होती की चित्रपटांपेक्षा ती ऐश्वर्या राय (खरा उच्चार रई. मंगलोरची तुळू भाषिक बंट समाजातली मुलगी) म्हणूनच एक सेलिब्रिटी होती. तिचा तब्बू आणि अजिथकुमार बरोबरचा एक कोंडुकांदैन कोंडुकांदैन म्हणून सिनेमासुद्धा गाजत होता.

पण पुढे मोहब्बते आणि देवदास सोडल्यास ॲश चे फार ग्रेट सिनेमे आठवत नाहीत कारण तिच्या आयुष्यात आलेलं सलमान खान नावाचं वादळ. या दोघांबद्दल फार काही लिहिलं गेलंय. आणि आता ॲश  एका मुलीची आई झाल्यानंतर हे सगळं उगाळण्यात काही अर्थ नाही.

त्याकाळात ॲश  हॉलिवूडच्या प्रांगणात जास्त दिसू लागली होती. तसं ही ती भारताचा एक आंतरराष्ट्रीय चेहरा म्हणून प्रसिद्ध होतीच. तिचे ब्राईड अँड प्रिज्युडीस, मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेस, प्रवोकड हे तिच्या बॉलिवूड सिनेमापेक्षा बरेच चांगले आहेत. पिंक पँथर मध्ये छोटी भूमिका असली तरी तिचं ब्रँड ‘ऐश्वर्या राय’ असणं एका सेकंदा साठी विसरलं जात नाही.

ॲश  आणि अभिचं लग्न झालं तरी तिची आणि अभिची ऑन स्क्रिन जोडी इतकी खुलत नाही असं आपलं मला वाटतं. ती हृतिक बरोबर जशी शोभते तशी क्वचित इतर कुणाबरोबर शोभली असेल. तिचे नंतरच्या काळातील गुजारीश, धूम 2 आणि जोधा अकबर पहा.

ॲश काही फार प्रचंड क्षमतेची अभिनेत्री कधीच वाटलेली नाही. ‘चोखेर बाली’ आणि ‘रेनकोट’ चा अपवाद वगळता फार कधी तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केलं असं घडलेलं नाही. ‘सरबजीत” रणदीप हुडाचा सिनेमा आहे, ॲश चा तोकडा अभिनय कळून येते. पण काही असो, ती ऐश्वर्या राय आहे इतना ही काफी हैं. ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये तिने मुख्य नायिका असलेल्या अनुष्काला, या ऐश्वर्या राय असण्याने झाकोळून टाकलंय.

चित्रपट क्षेत्रात बडे बडे स्टार्स असतात पण ॲश  एक नक्षत्र आहे. तिच्या जाहिराती हा एक वेगळा विषय बोलायचा. तिच्या नक्षत्रच्या जाहिरातीवर काम केलं आहे डिजिटल कॅम्पेनसाठी. सर्वात कमी फोटोशॉप वापरायला लावणारा चेहरा.

ॲश आता ४९व्या वर्षात पदार्पण करतेय.. खरंच वाटत नाही. कसं शक्य आहे? अगदी कालपरवा तर पेप्सीच्या जाहिरातीत आमीरच्या फ्लॅटच्या दरवाजात उभी राहून म्हणाली होती ना,

“हाय आयम संजना. गॉट अनादर पेप्सी?”

  • गुरुदत्त सोनसूरकर

#cinemagully

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.