बिंदू तुला माहित नाही तू किती लकी आहेस ते !

नव्वदच्या काळात सिनेमामध्ये हमखास दिसणाऱ्या चेहऱ्यापैकी एक चेहरा म्हणजे बिंदू. कायम हिरो हिरोईनची कजाग काकू आंटी टाईपचा तिचा रोल असायचा. उगाच दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसणे, येता जाता सगळ्यांना टोचून बोलणे , सून असेल तर तिला जाच करणे अशा टाईपचे तीचे रोल असायचे. कधी कधी त्याला कॉमेडी तडका दिलेला असायचा. पण आपल्याला बिंदू आठवते ते ललिता पवारची छोटी व्हर्जन म्हणूनच.

पण बिंदू फिल्ममध्ये आली होती ते सेक्स बॉम्ब म्हणून !

बिंदू मुळची गुजरातची. तीचे वडील नानूभाई देसाई फिल्म प्रोड्युसर होते. घरची परिस्थिती एकदम चांगली. तिच्या आईबाबांना सात मुली आणि एक मुलगा. बिंदू सगळ्यात थोरली. नानूभाई देसाई नेहमी आपल्या पोरीला सांगायचे मी तुला डॉक्टर बनवणार. छोट्याशा बिंदूला मात्र नाचायला आवडायचं. तिच्या शाळेतल्या मैत्रिणी म्हणायच्या तू पुढे जाऊन वैजयंतीमाला होणार.

याचकाळात तिच्या वडिलांनी प्रोड्यूस केलेले काही फिल्म फ्लॉप झाले होते. धंद्यात मोठ नुकसान झालं होत.  त्यातच कळाल की त्यांना कुठला तरी असाध्य रोग झाला आहे. पूर्ण घरावर आभाळ कोसळलं. रोजच्या खाण्यापिण्याचा प्रश्न उभा राहिला. अशातच एकदा हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेले नानूभाई आपल्या अकरा वर्षाच्या पोरीला म्हणाले,

“तू मेरी बेटी नही तू मेरा बेटा हो. सबसे बडी होनेके नाते घर को संभालणेकी जिम्मेदारी तेरीही है. मेरे बाद अपने भाईबहेनो का खयाल रखना.”

बिंदूला काम करण्यावाचून पर्याय नव्हता. डॉक्टर बनणे वगैरे माग पडलं. शाळा सुटली. तिला अनपढ नावाच्या सिनेमामध्ये तिला काम मिळाल. तिचा रोल एका कॉलेजला जाणाऱ्या मुलीचा होता. ती होती अकरा वर्षाची पण अंगापिंडाने जड असल्यामुळे दिसायची मोठी.

ती तेरा वर्षाची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. सिनेमामध्ये काम करून ही छोटी मुलगी घर चालवत होती. अशाच छोट्या वयात आपल्या घराजवळ राहणाऱ्या चंपकलाल झवेरी या मुलाच्या प्रेमात ती पडली. लवकरचं त्यांच लग्नही झालं. या लग्नाला त्यांच्या घरच्यांचा विरोध होता पण बिंदूने ठरवलेलं चंपक बरोबरच आपल आयुष्य काढायचं. लग्नानंतर तिच्या सिनेमाना काहीसा ब्रेक लागला होता. 

पण एकदा एका लग्नसमारंभात बिंदूची भेट राज खोसला या सुप्रसिध्द दिग्दर्शकाशी झाली. लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकार जोडीपैकी लक्ष्मीकांत हे तिच्या बहिणीचे पती होते. त्यांच्या सांगण्यावरून राज खोसला यांनी बिंदूला आपल्या सिनेमात काम करणार का विचारल. रोल एका व्हँपचा होता. बिंदुला कळेना हो म्हणायचं की नाही? तिला पंधरा दिवसाचा वेळ देण्यात आला. पण तिचा नवरा म्हणाला

“तुझ लहानपणापासूनचं स्वप्न आहे सिनेमात काम करायचं. काही गरज नाही विचार करायची. हो म्हणून सांग.”

बिंदूला दो रस्ते मध्ये काम मिळालं. राजेश खन्ना , मुमताज हे मुख्य भूमिकेत होते. फिल्म गाजली. लक्ष्मीकांत प्यारेलालची गाणी देखील सुपरहिट झाली. बिंदू अनेकांच्या नजरेत आली. या पाठोपाठ आलेला शक्ती सामंताचा इत्तेफाक सुद्धा हिट झाला. याच शक्ती सामंतानी राजेश खन्नाच्या कटी पतंग मध्ये तिला एक आयटम सॉंगमध्ये काम करणार का विचारलं?

याकाळात हेलन आणि तिचा कॅब्रे डान्स खूप पॉप्युलर झाला होता. बिंदूला हेलनप्रमाणे डान्स करायला सांगण्यात आलं. बिंदू प्रोपर भरतनाट्यमवगैरे शिकून आली होती.  कॅब्रेचा भडक डान्स करून लटके झटके देण तिला खूप अवघड जात होतं पण तिने ते शिकून घेतलं.

1389893138 unknown facts about bindu 52d7aa5f63e8d

गाण्याचे बोल होते मेरा नाम है शबनम!! हेलनसारखाच डान्स, तसेच हॉट ग्लॅमरसं कपडे घालून बिंदूने डान्स फ्लोअरवर सेटवर आग लावून टाकली. गाण हिट झालं. तिला तसेच रोल ऑफर होऊ लागले. कॅब्रेडान्स करणारी म्हणजे व्हॅम्प हे त्याकाळच समीकरणचं होतं. तिला फिल्मफेअरचं नॉमिनेशन देखील मिळालं.

 पण बॉलीवूड मध्ये दुसरी वैजयंतीमाला होण्याच स्वप्न बघत आलेली बिंदू दुसरी हेलन बनली. तिच्या वर व्हॅम्पचा शिक्का बसलाचं होता. लीड हिरोईन होणे कधी तिला जमलच नाही.

सत्तरच्या दशकात सुपरस्टार राजेश खन्नाच्या सिनेमात ती हमखास दिसायचीच. प्रेम चोप्रा सोबत तिची जोडी जमली होती. या दोघांना व्हिलनचे रोल असायचे. हातात दारूचे ग्लास पकडून हिरोहिरोईनला त्रास देण्याच्या स्किमा रचायचं काम त्यांनी उत्कृष्ट रित्या निभावलं. या दोघांना पडद्यावर पाहताच पब्लिक शिव्या द्यायला चालू करायचं.

अमिताभच्या सुपरहिट जंजीर मध्ये व्हिलन अजितची ती गर्लफ्रेंड झाली होती. याच सिनेमामुळे तिला नवीन नाव मिळालं,

“मोना डार्लिंग”

mona 57134ebc8b9a4

१९७४ मध्ये बिंदूचे दोन सिनेमे आले. हवस आणि इम्तिहान. या दोन्ही सिनेमामध्ये तीला एका सेक्स अॅडीक्ट टाईपचा रोल मिळाला होता. या सिनेमामध्ये बिंदूने आपल्या अदांनी ऑडियन्सला खुळ करून सोडलं. तिची गणना सेक्स सिम्बल म्हणून करण्यात येऊ लागली. भारतीय सिनेमामध्ये पहिल्यांदाच एक लग्न झालेली मुलगी सेक्स सिम्बल बनली होती.

असं नव्हत की तिला फक्त असलेच रोल मिळाले. अमिताभच्या अभिमानमध्येही ती व्हॅम्पचं झाली होती, पण ऋषिकेश मुखर्जींनी दिग्दर्शन केलेल्या या सिनेमामध्ये तिच्या रोलला  एक वेगळीच छटा होती. पहिल्यांदाच तिला प्रेक्षकांची सहानुभूती मिळाली होती. आपण भारी अभिनय करू शकते हे तिनं सिद्ध करून दाखवलं.

पण जसजस तीच वय वाढलं तसतसे तीला मिळणारे रोल कमी झाले. याच काळात तिच्यावर गरोदरात आपलं मूल गमवण्यासारखं दुख्खाचे डोंगर कोसळले.या सगळ्या काळात तिचा नवरा तिच्या पाठीशी ठाम पणे उभा राहिला. एक दिवस जया बच्चन तिला म्हणाली,

“बिंदू तुला माहित नाही तू किती लकी आहेस ते.”

ऐंशीच्या दशकात मात्र बिंदूने सेक्स सिम्बॉलच्या रोल पासून मैलोदूर असणाऱ्या काकू टाईपच्या व्हिलन भूमिका स्विकारण सुरु केलं. मात्र या भूमिकाम्ध्ये तिने कॉमेडीचा टच दिला. लोकांना ती आवडली. हम आपके है कौन मधली मीठ घातलेला चहा पिणारी भागवन्ती, गोविंदाच्या शोला और शबनम मधली गर्ल्स कॉलेजची प्रिन्सिपल,  मै हुं ना मधली मिस कक्कड हे रोल आठवले तरी आपल्या चेहऱ्यावर हसूचं येत.

एके काळची सेक्स सिम्बल, भारतातल्या फिल्मी इतिहासातल्या खलनायिकापैकी एक म्हणून गाजलेली बिंदू आता फिल्ममधून रिटायर झाली आहे. तिला टीव्ही सिरीयलच्या वगैरे लाखो ऑफर येत असतात पण तिने आणि चंपकदास झव्हेरीनी ठरवल्या आता आयुष्याचा आनंद घ्यायचा. ते मस्त जगभर फिरतात, जुने सिनेमे पाहतात. पुण्याच्या कोरेगाव पार्क मधल्या घरात बॉलीवूडच्या रंगेबेरंगी दुनियेपासून दूर निवांत आयुष्य जगतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.