इन्व्हेस्टमेंट बँकर असणाऱ्या महुआ मोईत्रा संसदही तितक्याच ताकदीने गाजवत आहेत

७ फेब्रुवारी रोजी संसदेत महुआ मोईत्रा यांच्या एका विधानानंतर त्यांच्यावर टीका होतेय. सोबतच च्यांनी असंसदीय शब्द वापरला असल्याचंही बोललं जातंय. त्यांनी बोलताना हरामी या शब्दाचा प्रयोग केला आणि त्यामुळे त्यांच्याविरोधात आक्रमकता पाहायला मिळतेय. त्यांनी माफी मागावी अशीही मागणी जोर धरतेय.

या सगळ्याबाबत आता महुआ मोईत्रा यांनी स्पष्ट शब्दांत माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

राजकारणात येण्याआधी परदेशी उच्चशिक्षण घेतलेली ही महिला आता राजकारणात आल्यावर आपल्या भाषणांनी आणि वक्तव्यांनी सभागृह दणाणून तर सोडतेय, पण राजकारणात येण्याआधीही त्यांनी फायनान्स क्षेत्रात मोठ्या पदावर काम केलंय.

कधी “माझ्या नजरेत कालीमाता ही मांसाहार करणारी आणि दारू घेणारी देवी आहे” असं म्हणून तर कधी मीडियाला ‘२ पैश्यांची’ उपमा देऊन आणि कधी “आम्ही ज्या संविधानावर हात ठेऊन शपथ घेतो ते संविधान धोक्यात आहे” असं म्हणून त्या सतत चर्चेत राहिल्या.

महुआ मोईत्रा राजकारणात येण्यापुर्वीचं त्यांचं आयुष्य कसं होतं ते पाहुया…
महुआ यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९७४ रोजी आसाममध्ये झाला. कोलकत्यामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि मग उच्च शिक्षणासाठी त्या थेट अमेरिकेत गेल्या… अमेरिकेतल्या मैसाच्युसेट्स या ठिकाणच्या माउंट हॉल्योक कॉलेजमधून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी परदेशातच नोकरी करायचं ठरवलं.
फायनान्स क्षेत्रात नामवंत असलेल्या जेपी मॉर्गन या कंपनीमध्ये इंवेस्टमेंट बँकर म्हणून काम करू लागल्या. काम करत असताना मोठ मोठ्या बँकांसोबत त्यांचे संबंध आले… युरोपपासून ते अमेरिकेपर्यंत बऱ्याच देशात काम केल्यानंतर २००८ साली त्यांनी लंडनमध्ये जेपी मॉर्गन कंपनीतील आपल्या व्हाईस प्रेसिडंट पदाचा राजीनामा दिला आणि त्या भारतात परतल्या.

महुआ मोईत्रा यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली ते पाहुया…

२००८ साली नोकरी सोडून भारतात परतल्यावर त्यांनी राजकारणात येण्याचं ठरवलं… २००९ साली त्यांनी काँग्रेसची यूथ विंग असलेल्या भारतीय युवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आम आदमी का सिपाही या राहूल गांधींच्या महत्वकांक्षी कार्यक्रमात महुआ यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. त्या काळात त्या राहूल गांधी यांच्या विश्वासू लोकांपैकी एक होत्या.
१) विधानसभेत एन्ट्री:
२०१० मध्ये काँग्रेसला राम राम ठोकत त्यांनी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला… तृणमूल मध्ये सातत्यानं २०१६ पर्यंत काम केल्यानंतर २०१६मध्ये पक्षानं त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना करीमपूर मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं. ९०,००० मतं मिळवत १५,००० च्या मताधिक्यानं त्या निवडून आल्या…
२) लोकसभेत एन्ट्री:
२०१९ पर्यंत आमदारकी केल्यानंतर २०१९च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांची आक्रमक शैली पाहून पक्षानं त्यांना लोकसभेचं तिकीट द्यायचं ठरवलं… कृष्णानगर मतदार संघातून निवडणूक लढवताना त्यांनी जवळपास ६०,००० मताधिक्यानं भाजपचा पराभव केला आणि त्या संसदेत पोहोचल्या.
३) तृणमूलसाठी महुआ महत्त्वाच्या:
आता हा निवडणुकांचा भाग, पण पक्षामध्ये सुद्धा त्यांना महत्त्व आहे हे लक्षात येण्याचं कारण म्हणजे २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना गोवा इनचार्ज बनवलं होतं. याशिवाय त्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही काम करतायत.

आतापर्यंतची चर्चेतली वक्तव्य:

१) संविधान धोक्यात:
२०१९ साली बोलताना आणि भाजपवर टीका करत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. शिवाय, “आम्ही लोकप्रतिनिधी ज्या संविधानावर हात ठेवून रक्षण करण्याची शपथ घेतो तेच संविधान आता धोक्यात आहे.” असं वक्तव्य केलेलं वक्तव्य मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरलाय.

२) मीडियाबद्दल वक्तव्य:
डिसेंबर २०२० मध्ये पत्रकारांशीच बोलताना त्यांनी भारतीय मीडियाचा उल्लेख ‘२ पैश्यांची’ असा केला. त्यानंतर पश्चिम बंगालमधल्या लोकल मीडियाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला… याशिवाय त्यांच्या वक्तव्यांना त्यांच्या तृणमूल पक्षानंही पाठिंबा दिला नव्हता.

३) न्यायपालिका पवित्र राहिलेली नाही:
फेब्रुवारी २०२१मध्ये संसदेत भाषण करताना त्यांनी “न्यायपालिका असलेली पवित्र गाय आता पवित्र राहिली नाही, ज्या दिवशी या देशाच्या विद्यमान मुख्य न्यायमूर्तीवर लैंगिक छळाचा आरोप झाला, त्याच दिवशी तिचं पावित्र्य संपलंय” असं वक्तव्य महुआ मोईत्रा यांनी केलं होतं.

४) काली मातेविषयीचं वादग्रस्त वक्तव्य:
जुलै २०२२ मध्ये एका पोस्टरमध्ये काली मातेच्या हातात सिगारेट असल्याचं दाखवलं होतं. याविषयी प्रश्न विचारल्यावर महुआ यांनी, “माझ्या मते काली माता ही मांसाहार करणारी आणि मद्यपमान करणारी होती. तुमच्या देवी-देवतांना इमॅजिन करण्याची तुम्हाला मुभा आहे.” असं वक्तव्य केल्यानंतर हिंदुत्त्ववादी संघटनांच्या टार्गेटवर त्या राहिल्या… त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारही दाखल करण्यात आली.

आता त्यांंनी संसदेत वापरलेल्या वादग्रस्त शब्दामुळे त्या पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.. अडचणीत येण्याची शक्यता असली तरी याच निमित्तानं त्या चर्चेत सुद्धा आल्यात.

आता या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्यात,

“भाजपने आम्हाला शिष्टाचार शिकवणं हीच मुळात आश्चर्याची गोष्ट आहे. मी सफरचंदाला सफरचंदच म्हणणार संत्र म्हणणार नाही.”

संसदेत मोईत्रा यांनी शब्द वापरला त्यावेळी गोंधळ सुरू होता.

ज्यावेळी संसदेत त्या बोलत होत्या तेव्हा वारंवार सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्या बोलण्यात अडथळा निर्माण केला जात होता. त्यांचं भाषण संपल्यानंतर तेलगू देशम पार्टीचे खासदार राममोहन नायडू बोलायला लागले आणि तरीही भाजप नेत्यांनी अडथळे निर्माण करणं बंद केलं नाही.

त्यामुळे भाजप नेत्यांकडून सुरू असलेल्या गोंधळाला प्रतिक्रिया म्हणून त्यांनी त्या शब्दाचा प्रयोग केला असं मोईत्रा यांचं म्हणणं आहे.

परदेशात मोठ्या हुद्द्यावर काम करत असताना बक्कळ पैसे कमवणाऱ्या महुआ मोईत्रा या त्यांच्या १३ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीतच लोकसभेत पोहोचल्या आहेत… वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि आक्रमक शैलीमुळे मीडियासोबतच नागरिकांमध्येही चर्चेत राहिल्यात…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.