माधव गडकरींचा “गुंड” पुढे जावून बाळासाहेबांसाठी “आरोपी क्रमांक दोन” झाला..

२१ जुलै १९८८ साली आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जावून पोलीस सब इन्स्पेक्टर राजन कटधरे यांनी रमा नाईकचा एन्काऊंटर केला. दाऊदच्या टिपवरून हा एन्काऊंटर घडून आल्याच सांगण्यात आलं.

मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात या एन्काऊंटरमुळे खळबळ उडाली होती. पण वर्तमानपत्राच्या कागदांवर मात्र थेट आणि धडधडीत माहिती येत नव्हती. नेमकं काय झालं हे चौकटीबाहेर जावून लिहण्याचं धाडस तरी नव्हतं किंवा त्या पद्धतीची गरज कोणाला वाटत नव्हती.

अशा वेळी लोकसत्ताचे संपादक माधव गडकरींनी आपल्या गुंड पत्रकाराला, “तिकडे” जायला सांगितलं.

माधव गडकरी त्यांचा उल्लेख गुंड असा करायचे.

त्याला कारण म्हणजे त्यांचा हा पत्रकार शिवसैनिक होता. बाळासाहेबांच्या शिफारसीमुळेच त्याला ही नोकरी मिळाली होती. सुरवातीला जागा नसल्याने या माणसाने इंडियन एक्सप्रेसच्या मार्केटिंग, जाहिरात, वितरण अशा वेगवेगळ्या खात्यात काम केलं होतं. अखेर लोकप्रभामध्ये हा प्रवास थांबला होता.

गडकरींचा गुंड पत्रकार रमा नाईकच्या चकमकीच्या ठिकाणी गेला आणि येत्या लोकप्रभा मध्ये रमा नाईकवर कवर स्टोरी छापण्यात आली.

या गुंड पत्रकाराच नाव संजय राऊत. १०० दाऊद तर एक संजय राऊत. 

नेहमीच शिवसेनेच्या पहिल्या फळीत असणारा असा एकच नेता सेनेत आहे तो म्हणजे संजय राऊत.

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्लस राज ठाकरे अशा चारही जणांसोबत ॲडजेस्टमेंट केलेल्या नेत्यांची नाव काढायची झाली तर संजय राऊत हे एकमेव नाव निघतं. शिवसेना फुटली, उभी-आडवी फुट पडली तरी संजय राऊतांनी सेनेची पर्यायाने उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.

शिवसेनेत प्रत्येकजण स्वत:ला नेता म्हणवून घेवू लागला तेव्हा बाळासाहेबांनी सेनेत नेतेपद हे ऑफिशीयल करण्याची घोषणा केली. निवडक लोकांना नेतेपद देण्यात आलं. त्यात राऊताचा अग्रक्रम आहे.

संजय राऊतांच बालपण माहिममध्ये गेलं. त्यांचे वडिल राजाराम राऊत हे JKW कंपनीत कामगार होते. आणि तिथले कामगार नेते देखील होते. कट्टर शिवसैनिक असणारे राजाराम राऊत हे बाळासाहेबांच्या देखील तितकेच जवळचे होते. त्यातूनच संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे घरोब्याचे संबध निर्माण झाले.

आंबेडकर कॉलेजमधून B.com झालेल्या या मुलाला पोटापाण्याला लावायचं म्हणून बाळासाहेबांनीच संजय राऊतांना माधव गडकरींकडे पाठवलं होतं. शिवसेनेच्या शिफारसीवर आला म्हणून गडकरी त्यांचा उल्लेख गुंड असा करायचे.

जागा नाही म्हणून संजय राऊतांना मार्केटिंग, जाहिरात, वितरण अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करावं लागलं. अशातच त्यांच्यावर जबाबदारी आली ती लोकप्रभेत लिहण्याची. संधी ओळखून संजय राऊतांनी क्राईम रिपोर्ट चालू केलं. त्या काळात म्हणजे १९८५ च्या सुमारास संजय राऊत क्राईम रिपोर्ट करु लागले. मराठीत एकतर क्राईम स्टोरी छापून येत नसतं किंवा त्यांच स्वरुप बातम्यांच्या स्वरुपात असे.

पण संजय राऊतांनी आपली वेगळी शैली विकसीत केली. वेगवेगळ्या कवर स्टोरीमुळे लोकप्रभाचा अंक हातोहात खपू लागला आणि संजय राऊत लोकांच्या नजरेत येवू लागले.

पण या सगळ्यात राऊतांवर खास नजर होती ती बाळासाहेबांची. बाळासाहेबांना हा पोरगा काहीतरी करेल अस वाटायचं. क्राईम रिपोर्ट करता करता संजय राऊतांचा मोर्चा राजकिय रिपोर्टिंगकडे वळला. या संधीच सोनं करत आपल्या शब्दांनी लोकप्रभा गाजवू लागले.

माधव गडकरींची स्टाईल आणि बाळासाहेबांची स्टाईल याच अचूक मिश्रण म्हणजे संजय राऊतांच्या लिखाणाची स्टाईल असल्याचं सांगण्यात येतं. शिवसेनेत एकसे एक नेते खळ खट्याक करण्यासाठी प्रसिद्ध होते. बोलण्याच्या स्पर्धेत देखील अशा नेत्यांचा नंबर लागायचा.

छगन भुजबळ, नारायण राणे हे बाळासाहेबांप्रमाणेच तोडीस तोड बोलायचे. पण प्रश्न होता तो बाळासाहेबांप्रमाणे लिहणाऱ्याचा. आपल्या शेलक्या शब्दात अचूक घाव घालणारा माणूस बाळासाहेबांकडे नव्हता.

अशातच छगन भुजबळांनी शिवसेनेला रामराम केला. छगन भुजबळांनी सेनेला राम राम ठोकताच लोकप्रभात कवर स्टोरी छापण्यात आली. ही कवर स्टोरी केली होती संजय राऊतांनी. संजय राऊतांची ती स्टोरी बाळासाहेबांच्या नजरेत आली बाळासाहेबांच्या लक्षात आलं,

हीच ती वेळ..!

बाळासाहेबांनी राऊतांना बोलावून त्यांना सामनाचं कार्यकारी संपादक केलं. तेव्हा संजय राऊतांच वय होतं २९ वर्ष. पत्रकारक्षेत्रातल्या लोकांना वयाच्या २९ व्या वर्षी सामना सारख्या वर्तमानपत्राचं संपादक होण म्हणजे काय ते समजू शकतं. एकवेळ २९ व्या वर्षी आमदार होता येईल पण इतक्या कमी वयात संपादक होता येत नाही. राऊत संपादक झाले व तिथूनच त्यांची गाडी सुसाट सुटली.

ब्रेक नसलेली एकमेव गाडी म्हणजे संजय राऊत होते.

राऊतांच विशेष होतं ती म्हणजे त्यांची शैली. एका बाजूला बाळासाहेबांची लेखण शैली आणि दूसऱ्या बाजूला पारंपारिक चौकटीबाहेर जावून मुखपत्राच्या पलीकडे आपलं वर्तमानपत्र हिट करण्याची मार्केटिंग स्टॅटर्जी. राऊतांना दोन्ही गोष्टीच ज्ञान होतं. त्यातून सामना हिट होतं गेलं. बाळासाहेब काय बोलणार इथपासून ते कोणत्या भाषेत बोलतील हे राऊतांना कळत होतं. राज ठाकरेंसोबत देखील चांगले संबध निर्माण झाले. पण प्रश्न होता तो उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या संबंधांचा.

इंदिरा गांधींच्या पश्चात राजीव गांधींना इंदिराजींच्या सहकार्यांबरोबर जुळवून घेता आलं नाही. राजीव गांधीच्या पश्चात सोनिया गांधींना राजीव गांधीच्या सहकार्यांसोबत जुळवून घेता आलं नाही. कुठल्याही पक्ष संघटनेत वरिष्ठ नेत्याच्या सहकार्यांना उत्तराधिकाऱ्यांसोबत जुळवून घेता येत नाहीच.

पण संजय राऊत या गोष्टीला अपवाद ठरत गेले.

उद्धव ठाकरेंसोबत देखील त्यांचे त्याच ताकदीचे संबध प्रस्थापित झाले. जूनी अडगळ म्हणून संजय राऊत बाजूला न पडता त्यांच महत्त्व अधिक वाढत गेलं. अगदी राज ठाकरेंसोबत असणारे मैत्रीचे संबध लक्षात असून देखील उद्धव ठाकरेंनी त्यांना सेनेत स्कोप दिला. त्यामुळेच संजय राऊत तीनवेळा राज्यसभेचे खासदार होवू शकले. त्यांचा शब्द मातोश्रीवर प्रमाण मानला जावू लागला. महाविकास आघाडीच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेवून सत्ता मिळवली.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मात्र सर्वांच्या रडारवर आले ते संजय राऊतच. संजय राऊतांना जबाबदार धरत प्रत्येक बंडखोर आमदार त्यांच्यावर टिका करू लागला. आज संजय राऊतांवर ईडी मार्फत कारवाई करण्यात आली. त्यांना ईडीने ताब्यात घेतलं.

आत्ता गेल्या अडीच वर्षात अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर ईडीच्या अटकेत जाणारे संजय राऊत तिसरे नेते झालेत. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.