बी जे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आदिवासी मुलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करत आहेत

नीट ची परीक्षा म्हटल्यावर अनेकांच्या अंगावर काटा येतो. एमबीबीएस ला एडमिशन घेण्यासाठी दिली जाणारी ही परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना क्रॅक करता येत नाही. परंतु शहरातील शिक्षित वर्गापुरती मर्यादित असलेली नीटची तयारी आता आदिवासी बहुल मेळघाटापर्यंत पोहोचली आहे. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थी सुद्धा नीट परीक्षा पास होऊन डॉक्टर बनण्याच्या मार्गावर चालायला लागले आहेत.

८ सप्टेंबर रोजी २०२२ च्या नीट परीक्षेचा निकाल लागला. त्यात मेळघाटातील गोंड आदिवासी समाजातील विद्यार्थी अरुण लालसू मट्टामी हा ४५० गुण घेऊन नीटची परीक्षा पास झालाय. अरुणाच्या या  यशामुळे आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या आकांक्षा उंचावलेल्या आहेत. 

यात अरुणचे हे यश जितके त्याचे आहे तितकेच ते अरुणाला नीटची कोचिंग देणाऱ्या लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (LFU) या संस्थेचे सुद्धा आहे.

गेल्या ८ वर्षांपासून सातत्याने खेड्यातील तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेची कोचिंग देऊन LFU अनेक मुलांचे भविष्य बदलत आहे. या संस्थेची स्टोरी वाचल्यावर युवा  जर एखादी गोष्ट मनावर घेत असतील तर किती बदल घडून येऊ शकतो याचा प्रत्यय येतो. यावर्षी LFU ने दिलेल्या प्रशिक्षणानंतर १० विद्यार्थांना एमबीबीएसला ऍडमिशन मिळालं आहे    

नीटच्या परीक्षेची महागडी आणि अवघड समजली जाते

या परीक्षेच्या कोचिंगसाठी भरमसाठ फी घेतली जाते. साधारणपणे २ वर्ष अभ्यास करावा लागतो. त्यासाठी मोठ्या ठिकाणी जाऊन अभ्यास करावा लागतोय. यासाठी दोन वर्षात साधारण ३ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. फीमुळे गरीब पार्श्वभूमीचे विद्यार्थी आणि ग्रामीण, आदिवासी आणि दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना कोचिंग घेणं परवडत नाही.

याची जाणीव पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या डॉ अतुल ढाकणे याला झाली. ते तिथे कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत कोचिंग क्लासमध्ये जीवशास्त्र विषय शिकवायचे. जीवशास्त्राचे शिकवणी घेतांना त्याच्या मनात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी नीटची कोचिंग द्यावी असा विचार पुढे आला.

त्यातूनच त्याने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस करणाऱ्या मित्रांसोबत १५ डिसेंबर २०१५ साली लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट नावाची संस्था सुरु केली. सुरुवातीला या संस्थेने पुण्यात शिकवणी वर्ग सुरु केले. या वर्गांमध्ये गरजू विद्यार्थ्यांच्या बॅच तयार व्हायला लागल्या होत्या. महाराष्ट्राच्या खेड्यातील विद्यार्थी इथे शिकत होते.

पुण्यात परिस्थिती बरीच चांगली आहे मात्र पुण्याच्या बाहेर आदिवासी भागात ही फार मोठी समस्या आहे. मेळघाट, गडचिरोली, पालघर, नंदुरबार हा आदिवासी भाग प्रचंड मागास आहे. यातील मेळघाटात तर आणखीनच बिकट परिस्थिती आहे. हा भाग कुपोषण आणि आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहे. मेळघाट हा डोंगराळ आणि जंगली भाग असल्याने तिथे डॉक्टर जाण्यास तयार नसतात. त्यामुळे येथील आरोग्याची समस्या कितीही प्रयत्न केल्याने सुटत नाही.

सरकारने या भागात डॉक्टरांना नियुक्त केले तरी ते तिथे जात नाहीत. कारण या भागात कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. डॉक्टरांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था नाहीच. पण त्यापेक्षाही मोठी समस्या म्हणजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्या परिवाराच्या गरजांपोटी बहुतांश डॉक्टर्स या भागात जायला तयार नसतात.

तेव्हा LFU च्या सदस्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी एक नवीन मार्ग शोधून काढला.

तो मार्ग म्हणजे बाकी भागातील डॉक्टर्स या भागात येऊ शकत नाही ना तर या आदिवासी भागातील मुलांनाच जर एमबीबीएसचं शिक्षण देऊन त्यांना डॉक्टर करायचं. इथले आदिवासी विद्यार्थी शिकतील आणि या भागात सेवा देतील तेव्हा या भागाची आरोग्याची समस्या मुळापासून सुटेल.

या विचारावरूनच मेळघाटात नीटची कोचिंग क्लास सुरु करण्याचा प्रवास सुरु झाला. २ सप्टेंबर २०१७ रोजी मेळघाटचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात LFU च्या टीमने मेळघाटात पहिली ‘उलगुलान’ नावाची बॅच सुरु केली. या बॅचचं नाव आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या ‘उलगुलान’ या घोषणेवरून ठेवण्यात आलं.

या पहिल्या बॅचची जबाबदारी डॉ. संतोष चाटे यांच्याकडे देण्यात आली होती.

त्या बॅचसाठी मेळघाटातील आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या ५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र २०१९ च्या नीट बॅचमधून त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. कारण मेळघाटातील मुलांची भाषा ही कोरकू किंवा गोंडी आहे. त्यांना मराठी आणि इंग्रजी या नीट बोलता येत नाहीत. त्यामुळे २०१९ मध्ये तेथील बॅच पुण्याला हलवण्यात आली. क्लासेसचं केंद्र पुण्याला हलवल्यानंतर त्यात मोठा बदल घडून आला.

त्या बॅचपैकी तब्बल १६ विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा पास केली आणि त्यातील ८ विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. २०२० च्या बॅचमध्ये शिकणाऱ्या ४६ विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थी नीट परीक्षा पास झाले. २०१६ पासून संस्थेने २५० विद्यार्थ्यांना कोचिंग दिली आणि त्यापैकी १४० विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केलीय. त्यातील ७५ जणांनी एमबीबीएस, ३० जणांनी बीएएमएस, १५ जणांनी बीडीएस आणि २० जणांनी बीएचएमएस या कोर्सला प्रवेश घेतला आहे.

LFU च्या मेळघाटातील पहिल्या बॅचमध्ये शांतीलाल खसदेकर नावाचा आदिवासी विद्यार्थी पहिल्यांदा नीट पास झाला. यंदा अरुण मट्टामी हा विद्यार्थी नीट पास झालाय. 

अरुण मट्टामी हा मुलं गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातला आहे. मात्र त्याला संस्थेची माहिती मिळाली आणि त्याने यात प्रवेश घेतला आणि आज तो डॉक्टर होण्याच्या मार्गावर चालायला लागला आहे. अशा प्रकारे एलएफयुने आजपर्यंत अनेक विद्यार्थ्याना डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा करून दिलाय. संस्थेच्या या कामामुळे भविष्यात सुद्धा गावखेड्यातील तसेच आदिवासी भागातील अनेक विद्यार्थी नीटची परीक्षा पास होऊन वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.