ते वाढीव आलेलं लाईट बिलं भरायचयं काय भिडू?

महाराष्ट्रात मागच्या दोन महिन्यांपासून लाइट बिलचा दंगा चालू आहे. ग्राहकांना जून महिन्यामध्ये तीन ते चार पट बिल जास्त आली आहेत. अगदी कुलूप लाऊन गावी गेलेल्यांच्या पण हातावर बिल ठेवली आहेत.

अभिनेत्री रेणुका शहाणे आणि तापसी पन्नूने तर त्यांची वाढलेली लाईट बिल ट्विटरवर टाकली होती. ती कमी करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच महावितरण ऑफिसच्या वाऱ्या चालू आहेत. तर नुकतेच राज ठाकरेंनी पण वाढीव वीज बिलाबाबत जनराज्यपालांना निवेदन दिले आहे.

पण भिडू सरकार मात्र म्हणत आहे ही सगळी बिल बरोबर आहेत. तिकडे महावितरण पण म्हणत आहे सरासरी बिल पाठवल्यामुळे दोन महिन्यातील वरचा फरक मिळवून बिल पाठवली आहेत. त्यामुळे बरोबर आहेत.

मग नक्की विषय काय आहे? बिल खरच भरायची आहेत का? ते आधी समजून घेऊया.

लोकांना नक्की बिल किती वाढून आलेत ते बघूया.

पाली, जिल्हा सातारा येथे राहणाऱ्या पंकज ताटे यांना

एप्रिलमधे सरासरी ८१ युनिटनुसार ५५८ रुपये बिल आलं होत.

मे मध्ये देखील सरासरी ८१ युनिटनुसार ५८० रुपये बिल आले

पण जूनमध्ये एकदमच वाढून त्यांना ६५६ युनिट ४ हजार ३८० रुपये इतके बिल आले.

तर त्यानंतर जुलैमध्ये रीडिंग घेऊन १७३ युनिटनुसार १ हजार ४५१ रुपये बिल आलं.

तर ३२ शिराळा, जि. सांगली येथे राहणाऱ्या सचिन करमाळे पाटील यांना नेहमी १८० ते २०० रुपये या दरम्यान वीजबिल यायचे.

मात्र लाॅकडाऊन सुरु झाले आणि त्या काळात रीडींग घेता न आल्याने सरासरी बिल आले, ते चक्क ११ हजार रूपये इतके. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता, मीटर चेक करूया. बिल भरू नका, असे उत्तर सचिन यांना मिळाले.

मात्र परत पुढच्या महिन्याचे बिल १७ हजार ६१० आले.

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्याशी या संदर्भात संपर्क केला असता ते म्हणाले,

आलेली वीज बिल ही बरोबरच आहेत. आमचा वीज बिलांना नकार किंवा विरोध नाहीच. आमचा विरोध आहे तो वसुलीला. कोरोनामुळे आधीच परिस्थिती बिकट असताना एवढ्या रक्कमेची बिल भरणं लोकांना शक्य नाही. त्यातच सरकारने १ एप्रिल पासून वीज शुल्कात दरवाढ केली आहे.

त्यामुळे आम्ही मागणी केली आहे की, ३०० युनिट पर्यंतची मागील सहा महिन्यांची वीज बिल माफ व्हावीत. यासाठी आम्ही आंदोलन पण सतत चालू आहेत. तीन दिवसांपुर्वीच राज्यभर ताला ठोको आंदोलन ही केले असल्याचे होगाडे म्हणाले.

हे सरासरी वीज बिल म्हणजे काय?

जर काही कारणामुळे ग्राहकांचे मीटर रीडिंग होऊ शकले नाही तर यापूर्वीच्या ३ महिन्यांच्या प्रत्यक्ष मीटर रीडिंग वर आधारित दिलेले वीज बिल होय.

या लाईटच्या सगळ्या घोळासंदर्भात आम्ही महावितरणाचे पुणे प्रादेशिक विभागाचे उप मुख्य जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांच्याशी बोललो.

ते म्हणाले,

मार्चपासून सरासरी वीज बिलाला सुरुवात

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिथे लोकांशी थेट  संपर्क होऊ शकतो उदा : मीटर रीडिंग, चाचणी, बिल वितरण, ही कामे बंद ठेवली. आणि केवळ वीजपुरवठा संबंधित आवश्यक सेवा सुरू राहिल्या. यामुळे एप्रिल व मे महिन्यांमध्ये सर्व ग्राहकांना ऑक्टोंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिनांच्या रिडींगवर आधारित सरासरी बिल दिली गेली.

लॉकडाऊन संपल्यानंतर जून महिन्यांमध्ये महावितरणने रेड झोन/ कंटेनमेंट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यास सुरूवात केली.

जून महिन्यात बिल जास्त कसे आले?

ऑक्टोंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हा कालावधी हिवाळ्याचा होता. त्यामुळे या कालावधीमधील वीज वापर कमी असतो. तर एप्रिल, मे आणि जून महिन्यांचा कालावधी उन्हाळ्याचा कालावधी असतो आणि हिवाळ्याच्या तुलनेत या कालावधीत सर्वसाधारणपणे वीज वापर इतर महिन्यांपेक्षा जास्त असतो.

पुढे जून महिन्यात महावितरणने घेतलेल्या प्रत्यक्ष अंतिम मीटर रीडिंग नुसार वीज बिले दिली. आणि यामध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमधील सरासरी बिल रक्कम आणि प्रत्यक्ष वापरातील फरक जून महिन्यामधील बिलात ऍड किंवा वजा करण्यात आला.

सोबतच एप्रिल पासून वीजेचे दर देखील वाढले आहेत.

SAVE 20201031 100622

(वाढलेल्या वीज बिलाचे फोटो : संदर्भ – महावितरण वेबसाईट)

त्यामुळे या वाढलेल्या दराचाही फरक पडला आहे. या सर्व गोष्टीमुळे जूनमध्ये आलेले बिल बरोबर होते. असे ही राउत बोल भिडूशी बोलताना म्हणाले. 

यामधे सूट काय आहे?

तर महामंडळाकडून यासाठी स्लॅब बेनिफिट देण्यात आला आहे.

यामध्ये अंतिम रीडिंगला ३ ने भागून १ महिन्याचे स्वतंत्र बिल काढून त्याची टोटल केली आहे. म्हणजे जर जूनमधे तुमच रीडिंग ५०० युनिट आलं असेल तर ५००/३ = १६६.६६ युनिट प्रति महिना. यात पहिल्या १०० युनिटला ३.४६ रुपयांनी. तर वरील ६६ युनिटला ७.४३ रुपयांनी दर आकारण्यात आला आहे. असेही राउत यांनी सांगितले.   

तसेच तीन महिन्याचे एकत्रित वीज बिल एकरकमी भरणाऱ्या वीज ग्राहकांना त्यांच्या वीज बिलात दोन टक्के सवलत देणार आहे. तर मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीज बिलाचे तीन सामान हप्ते करून देण्यात येणार आहेत. ज्यामुळे एकदम बिल भरण्यासाठी लोड येणार नाही.

काही ग्राहकांनी आधीच ही बिल भरायला सुरुवातही केली आहे. 

त्यामुळे भिडूनों जर सरकारकडून लवकरात लवकर काही सूट मिळाली नाही तर तुम्हाला आम्हाला आज ना उद्या ही सगळी बिल भरावीच लागणार आहेत. नाही तर पुढच्या काही दिवसात महामंडळवाले येऊन लाईट तोडून गेलेच म्हणून समजा..

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.