दिल्लीनंतर आता मुंबई विमानतळावरही रेल्वे स्टेशनसारख्या रांगा… काय आहे कारण ?

ट्विटरवर अनेकांनी काही व्हिडीओज पोस्ट केलेत. त्या व्हिडीओ मध्ये लोक लांबच लांब रांगा लावून हातात बॅगा घेऊन असे उभे आहेत. आधी मुंबई लोकलचं तिकीट काढण्यासाठी लोक उभे आहेत असं वाटलेलं. पण, ते तसं नाहीये ते व्हिडीओ मुंबई आणि दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमावतळांवरचे आहेत.

आधी दिल्ली आणि आता मुंबई विमानतळावरही प्रवाश्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतायत.

आधी बघुया दिल्ली एअरपोर्टवरचं प्रकरण काय होतं…
दिल्लीमधल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-३ इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या. डिसेंबर महिना सुरू झाला आणि ही गर्दी व्हायला सुरूवात झाली. चेक-इन करण्यासाठी आणि सिक्युरिटी काऊंटरला पोहोचण्यासाठी रांगा लागायच्या. विमातळावर ३ तास आधी येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

ही परिस्थिती लक्षात घेऊन देशाचे विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी दिल्ली विमानतळावर पुर्वसूचना न देता भेट दिली होती. त्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते,

“आम्ही अभ्यास केला आहे आणि अडचणींचा सारांश घेतला आहे; सीआयएसएफ पुरेसा कर्मचारी वर्ग देईल, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

आता हे झालं दिल्ली विमानतळाचं पण, मुंबई विमानतळावर आता काहीशी तशीच परिस्थिती दिसली…

मुंबई विमानतळावर नेमकी कसली गर्दी?
मुंबई विमानतळावरही आता चेक-इन काऊंटर, सिक्युरिटी काऊंटर आणि इमिग्रेशन काऊंटरवर जाण्यासाठी मोठ्या रांगा दिसत आहे. या रांगा इतक्या मोठ्या होत्या की, लोकांना तब्बल ३-४ तास रांगेतच उभं राहावं लागत होतं.

इमिग्रेशन काऊंटर म्हणजे काय?
हा इमिग्रेशन काऊंटर म्हणजे ज्यावेळी देशाचे नागरिक भारतातून बाहेर जात असतात त्यावेळी त्यांचा पासपोर्ट आणि व्हिजा चेक केला जातो. विमानतळावर हे चेक करण्यासाठीचे अधिकारी हे इमिग्रेशन काऊंटरवर बसलेले असतात. हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पासपोर्टवर त्या तारखेचा स्टॅम्प मारून दिला जातो.

आता पाहुया ही गर्दी होण्यामागची नेमकी कारणं काय होती…
दोन्ही विमानतळं ही मुळातच गजबजलेली असतात:
खरंतर दिल्ली ही देशाची राजधानी आणि मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळं मुळातच या दोन्ही विमानतळांवर मुळातच खूप गर्दी असते.

डिसेंबर महिन्यात दरवर्षी लोक फिरायला म्हणून बाहेर जात असतात:
डिसेंबर हा महिना मुळातच पर्यटकांसाठी आनंददायी असतो. भारतातील बरेचसे लोक हे डिसेंबर महिन्यामध्ये फिरायला जात असतात. यामागचं कारण म्हणजे डिसेंबरची गुलाबी थंडी आणि त्या नाताळच्या असणाऱ्या सुट्ट्या. त्यामुळं, डिसेंबर महिन्यात विमानतळांवर थोडा ताण हा येतच असतो.

दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त डिसेंबर:
पर्यटकांचा आवडता महिना असलेला डिसेंबर हा २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षांमध्ये निर्बंधांखालीच गेला. त्यामुळं, यंदाचा डिसेंबर हा अनेकांसाठी खास असणार आहे. पर्यटक मोठ्या संख्येने फिरायला जाण्यासाठी बाहेर पडतायत त्यामुळे, विमानतळांवरचा ताण वाढतोय.

१० डिसेंबरला मुंबई विमानतळावर आतापर्यंतचे सर्वाधिक प्रवासी:
माध्यमांच्या माहिती नुसार १० डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर आतापर्यंतचे सर्वाधिक प्रवाशांची  नोंद करण्यात आली. १० तारखेला तब्बल १ लाख ५० हजार ९८८ इतक्या मुंबईत आलेल्या आणि बाहेर गेले.

डॉमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमानतळांवर प्रवासी संख्येत वाढ:
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्याशी तुलना करून पाहिली. या तुलनेत डॉमोस्टिक म्हणजेच भारतातल्या भारतात प्रवास करणाऱ्यांची संख्या ही २६ टक्क्यांनी वाढलीय तर, आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत १४० टक्क्यांनी वाढ झालीय.

२०२२ मध्ये मागच्या वर्षीपेक्षा अधिक नागरिकांनी केला परदेशी प्रवास:
२०२१ साली जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यात ७७.२ लाख प्रवाश्यांनी परदेशी प्रवास केला होता तर यंदाच्या वर्षी १ कोटी ऐंशीलाख प्रवाश्यांनी परदेशी प्रवास केला. हा आकडा मागच्या वर्षीच्या आकड्याच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक आहे. अशी माहिती इमिग्रेशन ब्युरोकडून मिळाली आहे.

दरम्यान, दिल्ली विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी २ नवे एन्ट्री गेट्स सुरू करणार आणि सीआयएसएफ चे अणखी जवान तैनात करणार अशी घोषणा ज्योतिरादित्य सिंधीया यांनी केलीये. दरम्यान, मुंबई विमानतळावरील गर्दी कमी व्हावी याकरता शासन काय निर्णय घेतं याकडे पाहणं गरजेचं असेल.

चीनमधला कोरोनाचा अतिशय घातक व्हेरियंट BF.7 भारतात आलाय…

आता हा धोकादायक व्हेरियंट भारतात आल्यापासून सरकार सतर्क झालंय. या व्हेरियंटमुळे देशात हाहाकार माजू नये म्हणून शासन-प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जातील यात काही शंकाच नाही. पण हे करत असताना पुन्हा एकदा एअरपोर्टवरची बोर्डिंग इन आणि बोर्डिंग डाऊन या दोन्ही प्रक्रिया लांबणार त्यामुळे गर्दीही वाढणार.

गर्दी वाढल्यास कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा वेगही वाढू शकतो. त्यामुळे, शासनाला ही गर्दी कमी करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करणं गरजेचं आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.