आदिवासी खेड्यात शिकार करणाऱ्या तिरंदाजांला थेट ऑलिंपिकला उतरवलं होतं.

अखंड पसरलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यात प्रचंड टॅलेंट लपलेलं आहे. पण एक तर हे टॅलेंट शोधण्याची सिस्टीम नाही किंवां आपल्या सिस्टीमला ते शोधायचेच नाहीत. बऱ्याचदा अस होत की वशिला भ्रष्टाचार व इतर अनेक कारणांनी पोखरलेल्या सिस्टीमने खेडोपाड्यातून येऊ पाहणारं टॅलेंट मारूनच टाकलं आहे.

पण या सर्वावर मात करून वर आला होता लिंबाराम.

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. दिल्लीत एशियाड गेम्स भरवून आपण यशस्वी सुद्धा करून दाखवल. आता पुढच स्वप्न ऑलिंपिकच होत. नवे पंतप्रधान राजीव गांधी तरुण होते. खेळात विशेष रुची असणारे होते. त्यांनी स्पेशल एरिया गेम्स प्रोग्रॅमची सुरवात केली होती. या प्रोग्रॅम अंतर्गत आदिवासी भागात लपलेले चपळ काटक प्रतिभावान खेळाडू शोधून काढायचे होते.

राजस्थानच्या मकरादेव या आदिवासी गावात देखील एक कॅम्प भरवण्यात आला. हा कॅम्प तिरंदाजांना शोधण्यासाठी होता.

लिम्बारामच गाव तेथून जवळच होत. राजस्थानच्या अहरी आदिवासी जमातीत जन्मलेला हा मुलगा. त्याची घरची परिस्थिती प्रचंड गरीबीची होती. त्याच्या आई वडिलाना असलेल्या पाच मुलांपैकी एक. शाळा शिक्षण याचा दूरदूरचा संबंध नाही. दिवसभर मित्रांबरोबर जंगलात गुरे राखणे, तेथून औषधी वनस्पती, लाकूडफाटा गोळा करून आणणे हेच चाललेलं असायचं.

पण लिंबाराम शिकारीत एक्स्पर्ट होता. त्याच्या आदिवासी जमातीत धनुर्विद्या व शिकार परंपरेने चालत आलेली. लिंबाराम घरातच तयार केलेल्या धनुष्य बाणापासून पक्ष्यांची शिकार करायचा. त्याच कौशल्य बघून भलेभले चाट पडायचे. या बद्दल संपूर्ण गावात कौतुक व्हायचं.

त्याच्या काकांना कुठून तरी बातमी समजली की सरकार तिरंदाजीची स्पर्धा घेतंय. पंधरा वर्षाच्या लिंबाराम घेऊन ते मकरान गावी आले.

तिथल्या कॅम्पमध्ये आसपासच्या गावातून अनेक मुले आली होती. धनुर्विद्या स्पर्धा  झाली. लिम्बारामने ती सहज जिंकली. ही स्पर्धा घेणारे स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाचे कोच सुद्धा आश्चर्यचकित झाले. लिम्बाराम एवढी अचूक नेमबाजी तर भारतातला सर्वोतम खेळाडू सुद्धा करू शकत नव्हता.

आरएसएस शी जोडल्या गेलेल्या वनवासी कल्याण आश्रमचा देखील दावा आहे की

लिंबारामला पहिली ओळख त्यांच्या एकलव्य खेलकुद प्रतियोगिता स्पर्धेतून मिळाली. 

पण ते काही का असेना कधी नव्हेसरकारी यंत्रणा हलली व लिम्बाराम व तिथले अजून तीन मुले यांना दिल्लीला घेऊन येण्यात आलं. ते वर्ष होत १९८७. दिल्लीत आधुनिक धनुष्य देऊन त्यावर त्याच ट्रेनिंग झाल. अवघ्या काही महिन्यातच लिंबारामने भारताच्या ज्युनियर व सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप खिशात टाकली.

त्याच्या पुढच्याच वर्षी सेउल मध्ये भरलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सोळा वर्षाचा हा आदिवासी मुलगा भारताचे प्रतिनिधित्व करत होता.

त्याला अजून पुरेसा अनुभव नव्हता. परदेशी भूमीत फाडफाड इंग्रजी भाषेत बडबडणारी गोरी माणस बघून तो दबून गेला तरी त्याने सेमीफायनल पर्यंत मजल मारली. पुढच्या वर्षी मात्र आशिया कपमध्ये त्याने वैयक्तिक रौप पदक मिळवल आणि सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिल.

हळूहळू आधुनिक जगाशी लिम्बाराम अॅडजस्ट होत होता.

दिल्लीतून दक्षिण कोरियाला तिरंदाजीच्या प्रशिक्षणासाठी पाठवल. जगातले तिरंदाज कशी ट्रेनिंग घेतात, ते कसा विचार करतात हे लिंबारामला तिथे अनुभवायला मिळाल. एकाग्रता, मेडीटेशन याच महत्व त्याने शिकून घेतलं.

१९९२ सालच्या बीजिंग एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत ३६० पैकी ३५७ गुण कमवत लिम्बारामने  जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. अगदी भारतीय संसदेत त्याच कौतुक करण्याचा ठराव पास झाला.

त्याच वर्षी होणाऱ्या बार्सिलोना ऑलिंपिक स्पर्धेत लिंबाराम भारताला पदक मिळवून देईल याची शंभर टक्के खात्री सगळ्या देशाला होती.

वाजत गाजत लिंबाराम बार्सिलोना ऑलिंपिकला गेला. स्पर्धच्या दिवशी लिंबाराम आपल्या खोलीत एकाग्रता होण्यासाठी मेडीटेशन करत होता. पण भारतीय संघाचे काही अधिकारी अचानक त्याच्या रूममध्ये दाखल झाले आणि बडबड करायला सुरवात केली.

तू देशाला मेडल मिळवून दिलस तर तुला डोक्यावर उचलून आम्ही दिल्लीला नेऊ. तू देशाचा अभिमान आहेस वगैरे वगैरे.

गरीब बिचारा लिंबाराम मला डिस्टर्ब होत आहे अस त्यांना सांगू देखील शकला नाही. मात्र त्या अधिकाऱ्यांनी मुद्दामहून ऐनवेळी टाकलेलं प्रेशर यामुळे त्याची एकाग्रता भंग झाली. त्यानंतर कितीही प्रयत्न केला तरी त्याला ते जमल नाही. याच गोंधळात स्पर्धा सुरु झाली.

एवढ होऊन ही लिंबारामने त्याचा बेस्ट शॉट दिला.  प्राथमिक फेरीत तो ३३६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या मुळे त्याच्या कडून अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र अंतिम फेरीत १२ पैकी एका ही प्रयत्नात त्याला अचूक लक्ष्यवेध करता आला नाही.

अवघ्या १ गुणाने लिंबारामचे कांस्यपदक हुकले.

लिंबाराम ही स्पर्धा हरला मात्र समाजातल्या वंचित घटकापर्यंत पोहचल्यास ऑलिंपिकपटू घडू शकतात हा विश्वास निर्माण झाला. त्याच्या या कामगिरीमुळे जगभरात भारतीय तिरंदाजांची दखल घेतली जाऊ लागली.

लिंबाराम ही स्पर्धा हरला पण त्याच वय फक्त २२ वर्षे होते. अजून बराच मोठा पल्ला त्याला गाठायचा होता. पुढच्या काळात त्याने कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई गेम्स मध्ये मेडल जिंकले. टाटा कंपनीने त्याला नोकरी देखील दिली.

मात्र १९९६ सालच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये फुटबॉल खेळत असताना त्याला अपघात घडला. त्याचे खांद्याचे हाड निखळले होते. त्याचे ऑपरेशन झाले. साधे धनुष्य उचलणे त्याला जमत नव्हते. या अपघातानंतर त्याच करीयर संपून गेलं. २००३ साली त्याने परत एकदा स्पर्धात उतरण्याचा प्रयत्न केला पण तो १६ वां आला.

दरम्यानच्या काळात या आदिवासी तिरंदाजाकडे कोणी लक्ष देखील दिले नाही. 

पुढे २००९ साली त्याची निवड भारतीय तिरंदाजीचा कोच म्हणून झाली व तो परत प्रकाश झोतात आला. या काळात त्याने मेहनतीने अनेक खेळाडू घडवले. २०१२ साली भारत सरकारतर्फे त्याला पद्मश्री देऊन गौरव करण्यात आला.

मात्र गेली काही वर्षे हा आधुनिक एकलव्य पुन्हा अन्यायाच्या काळोखात बुडून गेला. काही दिवसांपूर्वी त्याला एका असाध्य रोगाने गाठले आहे व त्याच्या जवळ उपचारासाठी देखील पैसे नाहीत ही बातमी आली. त्यानंतर त्याच्यासाठी मदत उभी करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.

आजही तो या रोगाशी लढा देत आहे. आर्चरी असोशिएशन ऑफ इंडिया सध्या देखभाल करत आहेत अस म्हणतात.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.