तो गल्लीत फुटबॉल खेळायचा, आज मेस्सी त्याच्या कंपनीचा ब्रँड अँबॅसिडर आहे…
असंच कधी विचारांची तार लागली, की डोक्यात विचार येतो. फुटबॉलचं येड सगळ्या जगाला लागलंय, मग एवढी लोकसंख्या असूनही भारतात फुटबॉलची म्हणावी तितकी खळबळ का झाली नाही? आपल्याकडची पोरं बार्सिलोना आणि माद्रिदची मॅच बघायला रातभर जागतात, पण आयएसएलमध्ये काय चाललंय हे या गड्यांना माहीत नसतंय.
पण मार्चमध्ये एक बातमी आली की,
भारतातली ‘बायजूस’ कंपनी २०२२ मध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपची ऑफिशियल स्पॉन्सर आहे.
फिफाचे चीफ कमर्शियल ऑफिसर केय मदाती यांनी या डीलवरुन बायजूसचं प्रचंड कौतुक केलं होतं. इथंच थांबली नाही. वर्ल्डकप तोंडावर आलेला असतानाच नवी बातमी आली ती म्हणजे, अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉल प्लेअर आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या प्लेअर्सपैकी एक असणारा मेस्सी बायजूसचा ग्लोबल ब्रँड अँबॅसिडर बनलाय.
सगळं फुटबॉल विश्व ज्या मेस्सीसाठी झुरतं, ज्याला आदर्श मानतं तो मेस्सी आता भारतीय कंपनीचा ब्रँड अँबॅसिडर असेल.
पण आधी फुटबॉल वर्ल्डकपसारख्या मोठ्या इव्हेंटला स्पॉन्सरशिप आणि मग मेस्सीसारख्या बड्या प्लेअरला साईन करणाऱ्या बायजूसनं एवढी मोठी मजल कशी मारली? त्यांचा प्रवास कसा होता? हे पण माहिती पाहिजेल की.
बायजूस हे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचं शिक्षण देणारं ॲप केरळमधल्या बायजू रवींद्रन यांनी २०१५ मध्ये सुरु केलं होतं.
आई-वडील शिक्षक असूनही त्यांना शाळेची गोडी नव्हती. शिक्षणापेक्षा फुटबॉलवर त्यांचा जास्त जीव. दिवसभर फुटबॉल खेळल्यानंतर घरी आल्यावर जमल तसा अभ्यास करायचा. असा सगळा विषय होता. याबद्दल ते एका मुलाखतीत अभिमानाने सांगतात की, “मी विद्यापीठ स्तरावर फुटबॉल, क्रिकेट आणि बॅडमिंटनसोबत सहा खेळ खेळलोय.”
खेळासाठी लेक्चर्स बुडवल्यानंतर, रवींद्रनना त्यांचा राहिलेला अभ्यास कोणाची तरी पुस्तकं आणि नोट्स गोळा करून करायला लागायचा. गणितात हुशार असल्यामुळं पुढं कन्नूरच्या सरकारी कॉलेजमधून त्यांनी मॅकेनिकल इंजीनियरिंगला ॲडमिशन घेतलं.
शिक्षण पूर्ण झाल्यावर टिपिकल इंजिनिअरींग पूर्ण झालेल्या पोरांसारखं बायजू यांनी पण फॉरेनमधल्या मल्टिनॅशनल कंपनीत सर्व्हिस इंजीनियर म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथं २ वर्ष चांगल्या पगारावर नोकरी केली.
२००३ मध्ये नोकरी दरम्यानच ते मंगलोरमध्ये सुट्टीसाठी आले, त्यावेळी CAT परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या काही मित्रांनी गणित चांगलं असल्यानं बायजू यांना मदत करण्याची मागणी केली. त्यांच्या मदतीनं मित्रांनी चांगले गुण मिळवलेच. पण गंमतीत CAT देऊन बघितलेल्या बायजू यांनी १०० percentile मिळवले.
यानंतर ते पुन्हा नोकरीसाठी निघून गेले. पुढं दोन वर्षांनी म्हणजे २००५ मध्ये ६ आठवड्यांसाठी ते जेव्हा पुन्हा भारतात परतले, तेव्हा त्यांनी CAT करणाऱ्या आणखी काही लोकांना मदत केली. सुरुवातीला रवींद्रन यांनी ज्यांना CAT परीक्षेचं प्रशिक्षण दिलं त्या सगळ्यांचे निकाल अगदी कौतुकास्पद होते.
आपल्या साध्या कोचिंगचे येणारे रिझल्ट बघून त्यांनी आपल्या पालकांप्रमाणे शिक्षक व्हायचं ठरवलं.
याच कोचिंगला त्यांनी व्यवसायात बदललं. सुरुवातील घराच्या गच्चीवर क्लास घेऊ लागले. त्यांची गणिताचे प्रॉब्लेम्स सोडवण्याची पद्धत बघून हळू-हळू आणखी मुलं प्रवेश घेत होती. सोमवार ते शुक्रवार ते बेंगळुरूमधल्या तरुणांसाठी कोचिंग घ्यायचे. क्लासचं रूपांतर वर्कशॉपमध्ये झाल्यावर त्यांनी मुंबई आणि पुण्यात शनिवार आणि रविवार वर्कशॉप घ्यायला सुरूवात केली.
नंतर जेव्हा वर्ग कमी पडू लागले, तेव्हा त्यांनी १२०० विद्यार्थ्यांसाठी हॉल बुक केला. यात विद्यार्थी मोठ्या संख्येनं आणि एकदम उत्साहानं उपस्थित राहायचे. अगदी पिन ड्रॉप सायलेन्समध्ये त्यांचं वर्कशॉप ऐकलं जायचं. अनेक शहरांमध्ये व्यवसाय सुरू झाल्यानं रविंद्रन एका आठवड्यात तब्बल नऊ शहरांचा प्रवास करत होते.
यावर त्यांनी वेबवेक्स वापरून आधीच रेकॉर्ड केलेल्या कोचिंगचं स्क्रीनिंग करण्याचा मार्ग शोधून काढला. व्हिडिओ बघितल्यावर येणाऱ्या शंकांची उत्तर देण्यासाठी नंतर अनेक नवीन व्हिडीओ बनवले.
पुढं इंजिनिअरींग सोबतच त्यांनी आपलं लक्ष शालेय शिक्षणाकडेही वळवलं. यासाठी २०११ मध्ये त्यांनी ‘THINK AND LEARN’ नावाची कंपनी सुरु केली.
यानंतर २०१५ मध्ये त्यांनी BYJU’S Learning App ट्रायल म्हणून लॉंच केलं.
आधी ३ विषयांमध्ये सुरुवात केली. ॲप डाउनलोड केल्यानंतर गणित, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रातले काही व्हिडिओ त्यांनी स्वतः पहिले. त्यामुळे कमतरता शोधण्यास मदत होत होती. निरस वाटणाऱ्या लेक्चर्समध्ये ग्राफिक्स आणि ॲनिमेशनचा वापर करू लागले. पहिल्याच वर्षात ५५ लाख लोकांनी हे ॲप डाऊनलोड केलं.
आता तर हे ॲप सगळ्या भारतात फेमस झालं आहे. यात अगदी सगळ्याच विषयांचा समावेश केला आहे. आज सहावी पासून बारावी पर्यंत ते CAT, UPSC, IIT-JEE, NEET यासारख्या परीक्षांसाठीची लेक्चर्सही बायजूसकडून घेतली जातात.
लोकप्रियतेमुळे कंपनीला गुंतवणूकदार देखील मिळत गेले. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रवींद्रन यांची कंपनी ‘थिंक अँड लर्न’नं मध्यंतरी १०३५ कोटी रुपये निधी उभारला होता. बायजूसमध्ये सध्या फेसबुकच्या मार्क झुकरबर्गपासून चायनाच्या टेंसेंटसारखे नामवंत गुंतवणूकदार आहेत. २०२० च्या फोर्ब्सच्या यादीत देखील त्यांना स्थान मिळालं होतं.
पहिले काही दिवस क्लासला नावही नसणाऱ्या बायजू सरांच्या क्लासचे आज साडेतीन कोटींपेक्षा जास्त सब्सक्राईबर्स आहेत. यातले २४ लाखपेक्षा जास्त पेड युझर्स आहेत. जे दरवर्षी १० ते १५ हजार रुपये फी जमा करतात. बायजूसची ऑफिसेस आता २१ देशांमध्ये आहेत, आणि त्यांचे क्लासेस पाहिले जातात १२१ देशांमध्ये. त्यात आता फुटबॉल वर्ल्डकप आणि मेस्सीमुळं ते सगळ्या जगात फेमस होणार हे नक्की.
हे आकडे, प्रतिक्रिया यापेक्षा भारी गोष्ट म्हणजे,
बायजू रवींद्रन एकदा म्हणाले होते की, ”मी योगायोगानं बिझनेसमध्ये आलो. दिवसभर काम केल्यावर मी दररोज रात्री फुटबॉल खेळतो.”
गल्लीत खेळताना लागलेलं फुटबॉलचं येड त्यांनी आजवर जपलंच, पण आपल्या कंपनीला डायरेक्ट फुटबॉल वर्ल्डकपचं स्पॉन्सर, मेस्सीला ब्रँड अँबॅसिडर बनवून त्यांनी अगदी नादखुळा गोल मारलाय.
हे ही वाच भिडू:
- धारावीच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळावे म्हणून हि तरुणी उपक्रम राबवतेय.
- कोल्हापूरात फुटबॉलचा विकास कोणामुळे झाला असेल तर तो शाहू महाराजांच्या प्रयत्नांमुळेच !
- चहा विकून मोठ्ठ होणाऱ्यांच्या यादीत एक नाव समाविष्ट केले पाहिजे, फुटबॉलचा देव पेले