पटोलेंचं म्हणणंय काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल पण कुणाच्या जोरावर ?

सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेतून वेगळ्या झालेल्या शिंदेगटाची सत्ता आहे. शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीची सत्ता गेली. आता महाविकास आघाडी ही एकत्रितपणे आगामी निवडणुकाही लढेल असं वाटत असताना राज्यातल्या राजकारणात अनेक युत्या-आघाड्यांची शक्यता वर्तवल्या जातायत, त्यामागे कारणंही तशीच आहेत.

सगळ्यात आधी तर, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील वाढती जवळीक हा मुद्द चर्चेत आला. आता शिवसेनेने युती करायचं म्हणलं, तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला हे मान्य असेल का? हा मुद्दा चर्चेत आला.

त्यानंतर, नुकतंच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आणि मग राष्ट्रवादी-भाजप असं नवं समीकरण पाहायला मिळेल का? या प्रश्नावरही राज्यभर चर्चा सुरू झाल्या.

आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल असं वक्तव्य केलंय.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांकडून होत असलेली ही वक्तव्य आणि हालचाली लक्षात घेता महाविकास आघाडीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.

बरं, मुद्दा हा नाहीये की, महाविकास आघाडीचं काय होणार? तर, नाना पटोले यांनी बोलताना काँग्रेसमध्ये एकनाथ शिंदें पेक्षाही ताकदीचे नेते आहेत असं म्हटलंय.

नाना पटोले म्हणालेत,

“काँग्रेसकडे आर्थिक, शारीरिक सर्व सक्षम लोक आहेत. मात्र, कुठं कमी पडतो हेच कळत नाही. नवी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत काँग्रेसला मानणारा वर्ग आहे. येथे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही ताकदीचे नेते आहेत. फक्त आपल्याकडे खोके आणि धोकेवाली लोकं नाही आहेत”

त्यामुळे, प्रश्न असा निर्माण होतोय कि, काँग्रेसमधले महाराष्ट्रातले ताकदीचे नेते आहेत तरी कोण? तेच बघुया.

  • सगळ्यात आधी ज्यांनी वक्तव्य केलंय ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वत: या यादीत आहेत.

एकेकाळी भाजपकडून खासदार झालेले नाना पटोले हे सध्या काँग्रेसमध्ये स्थिरावलेत. सध्या सकोळी या मतदार संघातून आमदार असलेले नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी ही आहेत.

एकंदरीत त्यांची राजकीय कारकीर्द बघितली तर, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजकारणात उतरल्यानंतर आमदार मग खासदार त्यानंतर ऑल इंडिया किसान काँग्रेसचे अध्यक्ष मग पुन्हा आमदार, विधानसभेचे अध्यक्ष आणि आता काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद. त्यामुळे नाना पटोले हे अगदी तळागाळापासून ते दिल्लीपर्यंत हात पोहोचलेला काँग्रेसमधला नेता असल्याचं लक्षात येतं.

  • माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण काँग्रेस नेत्यांच्या यादीत आहेत.

एकेकाळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेले अशोक चव्हाण हे सध्या काँग्रेसवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी सध्यातरी ते काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे त्यांचं नाव या यादीत घ्यावंच लागतंय.

अशोक चव्हाणांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर, अगदी सुरूवातीपासूनच ते काँग्रेस पक्षात आहेत. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थ्यांचे मुद्दे उचलले आणि ते विद्यार्थी नेते झाले. त्यानंतर राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येताना त्यांनी सुरूवातच काँग्रेस पक्षाकडून केली.

सुरूवातीलाच त्यांना महाराष्ट्र काँग्रेसचं सरचिटणीस पद देण्यात आलं.

त्यानंतर अशोक चव्हाणांची राजकारणातली दौड सुरू झाली. एकेक करून मग आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद आणि थेट मुख्यमंत्रीपद असं सगळं अशोक चव्हाणांनी पाहिलंय. त्यामुळे, महाराष्ट्राच्या राजकारणातला एक जाणकार आणि वरिष्ठ नेता म्हणून अशोक चव्हाणांकडे पाहिलं जातं. तसेच दांडग्या अनुभवानंतर त्यांची प्रशासनावरती असणारी पकड हा वजनाचा मुद्दा ठरतो. याशिवाय अशोक चव्हाण हे सध्या काँग्रेसच्या संसदीय मंडळातही आहेत.

  • बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र काँग्रेसमधलं आणखी एक मोठं नाव.

थोरातांनी आपली राजकीय कारकीर्द ही खरंतर एक अपक्ष उमेदवार म्हणून सुरू केली. संगमनेर विधानसभा मतदार संघातून १९८५ साली त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि अपक्ष म्हणून ते निवडूनही आले.

त्यानंतर मग सलग ७ वेळा ते काँग्रेसकडून आमदार आहेत. १९८५ ते आजर्यंत थोरातच संगमनेर मतदार संघाचे आमदार राहिलेत. यावरून त्यांची मतदार संघावर असलेली पकड लक्षात येते. त्यामुळे, काँग्रेससाठी बाळासाहेब थोरात हे फार महत्त्वाचे नेते आहेत. थोरातही काँग्रेसच्या संसदीय मंडळात आहेत.

  • यानंतरचं काँग्रेसचं महाराष्ट्रातलं नाव म्हणजे पृथ्वीराज चव्हाण.

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोबतच केंद्रीय मंत्रीपद भुषवलेलं नेतृत्व म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातल्या कराड इथून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले.

खरंतर, त्यांचे वडील दाजीसाहेब चव्हाण हे स्वत: राजकारणात होते आणि तेही कराड लोकसभेतून खासदार होते. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची आई प्रेमला चव्हाण याही याच मतदार संघातून खासदार होत्या. त्यामुळे राजकारणात येण्यात त्यांना फारशा अडचणी निर्माण झाल्या नाहीत. पण, त्यांची कारकीर्द जी उभी राहिली ती त्यांच्या स्वत:च्या बळावरच.

त्यामुळे, राजकीय पार्श्वभुमी असलेला, दांडगा अनुभव असलेला आणि राज्यापासून ते केंद्रापर्यंत हात पोहोचलेला नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं.

सध्या ते कराड दक्षिण विधानसभेतून ते आमदार आहेत. सोबतच ते काँग्रेसच्या संसदीय मंडळात आहेत आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या शिस्तपालन कृती समितीचेही ते अध्यक्ष आहेत.

  • सुशीलकुमार शिंदे

मुळात, सुशीलकुमार शिंदे यांनीही केंद्रातलं राजकारण आणि राज्यातलं राजकारण हे अगदी जवळून पाहिलंय. मुख्यमंत्री पद, केंद्रातलं मंत्रीपद हे सगळं त्यांनी अनुभवलंय. आता पुन्हा एकदा त्यांचं नाव पुढे येतंय ते भारत जोडो यात्रेदरम्यान राहूल गांधी महाराष्ट्रात असताना त्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर दिसलाय.

आता पाहूया काँग्रेसमधील महिला नेत्यांची नावं –

  • वर्षा गायकवाड

२००४ साली पहिल्यांदा आमदार झाल्यापासून ते आतापर्यंत त्या आमदार आहेत. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्यात मंत्रीपदही भुषवलं आहे. सलग ४ वेळा आमदार असलेल्या वर्षा गायकवाड यांचं मुंबईतल्या धारावी मतदारसंघात चांगलंच वलय आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शालेय शिक्षणमंत्री पद हाती असल्यामुळं वर्षा गायकवाड यांचं नाव राज्यभर गाजलेलं आहे. त्यातल्या त्यात कोविड सारख्या काळात मुलांचं शिक्षण कसं होणार हा प्रश्न असताना शिक्षणमंत्री म्हणून सतत समोर येणारा चेहरा हा वर्षा गायकवाडांचा होता. त्यामुळे वर्षा गायकवाड हे नाव आणि त्यांचा चेहरा हा महाराष्ट्र काँग्रेससाठी महत्वाचा आणि मोठा आहे.

  • रजनीताई पाटील हे महाराष्ट्र काँग्रेसमधलं मराठवाड्यातलं एक मोठं नाव आहे.

महाराष्ट्रातल्या जुन्या महिला नेत्यांपैकी एक असलेलं नेतृत्व म्हणजे रजनी पाटील आहे. १९९६ साली ११ व्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघातून त्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००५ साली केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

न्यूयॉर्कमधील यूएन मुख्यालयात महिलांच्या स्थितीवरील UN आयोगाच्या ४९ व्या सत्रात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलंय. सध्या त्या राज्यसभेवर खासदार आहेत. याशिवाय त्या जम्मू आणि काश्मीरच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रभारी आहेत.

  • आणखी एक म्हणजे यशोमती ठाकूर

काँग्रेसच्या विद्यमान आमदार आणि माजी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या महाराष्ट्र काँग्रेसमधील एक खमकं नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. सतत मीडियामध्ये काँग्रेसची बाजू ठामपणे मांडण्याचं काम त्या करतायत. त्यामुळे, सक्रिय राजकारणाचा शिक्का त्यांनी यशस्वीपणे मिळवला आहे.

यशोमती ठाकूर हे नाव आणि त्यांचा चेहरा मतदारांना ओळखीचा झालेला असल्याने त्या महाराष्ट्र काँग्रेससाठी एक महत्त्वाचं नाव आहे.

एकंदरीतच हे नेते आणि त्यांची राजकीय कारकीर्द लक्षात घेतली तर, नाना पटोलेंनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसकडे अनुभवी आणि ताकद असलेले नेते आहेत हे खरं आहे. पण, आता हे अनुभव, ताकद असलेले नेते निवडणुकांमध्ये आपलं मॅजिक दाखवून पटोले यांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसला स्वबळावर सत्तेत आणु शकतात का हे पाहणं गरजेचं आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.