माता वैष्णो देवी क्षेत्र आता लिथियम कॅपिटल बनतंय का ?

देशातल्या सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असणारं क्षेत्र म्हणजे माता वैष्णोदेवी. जिथे वर्षाला ५०० कोटींची देणगी येत असते इथे होणाऱ्या उलाढालीमुळे स्थानिक गावातल्या लोकांचा उदरनिर्वाह ठीकठाक चालतो. पण याच श्रीमंती मध्ये आणखी एका संपत्तीची भर पडलीय. 

जम्मूच्या माता वैष्णोदेवीच्या मंदिराच्या जवळील एका गावातून भारताला एक मोठी बातमी मिळाली आहे. अशी बातमी जी भारत देशाचं भविष्य बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. माता वैष्णोदेवीच्या अगदी जवळ असलेल्या सलाल हेमना गावात खजिना सापडला आहे. 

हा खजिना दुसरं तिसरं काही नसून लिथियमचा साठा आहे. देशात पहिल्यांदाच लिथियमचा साठा मिळाल्यामुळे हि बातमी महत्वाची आहे… 

जम्मूच्या रियासी जिल्ह्यातील सलाल हेमना गावात भारतात पहिल्यांदाच लिथियमचा साठा आढळला. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (GSI )सांगितले की, पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सालाल हेमना गावात ५९ टन लिथियम इन्फर्ड रिसोर्सेस (G3) साठा सापडला आहे. हे गाव माता वैष्णोदेवीच्या मंदिरापासून अगदी थोड्या अंतरावर आहे.

जिल्हा खनिज अधिकारी रियासी शफीक अहमद यांनी माध्यमांना सांगितले की, मिळालेला लिथियमचा साठा देश आणि केंद्रशासित प्रदेश पातळीवर लिलावासाठी नेला जाणार आहे, कारण ते एक प्रमुख खनिज आहे आणि देशात पहिल्यांदाच सापडले आहे. हा अफाट खजिना मिळाल्याने गाव आणि परिसरातील लोक खूप आनंदी झालेत. रियासीचे लोक एकमेकांचे अभिनंदन करताना थकत नाहीत.

येथे केवळ लिथियमच नाही तर १५ किमीच्या परिघात सोन्याचा साठाही सापडला आहे.  यामुळे रियासीतील लोकांचे भविष्य बदलणार आहे हे तर नक्की मात्र फक्त इतकंच नसून यामुळे संपूर्ण देशाचं भवितव्य बदलणार आहे.  

संपूर्ण देशाचं भवितव्य या गावात सापडलेल्या लिथियमवर अवलंबून आहे, कारण…

देशाला स्वावलंबी होण्यासाठी महत्त्वाची खनिजे शोधणे आणि साठवणे अत्यंत आवश्यक आहे. सोन्याची आयात कमी झाल्यास आपण स्वयंपूर्ण होऊ. तसंच लिथियमच्या बाबतीत आहे. कारण भारतात लिथियमचे उत्पादन फारच कमी आहे. भारत आपल्या गरजेसाठी ८० % लिथियमची गरज चीनद्वारे भागवतो. २०२० या सालाची आकडेवारी पाहता, लिथियम आयातीच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर होता. तेव्हा ११० कोटी रुपयांचे लिथियम भारताने आयात केले होते. गेल्या २ वर्षात लिथियमच्या किमती ६००% टक्क्यांनी वाढल्या आहेत. 

या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी भारत अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया आणि बोलिव्हिया यांसारख्या लिथियम समृद्ध देशांमधील खाणींमध्ये हिस्सा विकत घेण्यावर काम करत आहे. त्यामुळे देशात लिथियमच्या प्रचंड साठा हाती लागल्यामुळे संपूर्ण भारताचे चित्र बदलू शकते. ही माहिती समोर आल्यानंतर जगातील इतर बड्या देशांच्या नजरा भारताकडे खिळल्या आहेत. 

या लिथियम बॅटरीच्या निर्मितीमुळे मोबाईल क्रांती आली आहे. थोडक्यात लिथियमचा वापर मोबाईल, टीव्ही,लॅपटॉप, कॅमेरा, इलेक्ट्रिक वाहनांसह सोलर पॅनल अशा अनेक गोष्टींमध्ये चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो.  चार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी खूप खर्च येतोय.  

देशातील लिथियमचा वापर लक्षात घेता हा मिळालेला ५९ टन साठा आपली गरज भागवणारा आहे का ? हा अजून संशोधनाचा विषय मात्र या उपलब्धतेच्या आधारे भारत चीनला मागे टाकू शकतोय. लिथियमच्या या शोधानंतर भारत लिथियम साठ्याच्या बाबतीतच्या निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे आणि या पाऊलामुळे सरकारच्या स्वयंपूर्ण कार्यक्रमाला खूप फायदा होईल. कारण आता आपल्याला लागणारे सर्व लिथियम आपण परदेशातून आयात करतो. 

प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहने आणि सौरऊर्जेवर भर देत आहे, ज्यामध्ये हे लिथियम आता खूप महत्वाचं ठरणार आहे. जेंव्हा जेंव्हा पेट्रोल- डिझेल महाग होतं तेंव्हा तेंव्हा पेट्रोलियम पदार्थाना पर्याय शोधण्याचा प्रयत्न होतो आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या वाढत्या मागण्या पाहता लिथियमला खूप डिमांड येईल. 

दुसरीकडे ईव्ही आणि सौरऊर्जेचा कल वाढल्याने त्यांच्या किमती कमी होतील आणि महागड्या आयातीतून सरकारला दिलासा मिळेल. ज्याचा सरकारलाच काय तर सर्वांनाच फायदा होईल.

रशिया युक्रेनच्या युद्धामागे असलेल्या कारणांपैकी एक हे कारण होतं कि युक्रेनमध्ये लिथियमचा साठा मोठ्या प्रमाणात आहेत ते रशियाला हवाय म्हणून रशियाने युक्रेनवर हल्ला केला असल्याच्या चर्चा आंतराष्ट्रीय पातळीवर होऊ लागल्या होत्या. थोडक्यात आजच्या काळात आणि भविष्यच वेध घेत लिथियम सर्वच देशांना हवाय.  तोच साठा माता वैष्णो देवी क्षेत्रात सापडल्याने भारतासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.