परदेशातले भिडू नाही तर लिव्ह-इन रिलेशनशिपचे ट्रेंडसेटर भारतातले आदिवासी आहेत

बॉलिवूडमध्ये सध्या समाजात ‘बाऊ’ केल्या जाणाऱ्या गोष्टींना घेऊन चित्रपट बनवण्याचा नवीन ट्रेंड आलाय. चित्रपटांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम सध्या मोठ्या प्रमाणात केलं जातंय आणि अशामध्ये कोणत्या अभिनेत्यांचा समावेश आहे, असं म्हटलं तर काही चेहरे लगेच डोळ्यासमोर येतात. जसं की, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, भूमी पेडणेकर.

असाच एक विषय घेऊन क्रिती सेनॉन आणि कार्तिक आर्यन काही वर्षांपूर्वी आले होते. चित्रपटाचं नाव होतं ‘लुका छुपी’ आणि चित्रपट आधारित होता तो समाजातील ट्रेंडिंग विषयावर म्हणजेच ‘लिव्ह इन रिलेशनशिपट. आता हा असा विषय आहे ज्यासाठी आजही तरुणांना खूप झगडावं लागतं. लपून छपून एकमेकांसोबत राहावं लागतं आणि अशा नात्यांना समाज स्वीकारच करत नाही. कारण सध्या किंवा आधीपासून भारतीय परंपरेमध्ये प्रेमापेक्षा प्रतिष्ठेला जास्त महत्त्व दिलं जातं.

लिव्ह इन म्हणजे लग्न न करता दोन जणांनी आपसी स्विकृतीने एकमेकांसोबत राहणं. आता जेव्हा याबद्दल बोललं जातं तेव्हा म्हणतात की ही परदेशातून आलेली परंपरा आहे आणि भारतीयांनी त्याचा अवलंब करणं हे चूक आहे. मात्र जेव्हा या विषयाचा शोध आम्ही घेतला तेव्हा कळलं की ही परंपरा परदेशातून भारतात आलेली नाहीये तर भारतात ही पद्धत खूप आधीपासून आहे आणि आजही काही राज्यांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता आहे.

भारताचे मूळ रहिवासी म्हणजेच आदिवासी समाज आणि या समाजामध्ये लिव्ह इनला मान्यता आहे. फक्त लिव्ह इन आदिवासी भाषेत ‘ढुकू’ असं म्हटलं जातं.

यातील एक राज्य म्हणजे झारखंड. झारखंड मधील आदिवासी अगदी स्वातंत्र्याच्या आधीपासूनच्या काळापासून लिव्ह इन परंपरा जोपासतात. ही प्रथा राज्यातील गुमला, खूंटी, बसिया, घाघरा, पालकोट, चटकपुर, तोरपा, सिमडेगा आणि मनातू अशा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाणात बघितली जाते. २०१९ च्या एका रिपोर्टनुसार झारखंडमध्ये जवळपास २ लाख जोडपे लिव इनमध्ये राहतात.

आता ही अशी प्रथा भारतात अस्तित्वात आहे आणि याबद्दल माहित नाही हे कसं शक्य आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. तर याचं उत्तर म्हणजे लिव्ह इनमध्ये राहण्याचं कारण प्रेम तर असतं पण सर्वात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे ‘नाईलाज’. 

या जोडप्यांकडे लग्न करण्यासाठी मुबलक पैसा नसल्याने त्यांना ढुकूचा पर्याय निवडावा लागतो. कारण या विभागातील परंपरेनुसार लग्न करताना संपूर्ण गावाला जेवण द्यावं लागतं. यामध्ये जवळपास दीड लाखाचा खर्च येतो आणि रोज दोनशे ते अडीचशे रुपये कमावणाऱ्या व्यक्तींना हे शक्य होत नाही तेव्हा  या जोडप्यांना लिव्ह इनचा पर्याय निवडावा लागतो.

मात्र ढुकू होऊन राहणं इतकं सोपं नाहीये. ‘ढुकनी’ म्हणजे अशी महिला जी लग्न न करता कुणाच्यातरी घरात राहते आणि अशा जोडप्यांना ढुकू जोडपं म्हटलं जातं. मात्र यामध्ये खूप यातना त्या जोडप्याला आणि त्यातही ढुकू महिलांना सोसाव्या लागतात. समाजाने यांना सोबत राहण्याची मान्यता दिलेली असली तरी इतर सर्व अधिकार यांच्याकडून काढून घेतले जातात.

गावातील इतर लोक बोलणं बंद करतात. तसंच त्यांना सामाजिक कार्यातही घेतलं जात नाही. महिलांना समाजात ना इज्जत मिळते ना त्यांच्या मुलांना कायद्याचे अधिकार मिळतात. अशा महिलांना विवाहित स्त्रियांप्रमाणे सिंदूर लावण्याचा अधिकार असतो मात्र घरातील पूजेसाठीचा अधिकार नसतो. तेव्हा  समाजातील छठ पूजेच्या अधिकाराचा प्रश्नच येत नाही. त्यांना स्पर्श करणं पाप समजल्या जातं शिवाय कधी त्यांना प्रसादाचा हक्कही दिला जात नाही.

त्यातही ढुकू महिला शिक्षित असतील तर वेगळ्या समस्या उपस्थित होतात. त्यांच्याशी घरात देखील जास्त बोलल्या जात नाही शिवाय ढुकू असल्या कारणाने त्यांना किचनमध्ये सुद्धा प्रवेश नसतो. तर त्यांच्या हातून पाणी देखील कुणी पीत नाही. जेव्हा त्या लग्न करतात तेव्हाच त्यांना घरातील सर्व अधिकार प्राप्त होऊन त्या समाजातही कार्य करू शकतात.

ढुकू कपल्सच्या मुलांना देखील त्यांच्यामुळे बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो.

त्यांना समाजात आणि कायद्याने कागदावर हक्क मिळत नाही.अशा मुलांना त्यांच्या वडिलांचे नाव  लावता येत नाही ज्यामुळे पुढे शिक्षण घेताना त्यांना त्रास होतो. आधार कार्ड काढता येतं मात्र त्यावर वडिलांचं नाव नसतं. असंच रेशन कार्डमध्ये पण होतं. इतकंच नाही तर त्यांना वडिलांच्या संपत्तीत देखील अधिकार नसतो. आदिवासी समाजामध्ये नाक आणि कान टोचण्याला खूप महत्त्व आहे. मात्र ढुकू महिलांच्या मुलींना ना नाक टोचण्याचा अधिकार असतो ना लग्न करण्याचा अधिकार.

मुस्लिमांमध्ये तर अजून वेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. 

ढुकू बनायचा असो किंवा लग्न करायचं असो त्याआधी मुस्लिम महिलांना धर्मपरिवर्तन करावं लागतं. यासाठी विशेष पूजा केली जाते. तर ढुकनी बनल्यानंतरही समस्या असतातच. गावातल्या इतर महिला त्यांच्याशी बोलत नाही शिवाय पाणी भरण्यासाठी खूप कसरत करावी लागते. रांगेमध्ये सर्वात मागे उभं रहावं लागतं. जर कधी त्यांनी सर्वांच्या आधी पाणी भरलं तर त्या नळाला इतर महिला आधी शुद्ध करतात आणि मग पाणी भरतात. इतकी मोठी अस्पृश्यता पाळली जाते. त्यांना ‘लोखंडी कडे’ घालण्याची परवानगी नसते. तर त्यांच्या मुलांना पवित्र स्नानाचा हक्क देखील नसतो.

लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलांचा जन्म मृत्यू झाला तर त्यांना गावातल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचा अधिकार नसतो. काही गावांमध्ये तर लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पुरुषांसाठी देखील हाच नियम आहे.

अशा अनेक समस्यांना सामोरे जात लिव्ह इनमध्ये राहणारे कपल सध्या लग्न करून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण याने त्यांच्या अनेक समस्यांचं निराकरण होणार असतं. आयुष्याच्या कोणत्याही वर्षात लग्न करण्याची त्यांना परवानगी असते, मात्र ढुकू राहिल्यानंतर लग्न करताना त्यांना समाजातील नियम तोडल्यामुळे दंड भरावा लागतो आणि गाव जेवण द्यावं लागतं.  जेव्हा हे कपल्स आर्थिक सबळ होतात तेव्हा लग्न करून त्यांना मान्यता प्राप्त होते. 

समाजात लिव्ह इनला मान्यता असणे स्वतःतच खूप मोठं यश आहे मात्र अशाप्रकारच्या लिव्ह इनशी निगडित समस्या असतील तर यांकडे लक्ष देऊन निर्मूलन करण्याची गरज आहे, असं यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. प्रेमाला सर्वात पुढे ठेवून लिव्ह इनचा स्वीकार करत त्याच्याशी निगडित चुकीचे वैचारिक पाश तोडण्याचं ध्येय समोर ठेवून हे सामाजिक कार्यकर्ते काम करत असल्याचं सांगतात.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.