त्या दिवशी काकानं अडवाणींच राजकीय करियर संपवलं असतं…

ते साल होतं १९९१ चं. मंडल कमंडल ची जादू भारतावर प्रभाव पाडत होती. कॉम्प्युटरच युग देखील येणार होतं. पण याच दरम्यान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणण्यात आली होती. मे महिन्यात सुरू करण्यात आलेली पहिली फेरी हत्येमुळे पुढे ढकल्यात आली. जूनच्या मध्यावधीत संपुर्ण इलेक्शन पार पडले. निकाल लागला आणि चंद्रशेखर गेले नरसिंह राव भारताचे नवे पंतप्रधान झाले.

त्यापुर्वीचे दोन वर्ष राजकारणाच्या केंद्रबिंदूवर एक नाव जोरदार मुसंडी घेत होतं. अटलबिहारी वाजपेयी आपल्या शांत आणि संयमी भूमिकेत होते. संघाला आणि पर्यायाने उजव्या विचारसरणीला एका आक्रमक नेतृत्वाची गरज होती आणि तो शोध लालकृष्ण अडवाणी यांच्या स्वरुपात पुर्णत्वास आला होता. 

लालकृष्ण अडवाणी यांनी संपुर्ण भारतात रथयात्रा काढून एक लाट निर्माण केली होती. हिंदूत्वाची ती लाट आत्ता कॉंग्रेसला गाडू शकते हे पक्क होतं. भारतात लालकृष्ण अडवाणींचा करिष्मा सुरू झाला होता. पण अचानक अडवाणी यांची रथयात्रा बिहार मध्ये थांबवण्यात आली. अडवाणींना अटक करण्यात आलं.

त्यामुळे भाजपने सत्तेत असणाऱ्या पंतपधान व्हिपी सिंग यांचा पाठिंबा काढून घेतला. जनता दल तोडून चंद्रशेखर यांनी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार बनवले. सरकारची स्थापना झाली मात्र राजीव गांधी यांच्यावर पाळत ठेवल्याचा संशयावरुन पंतप्रधान चंद्रशेखर यांना राजीनामा द्यावा लागला आणि देशात मध्यावधी निवडणुका जाहिर करण्यात आल्या. 

त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी नुकतीच रथयात्रा केली होती. भाजपकडे एक आक्रमक नेतृत्व होतं. लालकृष्ण अडवाणी यांची जादू होती. लालकृष्ण अडवाणी गांधीनगर मधून उभा राहिले होते. मात्र संपुर्ण भारताचा विचार करता त्यांनी नवी दिल्लीतून देखील निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला. 

याच वेळी कॉंग्रेस लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार याच्या चर्चा झडू लागल्या. मोठमोठे कॉंग्रेसी नेते राजकारणात बळी होण्यास तयार होते कारण अडवाणी यांच्या विरोधात लढल्यानंतर पराभव झाला तरी पुर्नवसन होणार हे पक्क ठावूक होतं.

मात्र यावेळी अचानकपणे समोर आणण्यात आलं ते बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार “काका” ला. 

राजेश खन्ना उर्फ काका विरुद्ध एल.के. अडवाणी असा सामना नवी दिल्ली लोकसभा संघात घोषीत करण्यात आला. 

काका तेव्हा बॉलिवूडमधून देखील रिटायर झाला होता. राजेश खन्ना या नावाबद्गल लोकांकडे फक्त नॉस्टेल्जिया होता. बच्चन ने राजकारणाच्या मैदानात यापुर्वीच एन्ट्री मारून संन्यास देखील घेतला होता. बच्चनचा काळ चालू होता पण काकाचा काळ संपुन गेला होता. 

प्रसारमाध्यमांनी हा खेळ म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांच्या विजयाची फक्त अधिकृत घोषणाच आहे हे समजण्याचा मुर्खपणा केला. हा

च मुर्खपणा भाजप आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून देखील करण्यात आला. 

लालकृष्ण अडवाणी आपल्या रथयात्रेला आणि हिंदूत्वाचा झेंडा घेवून भारतभर दौरे आखू लागले. लालकृष्ण अडवाणी यांना संपुर्ण भारतातून पाठिंबा मिळू लागला होता पण इकडे राजेश खन्ना नवी दिल्लीच्या गल्यागल्यांमध्ये फिरू लागला. 

संपलेला काका आपल्यासमोर येतोय म्हणल्यानंतर लोक गोळा होवू लागले. काकाने जादूची कांडी फिरवली. इतकी की घरातले वाद विसरून डिंपल कपाडिया देखील आपल्या दोन पोरींना घेवून प्रचाराच्या मैदानात उतरली. काकाबरोबर दिल्लीच्या गल्यागल्या एक होवू लागल्या. 

मतदानाला फक्त पाच दिवस शिल्लक राहिले होते आता.

गृहित धरून पायाखालची वाळू सरकवण्याच काम काकाकडून करण्यात आलं होतं. दिल्लीचा अंदाज हाती आला तेव्हा सीट जाणार असल्याची माहिती कानावर आली होती. देशभरात नवीन नेतृत्व म्हणून अडवाणी समोर येत असताना काकाने फोडलेला हा घाम अडवाणी यांना पुन्हा दिल्लीत घेवून आला. 

शेवटचे पाच दिवस शिल्लक होते आणि काकाने संपुर्ण वातावरण आपल्या बाजूने वळवलं होतं. आत्ता निवडणुकीच्या राजकारणात मुरलेले अडवाणी विरुद्ध काका असा थेट सामना रंगणार होता. अचानक बातम्या पेरल्या गेल्या. अडवाणी यांचा पराभव झाला तर काका जायंट किलर ठरेल. त्यानंतर भल्या भल्या कॉंग्रेसी नेत्यांना बाजूला सारून काका कॉंग्रेसचा जेष्ठ नेता ठरू शकतो. काकांना आत्ताच बाजूला करायला हवं हा मॅसेज कॉंग्रेसच्याच नेत्यांमध्ये योग्य पद्धतीने डिलीव्हर झाला. 

अडवाणी यांचे अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी कॉंग्रेसच्याच नेत्यांनी डावपेच आखले. शेवटच्या पाच दिवसात वातावरण आपल्याबाजूने करण्याचा प्रयत्न झाला. आणि निवडणुका शांततेत पार पडल्या. 

मतदानाचा दिवस उगवला. तेव्हा EVM मशीन सारख्या भानगडी नव्हत्या. मतपत्रिका मोजण्यासाठी रात्र होत असे. पहिल्या फेरीपासून काका पुढे होता. पहिली, दूसरी, तीसरी फेरी आणि काका प्रत्येक फेरीत पुढे जात होता. अडवाणींचा पराभव अटळ होता. अखेरच्या क्षणी गुलाल उधळला जावू लागला. काका जिंकल्यात जमा होता पण लीड वाढू शकतं आपण पुन्हा मतमोजणी घेण्याची मागणी करावी अशी पुडी कोणत्यातरी कॉंग्रेस नेत्याकडूनच करण्यात आली.

नवख्या काकाने हे मान्य केलं आणि पुन्हा मतमोजणी सुरू झाली. 

शेवटचा निकाल आला तेव्हा काकाचा अवख्या १,५८९ मतांनी पराभव झाला होता. काका हरलेला आणि अडवाणी जिंकले होते. तेव्हा काकाचा विजय झाला असता तर एक जायंट किलर म्हणून काका कॉंग्रेसमध्ये पुढे आला असता. राष्ट्रीय नेता होवू पाहणाऱ्या अडवाणींचा पराभव झाला असता तर कदाचित तो त्यांच्या राजकारणाच्या करियरचा शेवट देखील ठरला असता. पिक्चर पाहताना बच्चन उगीच आला अस पण वाटतं. जर तर च्या गोष्टी खऱ्या आयुष्यात अशक्य असतात हे मात्र नक्की.  

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.