विमानात झोपलेला हमाल, डायरेक्ट अबुधाबी रिटर्न ठरलाय

आजही कट्ट्यावर किंवा चौकात बसल्यावर पोरा-पोरींना विचारा… विमानानं प्रवास करण्याचं लय लोकांचं स्वप्न अजून अपूर्ण आहे. खिडकीत निवांत बसायचं आणि बाहेरच्या दृश्याचे फोटो काढून इन्स्टाला टाकावेत, विमान हवेत उडाल्यावर खरंच पोटात गोळा येतो का ते पाहावं.. हा अनुभव घेणं अजून लय जणांच्या विशलिस्टमध्ये आहे.

एकतर प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात, त्या एकदम खतरनाक पद्धतीनं. म्हणजे ज्या पोरीवर आपण एकतर्फी प्रेम केलं, तिचंच आपल्याला स्थळ यावं असला भारी योगायोग काय सगळ्यांच्या आयुष्यात घडत नाही. तसंच चुकून विमान प्रवास घडलाय असं सांगणारंही कुणी आपल्याला भेटत नाही.

मात्र एक कार्यकर्ता असा आहे, जो तुम्हाला सांगू शकतोय. ‘भावा चुकून विमानात बसलो आणि डायरेक्ट अबुधाबीला जाऊन आलो.’ आम्ही ऐकलं तेव्हा आमच्याही फ्युजा उडाल्या होत्या, म्हणून म्हणलं जरा हा किस्सा तुम्हालाही सांगावा.

आता आपण विमानात बसायला जातो, तेव्हा आपल्याला दिसतं की इकडे पण हमाल असतात. फक्त जरा टापटिपमध्ये, युनिफॉर्म घातलेले आणि ज्यांच्याकडे बघून बार्गेनिंग करायची लाज वाटेल असे हमाल. प्रवाशांच्या सामानापेक्षा त्यांच्यावर विमानानं पाठवलं जाणारं व्यावसायिक सामान विमानात लोड करण्याची जबाबदारी अधिक असते. आपण दळणाच्या पिशव्या घेऊन जरा काही मजले चढलो, तर घामाघूम होत असतोय. हमाल रेल्वेतला असो किंवा विमानातला, तो माणूस आहे म्हणल्यावर दमणारच की आणि दमल्यावर झोपणारच की.

मुंबईवरुन अबुधाबीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये असाच काहीसा किस्सा झाला. त्याचं झालं असं, इंडिगो 6E-1835 हे विमान मुंबईवरुन टेकऑफ घेऊन अबुधाबीत लँड होणार होतं. विमानात प्रवाशांचं सामान भरताना एका लोडरला म्हणजेच हमालाला दम लागला. जराशी पाठ टेकावी म्हणून तो सामान कक्षात बसला. गडी इतका दमला होता, की बसल्या जागी त्याला झोप लागली.

विमानानं आकाशात झेप घेतली, की भल्याभल्यांची तंतरते. तिकडं या भावाची झोप कशी टिकणार? गाडी उठून जागा झाला पण तोवर वेळ निघून गेली होती. विमान पद्धतशीर हवेत उडत होतं. तीन-साडेतीन तासात विमानानं अबुधाबी गाठली. इतका वेळ सामान कक्षात बसलेला गडी बाहेर आला आणि अबुधाबी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

त्याची चौकशी आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अबुधाबी पोलीस जरा निवांत झाले. कारण भाऊ एकदम क्लिअर होता. त्यांनी लगेच भारतात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाशी संपर्क साधला. भारतानंही कार्यकर्ता चुकून तिकडं आल्याबद्दल सांगितलं. त्याची शारीरिक व मानसिक स्थितीही उत्तम होती, त्यामुळं त्याला पुन्हा मुंबईत येणाऱ्या फ्लाईटमध्ये पॅसेंजर म्हणून बसवण्यात आलं.

आणि यावेळी सीटवर बसून गडी आपल्या मायदेशी आला.

आता भारतात आल्यावर त्याची पुन्हा कोरोना तपासणी झाली असणार. त्यातच इंडिगोच्या अधिकाऱ्यांचीही चांगलीच खरडपट्टी निघाली असणार. पण ‘आपण चुकून विमानात झोपलो आणि अबुधाबी ट्रिप करुन आलो,’ हे आपल्या पोरांपासून नातवंडांपर्यंत सगळ्यांना सांगायला तो गडी मोकळा झालाय, हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.