लॉकडाऊनमधून घरी जाण्यासाठी या भिडूने लाखो रुपयांचे कांदे खरेदी केले आणि..

कोरोना काय संपेना आणि लॉकडाऊनची शेपूट वाढतच चालली आहे. कोरोनाच्या व्हायरसची साखळी तोडायची तर फिजिकल डिस्टंसिंग हा एकमेव उपाय सध्यातरी दिसतोय.

पण यामुळे झालंय काय की जे लोक आपल्या घरापासून दूर अडकले आहेत त्यांच्यात

जसे दिवस वाढतील तसे पॅनिकची स्थिती निर्माण होत आहे.

श्रीमंत लोक आपलं सरकार मधलं वजन वापरून नाही तर खोटी कागदपत्रे बनवून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सर्वात जास्त हाल दिल्ली मुंबई सारख्या मोठ्या शहरात अडकलेल्या कामगारांच सुरू आहे.

जेवणाखाण्याचे हाल सुरू आहेत पण गावाकडे असलेल्या कुटुंबाची आठवण त्यांना परत युपी बिहार कडे जाण्याची ओढ लावत आहेत पण परतीचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत.

एवढं असलं तरी गावी जाण्याची ओढ शांत बसू देत नाही.

याच ओढी मुळे अनेकजण वेडं धाडस करू पाहत आहेत. यातच आहेत प्रेममूर्ती पांडे.

हे पांडेजी मूळचे उत्तर प्रदेशचे. अलाहाबाद उर्फ ओरयाग राज जिल्ह्यातील एक खेडेगावात त्यांचे कुटुंबीय राहतात, तर पांडेजी मुंबईच्या एयरपोर्टवरील कामगार म्हणून काम करतात. त्यांनी आणि अंधेरी पूर्व च्या आझादनगर वस्ती मध्ये

सुरवातीला त्यांनी 21 दिवसाच्या लॉकडाऊन चे काटेकोरपणे पालन केलं पण जेव्हा हा कर्फ्यु आणखी वाढवण्यात आला तेव्हा पांडेजीनी ठरवलं काहीही झालं तरी गावी परत जायचं.

ते म्हणतात,

मी मुंबईत अंधेरी पूर्वच्या आझाद नगरमध्ये राहतो. इथे खूपच दाट वस्ती आहे आणि तेथे कोरोना पसरण्याचा धोकाही जास्त आहे.

आता दबंग सिनेमा प्रमाणे हे पांडेजी पण कमाल करणारे होते. एक बार कमिटमेंट करदी तो मै अपने आप की भी नहीं सूनता हे त्यांचं ब्रीद वाक्य होत.

मुंबईतून बाहेर पडण्यासाठी त्यांना एक आयडिया सुचली.

सर्वप्रथम त्यांनी एक मिनी ट्रक भाड्याने घेतला. १७ एप्रिलला आपण भाजी व्यापारी आहे असं भासवून मुंबईतून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे आले.

त्यांच्या प्लॅनचा पहिला टप्पा यशस्वी झाला होता.

पण हा मिनी ट्रक महाराष्ट्रातुन बाहेर नेणे खूप अवघड गोष्ट होती, त्याचा ड्रायव्हर त्यासाठी तयार नव्हता. आता त्याला मुंबईला परत पाठवणे गरजेचे होते.

पांडेजीनी पिंपळगाव मध्ये 10 हजार रुपयांचे कलिंगडे खरेदी केली. हा माल त्या मिनी ट्रक मध्ये भरला आणि त्या ड्रायव्हरला परत पाठवलं.

मुंबईहुन अलाहाबादला जाण्याच्या प्लॅनचा मुख्य भाग सुरू झाला.

पिंपळगावच्या मार्केटचा पांडेनी अभ्यास केला. तिथे त्यांना कांद्याची बेस्ट डील मिळाली. ९ रुपये १० पैसे दराने २५,५२० किलो कांदे खरेदी केले. त्यासाठी त्यांचे जवळपास अडीच लाख रुपये खर्च झाले.

त्यानंतर त्यांनी एक ट्रक भाड्याने घेतला, त्यासाठी ७७ हजार ५०० रुपये मोजले.

२० एप्रिल ला त्यांची गाडी लॉकडाऊनमधल्या १२०० किलोमीटरच्या प्रवासाला निघाली.

वेगवेगळी गावे, राज्ये मागे टाकून तीन दिवसांनी त्यांची गाडी अलाहाबादला पोहचली. अत्यावश्यक सेवांची गाडी असल्यामुळे कोणी त्यांना अडवलं नाही. तिथुन तडक ते शहराबाहेरच्या व्होलसेल मार्केटमध्ये कांद्याचा ट्रक घेऊन गेले.

पण दुर्दैवाने मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातून आलेल्या कांद्याचा स्टॉकमुळे हे पांडेंजीचे कांदे कोणी विकत घेतले नाहीत.

प्रेममूर्ती पांडेंनी तो ट्रक आपल्या गावी नेला. फक्त आपल्या गावी जाण्यासाठी त्यांचे तीन चार लाख रुपये खर्च झाले. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे ते सुखरुप पणे आपल्या घरच्यांपर्यंत पोहचले.

पण यासाठी त्यांनी अनेक नियम मोडले, स्वतःसह अनेकांचा जीव धोक्यात घातलाय.

युपी पोलिसांनी प्रेममूर्ती पांडे यांची कोरोना चाचणी केली व त्यांना होम क्वारंटाइन केले आहे. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय

पण घरी येण्यासाठी केलेले लाखो रुपये अंगावरच पडले आहेत.

पण अजूनही पांडेंजीना आशावाद आहे की कधी ना कधी अलाहाबादमधल्या बाजारातले कांदे संपतील आणि हे पिंपळगावचे कांदे तिथे विकून आपला खर्च भरून काढता येईल.

बघू काय होतंय ते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.