कधी नव्हे ते काँग्रेसवाल्याना स्माईल करायला लावणारा रिझल्ट आलाय.

आज काँग्रेसवाले म्हणत असणार,

आजि सोनियाचा दिनु…वर्षे अमृताचा घनु…वर्षे अमृताचा घनु…

आता असं का ? तर अहो पोटनिवडणुकांचे निकाल आलेत. यात महत्वाच्या राज्यात काँग्रेसने भाजपचा सुपडासाफ केलाय. २०१४ नंतर काँग्रेससाठी असा दिवस उजाडला नसेल. कारण काँग्रेस धुंवाधारपणे सलग सपाटुनच मार खात आलं होतं. आणि आता कधी नव्हे ते या निकालाने काँग्रेसवाल्यांना स्माईल करायला मिळालंय.  

मग आता कोणत्या कोणत्या राज्यात काय काय दिवे लागलेत बघायला नको का ? चला बघूया..

मंगळवारी १३ राज्यांच्या विधानसभेच्या २९ जागांसाठी आणि लोकसभेच्या तीन जागांसाठी निवडणूका झाल्या. यात लोकसभेसाठी दादरा नगर हवेली, हिमाचल प्रदेशच्या मंडी, मध्य प्रदेशच्या खंडवा या जागांचा समावेश होता.

हिमाचल प्रदेश 

आता हिमाचल प्रदेश मध्ये विधानसभेच्या तीन आणि लोकसभेच्या एका जागेसाठी निवडणूक झाली. हिमाचल प्रदेशच्या या पोटनिवडणूकीकडे पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ही पाहिलं जातंय. या पोटनिवडणुकीत भाजपला ४४० वोल्टचा करंट बसलाय. चारीच्या चारी जागांवर काँग्रेसने बाजी  मारली आहे. यात मंडी लोकसभा अर्की, फतेहपुर आणि जुब्बल-कोटखाई विधानसभा यांचा समावेश आहे. 

राजस्थान 

आता जेव्हा मुद्दा राजस्थानचा येतो तेव्हा राजस्थान आणि भाजप हे समीकरण सगळ्यांनाच माहित आहे. पण इथं ही भाजप भुईसपाट झालंय. राजस्थानच्या वल्लभनगर आणि धरियावद या विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. धरियावद जागेसाठी काँग्रेसचे उमेदवार नागराज मीणा यांनी तर वल्लभनगर मधून उभे राहिलेल्या प्रीति शक्तावत यांनी भाजपच्या उमेदवारांना धोबीपछाड दिलाय. धरियावद हाभाजपचा गड होता. आता इथं काँग्रेसची जादू चालली म्हणजे, नवं काही समीकरण उदयाला येतंय का अशा शक्यता वर्तवल्या जातायत. 

महाराष्ट्र 

आता विषय जेव्हा महाराष्ट्राचा येतो तेव्हा तो लय डीप असतो. राज्यात झालेल्या आणि आगामी काळात होणाऱ्या सर्व पोटनिवडणुकिंमध्ये सर्वात गाजलेली निवडणूक म्हणजे नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुक होय. ज्यामध्ये काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी बाजी मारली आहे. जितेश अंतापूरकर यांनी भाजपच्या सुभाष साबणेंचा पराभव करत त्यांनी ४१ हजार ९३३ मतांनी विजय मिळवला आहे.

ही निवडणूक चांगलीच चर्चेत होती कारण, महाविकास आघाडी आल्यामुळे लोकांचा कल महाविकास आघाडीकडे आहे की भाजपकडे आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार होतं. त्यामुळे हि निवडणूक महत्त्वाची होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या सर्वात  या मतदारसंघात पूर्वीपासूनच अंतापूरकर आणि साबणे हे दोनच नेते एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. या दोन घराण्यांनी हि कायमच निवडणूक गाजवली होती.

कर्नाटक 

कर्नाटक पोटनिवडणूक मुख्यमंत्री बसवराज यांच्यासाठी लिटमस टेस्ट होती. कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. सिंदगी मतदारसंघात भाजपने ३११८५ मतांनी विजय मिळवला, तर काँग्रेसने ७३७३ मतांनी हनगल मतदारसंघ जिंकला. सिंदगीमध्ये भाजपचे भुसनूर रमेश बाळाप्पा यांनी ९३३८० मते मिळाली तर काँग्रेसचे अशोक मल्लाप्पा मनागुली यांना ६२२९२ मते मिळाली. हंगलमध्ये काँग्रेसचे माने श्रीनिवास ८७३०० मतांनी विजयी झाले असून भाजपच्या शिवराज शरणप्पा सज्जनार यांना ७९८७४ मते मिळाली आहेत.

मध्यप्रदेश, आसाम आणि तेलंगणा या तीन राज्यांत भाजपला थोडासा दिलासा मिळाला आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीच्या तीन जागांसाठी 

मध्यप्रदेशातील खंडवा येथील मध्यप्रदेशातील खंडवा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ज्ञानेश्वर पाटील यांनी विजय मिळविला. तर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा सिंग यांनी भाजपला धूळ चारली. बहुचर्चित आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरलेली दादरा आणि नगर हवेली मतदारसंघात शिवसेनेच्या कमलाबेन डेलकर यांनी ५१ हजार मतांनी विजय मिळविला आहे.

अशा प्रकारे काँग्रेसमध्ये सध्या जल्लोष सुरु असणार आहे. आणि भाजप स्वतःच मूल्यमापन करणार आहे. अशा चर्चा आहेत. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.