या दोन अग्रलेखामुळे लो.टिळक भारतातले पहिले राजद्रोही ठरले होते.

साल १८९७ चं त्याकाळी भारतात प्लेग या रोगाची साथ आली होती. मुंबई पाठोपाठ या साथीनं पुण्यात थैमान घातलं. पुण्यातील पेठात ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली. ही प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी मुंबईच्या गव्हर्नरने डब्ल्यू. सी रँडची नेमणूक केली.

प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी रॅडनं लष्कराच्या मदतीनं प्रयत्न सुरू केले तरीही साथ आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे भारतमंत्री लाँर्ड हॅमिल्टननं आदेश काढला.

“ साध्या उपायांनी जनता ऐकत नसेल आणि सरकारी उपाययोजनांना दाद देत नसेल तर आता जबरदस्ती करा, पण रोग आटोक्यात आणा”

या आदेशाचं पालन करण्यासाठी रॅडनं जबरदस्ती केली. लोकांच्या भावना लक्षात न घेता त्यांच्या अत्याचार जुलुम केले. अनेकांना मारहाण केली. कित्येक महिलांशी गैरवर्तन केलं. त्यामुळे अनेकांचा रँडवर रोष तयार झाला.

भारतामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थीती होती. पुणे, मुंबई प्लेगचा साथीनं त्रस्त झाले होते. अशातच इंग्लडच्या राणीचा हिरक महोत्सव साजरा करून इंग्रजानं हजारो रूपयांची उधळपट्टी केली. त्य़ामुळे इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवावा असं पुण्यातील काही तरूणांना वाटत होतं.

आणि रँडची हत्या करण्यात आली…..

रँडवरील रोष वाढत होता. याचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधूनी २२ जून १८९७ रोजी रॅडला गणेशखिंडीत अडवून गोळ्या झाडल्या. त्यामुळे ब्रिटीश सरकार हदरून गेलं. पुण्यात ठिकठिकाणी नाकेबंदी केली गेली. गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यास २० हजारांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं. अनेकांना अटक करून दम भरला गेला. जाब विचारण्यात आला. यावर लोकमान्य टिळकांनी आपल्या वर्तमानपत्रातून ते प्रसिद्ध उद्गार काढले,

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’

त्यांनी केसरीमध्ये जळजळीत लेख लिहिला. या लेखात रँडच्या हत्येनंतर पुण्यात जास्त पोलिस नेमण्याबद्दलचा जाब विचारण्यात आला. एखादा मोठा हत्ती पिसाळलेला असतो. तो वाटेल तशी धुळधाण करत सुटतो, त्याप्रमाणे आमच्या सरकारची स्थिती झाली आहे, असं टिळकांनी अग्रलेखात लिहिलं होतं.

त्यानंतर लगेच १३ जुलैला राज्य करणे म्हणजे सुड घेणे नव्हे असा अग्रलेख पुन्हा केसरीमध्ये लिहिला.

त्य़ामुळे इंग्रज खवळले. रॅडच्या हत्येशी टिळकांचाच संबंध असाला असं इंग्रजांना वाटू लागलं. सरकारनं कसून चौकशी केली मात्र या हत्येशी टिळकांचा संबंध असल्याचा एकही पुरावा इंग्रजांच्या हाती लागला नाही. मात्र रँडला मारण्यासाठी टिळकांचे लेखच जबाबदार आहेत असा ठपका इंग्रजांनी ठेवला.

शेवटी केसरीमधील सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? आणि राज्य करणे म्हणजे सुड घेणे नव्हे या अग्रलेखातील लेखनावर राजद्रोहाचा आरोप ठेवून इंडियन पिनल कोड १२४ अ कलमातंर्गत लोकमान्य टिळक आणि हरि नारायण आपटे यांच्यावर खटला भरला गेला.

१४ संप्टेबर १८९७ ला मुंबई उच्च न्यायालयानं लोकमान्य टिळकांना दीड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा दिली.

मात्र यानंतरही टिळकांचं लेखन सुरूच होतं. सरकारवर ताशेरे ओढले जात होते. त्यानंतर १९०६ साली पुन्हा एकदा टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. यावेळी मात्र टिळकांना सहा वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा झाली. लोकमान्य टिळकांवर तीन वेळेस राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राजद्रोहाचा खटला हा लोकमान्य टिळकांवर भरला गेला होता. यांची इतिहासात नोंद आहे.

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.