लोकमान्यांच्या पेहरावात असताना सुबोध सेटवरील लोकांच्या मस्करीमध्ये सहभाग घ्यायचा नाही

बायोपिकचा बादशहा म्हणजे सुबोध भावे. फार कमी जणांना ठाऊक असेल की, सुबोध भावेने १९९० साली आलेल्या ‘महात्मा बसवेश्वर’ या मराठी सिनेमात बसवेश्वरांची भुमिका केली. हा सुबोधचा पहिला बायोपीक.

यानंतर २०११ सालच्या ‘बालगंधर्व’ सिनेमात स्वतःच्या अभिनयाने सुबोधने भारतीय रंगभुमीवरील नटश्रेष्ठ असे बालगंधर्व साकारले. बालगंधर्वांनंतर सुबोध भावे लोकमान्य टिळकांची भुमिका साकारेन, याचा विचार त्यानेही केला नव्हता.

आज लोकमान्य टिळकांच्या स्मृतीदिनाला १०० वर्ष पूर्ण आहेत. यानिमित्ताने ओम राऊत दिग्दर्शित ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ सिनेमासाठी सुबोधने कशापद्धतीने मेहनत घेतली होती, हे जाणुन घेऊया…

सुबोधच्या वाट्याला जे बायोपीक आले त्यामागे छोटासा योगायोग म्हणता येईल. एका शुटींगदरम्यान फावल्या वेळात काहीतरी वाचता यावं म्हणुन सहकलाकार मृणाल देशपांडेने सुबोधला ‘गंधर्वगाथा’ हे पुस्तक दिलं. भा. द. खेर लिखित हे पुस्तक वाचुन बालगंधर्वांचा नट आणि माणुस म्हणुन झालेला खडतर प्रवास सुबोधने वाचला. यावर काहीतरी करावं हा उद्देश सुबोधच्या मनात निर्माण झाला.

आणि मग पुढे रवी जाधव दिग्दर्शित ‘बालगंधर्व’ या सुंदर सिनेमाची निर्मिती झाली.

‘बालगंधर्व’ पाहिल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षेंनी सुबोधला एक पुस्तक भेट म्हणुन दिलं. हे पुस्तक होतं गंगाधर गाडगीळांचं ‘दुर्दम्य’. या पुस्तकातील लोकमान्य टिळकांचं झंझावाती आयुष्य वाचुन सुबोध भारावुन गेला.

ज्या पुण्यात आपण जन्मलो, केसरीवाड्याच्या इथे आपण खुपवेळा जातो, परंतु आपल्याला टिळकांबद्दल काहीच माहित नाही,

अशी भावना सुबोधच्या मनात आली. लोकमान्य टिळकांवर सिनेमा करण्याचं त्याने ठरवलं. परंतु या सिनेमात अभिनय न करता सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय त्याने घेतला.

याचदरम्यान अमेरिकेतुन ओम राऊत हा तरुण महाराष्ट्रात आला होता.

ओम सुद्धा टिळकांवर सिनेमा करण्याच्या ध्यासाने झपाटलेला व्यक्ती. ओम आणि सुबोधची ओळख होती. ओमने सुबोधला फोन केला.

‘मी लोकमान्यांवर सिनेमा करतोय, या सिनेमात टिळकांची भुमिका तु करावीस अशी इच्छा आहे.’

ओमच्या या बोलण्याने सुबोध आश्चर्यचकीत झाला. थोड्याच दिवसांमध्ये ओम आणि सुबोधची भेट झाली. लोकमान्य टिळकांना लोकांसमोर आणण्याचा दोघांचाही विचार होता. एक अभिनेता म्हणुन ओमच्या सिनेमात काम करण्यास सुबोध उत्सुक होता,

परंतु ‘मी टिळकांसारखा दिसेन का ?’ हा प्रश्न त्याच्या मनात वारंवार डोकावत होता.

सुबोधच्या मनाला छळणा-या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी ओमने सुप्रसिद्ध रंगभुषाकार विक्रम गायकवाड यांना बोलावलं. ‘बालगंधर्व’ सिनेमासाठी विक्रम गायकवाड यांनी सुबोधला मेकअप केल्याने दोघांचाही चांगला परिचय होता.

विक्रम गायकवाडांना सुबोध ‘जादुगार’ म्हणतो. या जादुगाराने सुबोधच्या चेह-यावर स्वतः मेकअप केला. जेव्हा सुबोध पहिल्यांदा लुक टेस्ट साठी टिळकांच्या रुपात ओमसमोर आला तेव्हा ओमच्या डोळ्यात पाणी आलं.

विक्रम गायकवाड यांनी बालगंधर्वांनंतर लोकमान्यांसाठी पुन्हा त्यांच्या हाताने जादु केली.

ओमची बोलकी प्रतिक्रिया सुबोधला समाधान देऊन गेली.

आता लोकमान्य साकारण्यासाठी सुबोध तयार झाला.

हळूहळू या सिनेमाची सर्वत्र चर्चा झाली. लोकमान्यांची भुमिका सुबोध भावे करतोय, हे प्रसिद्ध झालं. लोकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. यातली एक प्रतिक्रिया अशी होती की,

लोकमान्यांसाठी सुबोधची निवड चुकीची आहे. सुबोधचे डोळे कोमल, मृदु आहेत. तर लोकमान्यांचे डोळे कणखर, खंबीर असे. त्यामुळे सुबोध लोकमान्यांच्या भुमिकेत शोभणार नाही.’

एक अभिनेता म्हणुन हि प्रतिक्रिया सुबोधच्या नट म्हणुन अस्वस्थ करुन गेली. यानंतर टिळकांचे डोळे जाणुन घ्यायचा सुबोधचा प्रवास सुरु झाला.

सुबोध जिथे जाईल तिथे त्याला लोकमान्यांचा फोटो, पुतळा, पोस्टर दिसलं की तो तासन् तास लोकमान्यांचे डोळे वाचायचा प्रयत्न करायचा.

शुटींग सुरु व्हायला काहीच दिवस बाकी असताना सुबोधला टिळकांच्या डोळ्यांमागचं रहस्य उमगलं.

सुबोधच्या मते, ‘टिळकांचे डोळे एका रोमँटिक माणसाचे मला वाटले. पण हा रोमँटिकपणा देशप्रेमाचा आहे. देशातल्या लोकांनी सुखी व्हावं, त्यांचं किमान जगणं सुसह्य व्हावं हि भावना या डोळ्यांमध्ये आहे. असा एक आगळा रोमँटिसीजम खुप कमी जणांमध्ये पाहायला मिळतो. मला टिळकांमध्ये तो जाणवला.’ अशाप्रकारे टिळकांच्या डोळ्यांमागची भावना सुबोधने जाणुन घ्यायचा प्रयत्न केला.

लोकमान्य टिळक रंगवताना सुबोधला शारीरीक रित्या सुदृढ दिसायचं होतं. यावेळी शैलेश परुळेकर मास्तरांनी सुबोधला मदत केली. ‘बालगंधर्व’ सिनेमासाठी वजन कमी करायला सुबोधला परुळेकर मास्तरांचं मार्गदर्शन झालं होतं. याहीवेळेस सुबोधला मास्तरांनी शारीरीक आणि मानसिक रित्या तंदुरुस्त होण्यास मदत केली.

ओमचा लोकमान्यांवरचा अभ्यास पक्का असल्यामुळे इतर काहीही न वाचता, ओम लोकमान्यांविषयी जे सांगेल ते सुबोध आत्मसात करत होता.

कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी जुनं पुणे, त्यावेळची मंडई, बाजार अशा गोष्टी तंतोतंत निर्माण केल्या.

शुटींगचा पहिला दिवस. सीन असा की, टिळक केसरीवाड्यातुन बाहेर पडतात आणि एक खबरी त्यांना मुंबईला जाऊ नका असं म्हणतो. यावर टिळकांचं वाक्य असं,

संपुर्ण देश बंदिवासात आहे, त्यामुळे मी आत राहिलो काय, अन् बाहेर राहिलो काय. सारखंच’.

टेक ओके झाला. कॅमेरामागुनच ओमने मान डोलावुन पसंती दिली. इतक्या दिवसांची मेहनत फळाला आली.

या शाॅटनंतर सुबोधच्याही डोळ्यांतुन पाणी आलं.

लोकमान्यांच्या पेहरावात असताना भुमिकेचा आदर राखण्यासाठी सुबोध सेटवरील लोकांच्या मस्करीमध्ये वगैरे अजिबात सहभाग घ्यायचा नाही. शुटींग झाल्यावर जेव्हा तो वेशभुषा उतरवायचा त्यानंतर मात्र तो सगळ्या टीमसोबत मिसळायचा.

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सुबोधने साकारलेले लोकमान्य टिळक सुद्धा प्रेक्षकांना तितकेच भावले. सध्याच्या काळातही टिळकांचे विचार किती गरजेचे आहेत, हे या सिनेमाने सर्वांना दाखवले.

बालगंधर्वांनंतर सुबोधने लोकमान्य टिळकांची भुमिका साकारुन स्वतःमधल्या समर्थ अभिनेत्याचा पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रत्यय करुन दिला.

सुबोधच्या मेहनतीला दाद देऊ तितकी कमीच ! लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी दिनानिमित्त लोकमान्यांना विनम्र अभिवादन.

  • भिडू देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.