लोकमान्य टिळकांनी पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणले होते?

तर गोष्ट आहे १९०७ सालची. वंग भंग चळवळीपासून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले होते. या दोन्ही गटांच नेतृत्व पुण्यात चालायचं. कॉंग्रेसच्या मवाळ गटाचे नेते होते गोपाळ कृष्ण गोखले तर जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. सुरत अधिवेशनापासून तर ही फुट वाढतचं गेली होती.

अर्जविनंत्या करून स्वराज्य मिळणार नाही तर इंग्रजी सत्तेला चांगला धडा शिकवला पाहिजे या विचारांचे लोण तरुणांच्यात वेगाने पसरत चालल होत आणि यामागे लोकमान्य टिळक आहेत हे सगळ्यांना ठाऊक होतं.

तर याच काळात लंडन मध्ये इंडिया हाउसमधून सावरकरांनी पांडुरंग विष्णू बापट उर्फ सेनापती बापट यांना बॉम्ब कसं बनवायचं हे शिकण्यासाठी पॅरीसला पाठवलं होतं. तिथे निकोलस सॅन्फ्रान्स्की या रशियन क्रांतिकारकाने ही कला त्यांना शिकवली. तिथून सेनापती बापट भारतात आले. त्यांनी रशियन भाषेतील बॉम्बनिर्मितीवरील पुस्तकाच अ‍ॅना क्लॉक्स नावाच्या तरुणीकडून इंग्रजी भाषांतरही करुन घेतल होत.

मथुरेचा होतीलाल वर्मा नावाचा एक तरुण काही तरी कामानिमित्त पुण्यात आला होता. त्याची राहण्याची व्यवस्था टिळकांच्याकडेचं करण्यात आली होती. खरं तर तो आला होता लोकमान्यांना भारतभर चालू असणाऱ्या क्रांतीकार्याची माहिती देण्यासाठी. बापटांनी त्याच्याकरवी बॉम्ब कसा बनवायचा या पुस्तकाची प्रत देखील पाठवून दिली होती. 

हे पुस्तक टिळकांनी आपल्या शिष्यांना म्हणजेच गोविंद बापट आणि दामू जोशी यांच्याकडे दिला. या दोघांनी वर्माच्या मार्गदर्शनाखाली सल्फ्युरिक अॅसिड, कापूस,पोटॅश क्लोराईड यांचे मिश्रण तयार करून बॉम्ब बनवला.  गोविंद बापट , व त्याच्या कडून बनलेला बॉम्ब गोविंदरावांनी वर्मांकडे सुपुर्द केला पुढे तो बॉम्ब कोल्हापूरपर्यंत पोहोचला. तो ८ दिवस टिळक वाड्यात राहिला. टिळकांनी त्याला पैशांची देखील मदत केली.

एक मोठा कट शिजत होता. सावरकर आणि त्यांचे इंडिया हाउसचे साथीदार संपूर्ण भारतभर साखळीबॉम्बस्फोट करणार होते. सेनापती बापटांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बॉम्बविद्या शिकवण्याचा धडाका लावला होता. बंगालमध्ये कलकत्त्यात अनुशिलन समितीच्या सदस्यांना त्यांनी हे प्रशिक्षण दिल होता.

असं म्हणतात की टिळकांचा याला आशीर्वाद होता.

सगळं ठरल्याप्रमाणे चालू होतं पण खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांना तेवढा वेळ धीर धरवला नाही. त्यांनी ३० एप्रिल १९०८ रोजीच मुझफ्फरचा मजीस्ट्रेट किंग्जफोर्डच्या गाडीवर बॉम्ब फेकला. यात ते वाचले. प्रफुल्ल चाकीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली तर खुदिराम बोसला अटक व पुढे फाशीची शिक्षा झाली.

या बॉम्बहल्ल्यमुळे मात्र ब्रिटीश सरकार सावध झाले. बिथरलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी अनेकांची धरपकड सुरु केली. त्यांचा रोख टिळक व त्यांचे जहाल विचारांचे समर्थक यावर होता. ही घटना घडली तेव्हा टिळक धुळ्यामध्ये सभा घेत होते. सेनापती बापटसुद्धा कलकत्यावरून निघून टिळकांना भेटायला धुळ्यातच आले होते. टिळकांना मुझ्झफरपूर बॉम्ब प्रकरणात अडकविता येणे शक्यच नव्हते.

पुण्यात काळ आणि केसरी या दोन वृत्तपत्रांमधून इंग्रज सरकार मुझफ्फर बॉम्ब खटल्याच्या निमित्ताने जी दडपशाही करत होते याविरुद्ध आवाज उठवला गेला. त्यांचे जळजळीत अग्रलेख बॉम्बस्फोटांचे अप्रत्यक्ष समर्थन करत होते. केसरी मध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे अग्रलेख लिहित होते पण टिळकांच्या संमतीशिवाय हे लिखाण होणे शक्य नव्हतं. खुद्द टिळकांनी देखील देशाचं दुर्दैव हा अग्रलेख लिहून सरकारवर घणाघाती टीका केली. पुण्यात खुदिराम बोस यांचे जागोजागी पोस्टर लावण्यात आले होते. पुण्यातल वातावरण स्फोटक बनलं होतं.

२ जून १९०८. पुणे शहर तीन बॉम्बस्फोटांनी हादरले.बुधवार चौकातल्या वंदे मातरम या वृत्तपत्राच्या कार्यालयाखाली, शनिवार पेठेत दारू गुत्त्याजवळ आणि दारूवाला पुलाजवळ हे बॉम्ब फुटले होते. या घटनेमागे गोविंदराव बापट होते. त्यांना आपल्या बॉम्बच्या ताकदीची व त्याच्या परिणामाची चाचणी  करायची होती.

या बॉम्बस्फोटांनी पुण्यातही चौकशीसत्र सुरु झाले. जागोजागी गुप्त पोलीस फिरत होते. त्यांचा मुख्य उद्देश होता टिळकांचा यातील सहभाग शोधून सिद्ध करायचा. पण काही केल्या पुरावे मिळत नव्हते. पुण्यात सुरु असलेल्या पोलिसांच्या जुलुमाविरुद्ध केसरीमध्ये एक अग्रलेख छापून आला,

“हे उपाय टिकाऊ नाहीत.”

अखेर त्यांच्यावर अटक वॉरंट सुटले. बापूसाहेब गांधी नावाच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बातमी मुंबईला निघालेल्या लोकमान्यांना सांगितली. स्टेशनवरून परत फिरण्यास टिळकांनी नकार दिला,

“घरी जाऊन काय फौजफाटा तयार करावयाचा आहे? का सैन्य जमवायचे आहे? का हत्ती-घोडे श्रृंगारवायचे आहेत? की किल्ल्यावर शत्रूचा हल्ला होणार म्हणून चर खणावयाचे आहेत? सरकारने हा सर्व देशच एक तुरुंग बनविल्याने आपण सर्व आधीच एक तुरुंगात आहोत. त्यातून प्रत्यक्ष तुरुंगात जाणे म्हणजे एका मोठ्या दालनातून एका लहान दालनात ते मला कोंबणार एवढेच की नाही? यात तयारी ती काय करावयाची?”

२४ जूनला त्यांना अटक झाली. २९ तारखेला मुंबईत त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला उभा राहिला. त्यांच्यावर इंडियन पिनल कोड  १२४ अ,१५३ अ या कलमाखाली आरोप ठेवण्यात आले. टिळकांना जामीन नाकारण्यात आला.

बॅरिस्टर जीना जे पुढे जाऊन पाकिस्तानचे निर्माते झाले त्यांनी व बॅरिस्टर दावर यांनी टिळकांची बाजू मांडली. योगायोगाने दावर यांचे पिता दिनशा दावर हे या खटल्याचे न्यायाधीश होते. याच दिनशा दावर यांनी दहा वर्षापूर्वी टिळकांची राजद्रोहाची केस लढली होती.

मोहम्मद अली जीना यांचा युक्तीवाद तोकडा पडला. २२ जुलै १९०८ रोजी पाच विरुद्ध दोन अशा ज्युरींच्या बहुमताच्या सल्ल्यानुसार दावर यांनी टिळकांना दोषी पकडले. ६ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा दिली आणि मंडालेच्या तुरुंगात पाठवले. पुढे जाऊन तिथेच त्यांनी गीतारहस्य हा सुप्रसिध्द ग्रंथ लिहिला.

संदर्भ- न.चि.केळकर लिखित लोकमान्य टिळक यांचे चरित्र खंड २.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.