सोलापूरच्या स्वातंत्र्यसैनिकासाठी इंग्लंडचा खासदार तिथल्या संसदेत गांधी टोपी घालून उतरला..

स्वातंत्र्यलढ्यामधला सविनय कायदेभंगाचा काळ. महाराष्ट्रामध्ये सोलापूर हे या आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनलं होतं. इथल्या गिरणीत काम करणारे कामगार, शेतकरी, अबालवृद्ध महिला या आंदोलनात उतरल्या होत्या. देशभक्तीच्या वातावरणाने सोलापूर भारावून गेला होता.

याच वातावरणात तेव्हाचे सोलापूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रा. ब. डॉ. मुळे यांनी नगरपालिकेवर तिरंगा लावण्याचा ठराव संमत करून घेतला. ६ एप्रिल १९३० रोजी ठरावाप्रमाणे नगरपालिकेवर राष्ट्रीय निशाण फडकवण्यात देखील आले.

संपूर्ण भारतात भारताचा तिरंगा फडकवण्याचा मान मिळवणारी सोलापूर ही पहिली नगरपालिका ठरली.

१९३० साली महात्मा गांधींनी आंदोलन तीव्र केले. त्यांना मिठाचा कायदा भंग केल्यावर जेव्हा अटक झाली तेव्हा लोक रस्त्यावर उतरले. गिरणीकामगारांनी सोलापूरात हरताळ पाळण्यात आला. राष्ट्रध्वज हातात घेवून मिरवणूका काढण्यात आल्या. कायदेभंग करण्यासाठी सभा घेण्यात आली.

टिळक चौकात रामकृष्ण जाजू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या सभेत कुर्बान हुसेन यांच्यासह डॉ.कृ.भि.अंत्रोळीकर, रामभाऊ राजवाडे, तुळशीदास जाधव, शेठ गुलाबचंद, महाजन वकील, नागप्पा अब्दुलपूरकर, कवी कुंजविहारी, सिद्रामप्पा ब्रिटीश सत्तेवर टिकास्त्र डागले.

अशातच मिरवणुकीत घोषणा देणाऱ्यावर पोलिसांनी गोळीबार केला व त्यात  शंकर शिवदारे नावाच्या तरुणाचा त्यात मृत्यू झाला. हाच सोलापूरचा पहिला हुतात्मा ठरला.

वातावरण स्फोटक बनले. लक्ष्मी विष्णू मिलच्या परिसरात जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांवर तुफान दगडफेक करून त्यांना पिटाळून लावण्यात आले. आंदोलनाचा भडका वाढत गेला. जमावाने मंगळवार पोलीस चौकीवर हल्ला केला. पुढे हा जमाव कोर्टात गेला. संपूर्ण कोर्ट आगीच्या हवाली करण्यात आले.

यामुळे घाबरलेल्या कलेक्टरने  सोलापूरात मार्शल लॉ लागू केला. हा ब्रिटिश सत्तेच्या काळात पेशावर नंतर लागू केलेला पहिला मार्शल लॉ होता.

गोरे अधिकारी व गोर्‍या सैनिकांचेच लष्कर १२ मे  १९३०च्या रात्री सोलापूरात पोहोचले आणि मग मात्र शहरात मार्शल लॉं लागू करण्यात आला, संपूर्ण शहर लष्कराने ताब्यात घेतले आणि सगळीकडे ब्रिटिश सानिकांचा नंगा नाच सुरू झाला. घराबाहेर कुणी दिसला की गोळीबार करून त्याला मारले जात होते, अशी अनेक निरपराध माणसे मारली गेली.

नगरपालिकेवरील तिरंगा झेंडा काढण्याचा हुकूम लष्कराने दिला, तेव्हाचे नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी त्यास नकार दिला, तेव्हा लष्करी न्यायालयाने त्यांना ६ महीने सक्तमजुरी व १०००० रु. दंड अशी शिक्षा दिली.

अशातच काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तुळशीदास जाधव त्या वेळी मेकॅनिकी चौकातून सायकलवरून चालले होते. जाधव यांच्या डोक्यावर गांधी टोपी होती. मार्शल लॉच्या काळात सरकारने डोक्यावर गांधी टोपी घालण्यासही बंदी घातली होती.

तुळशीदास जाधवांना एका सोल्जरने टोपी काढ नाही तर गोळी घालीन असे म्हणून डोक्याला पिस्तूल लावले. पण तुळशीदास जाधव यांनी निर्भयपणे त्याच्या डोळ्यात डोळे घालून टोपी काढण्यास नकार दिला. त्यांचा तो आवेश बघून पोलीस थोडेफार वरमले, मात्र जाधवांच्या डोक्यावरची ती गांधी टोपी त्यांनी जबरदस्तीने काढून फेकून दिली व त्यांच्यावर खटला दाखल केला. 

तुळशीदास जाधव यांना ५ वर्षे सक्तमजुरी व ३००० रु. दंड, ५ वर्षे सक्तमजुरी व २००० रु. दंड ठोठावण्यात आला.

मंगळवार पेठ पोलिस चौकी जळीत प्रकरणी मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे व पत्रकार असलेले अवघ्या २२ वर्षांचे  कुर्बान हुसेन यांच्यावर राजद्रोहाचा खटला  लष्करी कोर्टात दाखल करण्यात आला. त्या घटनेशी कोणताही संबन्ध नसणाऱ्या  या चार जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

येरवडा तुरुंगात १२जानेवारी १९३१ रोजी या चार हुतात्म्यांना फासावर लटकाविण्यात आले.संपूर्ण देश या अन्यायी घटनेच्या निषेधार्थ पेटून उठला. त्यांच्या हौतात्म्यामुळे कित्येकांना स्वातंत्र्यलढ्यात उतरण्याची प्रेरणा मिळाली.

solapur hutatma scaled

सोलापूरच्या घटनेचे पडसाद दूर इंग्लंडमध्ये देखील उमटले. तिथल्या मजूर पक्षाचे खासदार फेनर ब्रोकवे यांनी हा विषय लंडनच्या पार्लमेंट मध्ये उपस्थित केला. विशेषतः तुलसीदास जाधव यांना फक्त गांधी टोपी घातल्या बद्दल सक्त मजुरीची शिक्षा झाली याचा निषेध करण्यासाठी ते स्वतः गांधी टोपी घालून संसदेत आले होते. आपले पूर्ण भाषण त्यांनी गांधी टोपी घालून दिले व आपल्या साम्राज्यवादी सरकारचा पोलीस प्रशासनाचा निषेध केला.

लॉर्ड फेनर ब्रोकवे हे जरी इंग्रज खासदार असले तरी त्यांचा जन्म भारतातच झाला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल त्यांना सहानुभूती होती. इंडियन लीगचे ते सदस्य होते. त्यांनी कित्येक क्रांतीकारकांना गुप्तपणे मदत देखील केली होती पण सोलापूरच्या या वाघासाठी ते स्वतः खुलेआम गांधी टोपी घालून संसदेत आले आणि त्यांनी तुळशीदास जाधव यांची बाजू मांडली.

गांधी टोपी हे एकतेचे प्रतीक, स्वातंत्र्याचे प्रतीक आणि स्वदेशीचे प्रतीक मानले गेले.

फक्त भारतीय स्वातंत्र्यलढाच नाही तर जगात सुरु असणारे युद्ध, हिटलरचा वंशवाद याविरुद्ध देखील त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. असं म्हणतात की हिटलरच्या कुख्यात ब्लॅक बुक मध्ये त्यांचं नाव देखील लिहिलेलं होतं. पण ब्रोकवे यांनी कितीही वरचढ ताकद असो माघार घेतली नाही, त्यांच्यावर खुलेआम देशद्रोहाचे आरोप झाले पण आपला मानवतावादी विचारांचा लढा चालूच ठेवला.

त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून काँग्रेसच्या शंभराव्या अधिवेशनात १९८५ साली मुंबई येथे लॉर्ड फेनर ब्रोकवे यांना खास निमंत्रण देण्यात आले. लॉर्ड फेनर ब्रोकवे या कार्यक्रमातही आपली खास गांधी टोपी घालून आले होते.

वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांचे निधन झालं. तत्कालीन भारत सरकारने १९८९ सालचा पदमभूषण पुरस्कार त्यांना मरणोत्तर जाहीर केला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.