एका रात्रीत स्टार होऊन गायब झालेल्या हिरोला शोधण्यासाठी इंटरनेटवर शोधमोहीम राबवली होती

मृगजळ सर्वांना ठाऊक असेल..!

पाण्याचा भास निर्माण करणारी एक रखरखीत जमीन. बॉलिवुड सुद्धा एका मृगजळा सारखं आहे. वरवर ही इंडस्ट्री कितीही आकर्षक वाटत असली, तरी आतून किती पोकळ आहे हे अनेकदा ठाऊक नसतं. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामुळे बॉलिवुड आतून किती पोखरलेलं आहे, याची थोडीशी का होईना सर्वसामान्य माणसांना जाणीव झाली. याच बॉलिवुडमध्ये रातोरात लोकप्रियता मिळवणारे अनेक कलाकार काळाच्या ओघात नकळत हरवून जातात.

ही कहाणी अशाच एका कलाकाराची.

त्याचं नाव नकुल कपूर.

एक वेळ अशी आली होती, की नकुल कपूर अचानक गायब झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी इंटरनेट वर जवळजवळ एक शोधमोहीम केली होती.

भिडुंनो..

असं फार क्वचित होतं की एखाद्या कलाकाराची माहिती विकिपीडिया वर आढळत नाही. नकुल कपूर अशा क्वचित कलाकरांपैकी एक.

एका रात्रीत स्टार झालेल्या नकुल कपूरची विस्तृत माहिती आज कुठेच उपलब्ध नाही. असं का झालं? ज्या बॉलिवुडमुळे फार कमी वेळात इतकी अमाप लोकप्रियता मिळाली ती झुगारून हा अभिनेता अचानक गायब कुठे झाला?

२००२ साली दीपक आनंद यांचा ‘तुमसे अच्छा कौन है’ हा सिनेमा आला होता. रमेश तौराणी यांनी सिनेमाची निर्मिती होती.

आरती छाब्रिया, किम शर्मा, रघुवीर यादव आणि नकुल शर्मा अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती. सोनू निगम, अलका याग्निक , कुमार सानू यांनी गायलेली गाणी प्रेक्षकांना पसंत पडली. या एका सिनेमामुळे नकुल कपूरला काही तासांत तुफान प्रसिद्धी मिळाली.

अमाप प्रसिद्धीमुळे नकुल कपूर स्टारपदावर जाऊन पोहोचला. बॉलिवुडचा चॉकलेट हिरो म्हणून नकुलला ओळख मिळाली.

लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन म्हणून नकुलकडे पाहिले जाऊ लागले. तो मोबाईलचा जमाना नसून, पत्रांचा काळ होता. देशभरातून नकुलला फॅन्सची असंख्य पत्र आली.

या सिनेमाच्या ४ वर्ष आधी, म्हणजेच १९९८ साली ‘हो गई मोहब्बत तुमसे’ या म्युझिक अल्बम मुळे नकुल चर्चेत आला होता. याच अल्बममुळे नकुकला पहिला हिंदी सिनेमा मिळाला. या सिनेमाचं नाव ‘आजा मेरे यार’. २००१ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा कधी आला, कधी गेला हेच लोकांना कळालं नाही. पण लगेच वर्षभरात २००२ साली ‘तुमसे अच्छा कौन है’ हा सिनेमा आला.

या सिनेमामुळे आधीच्या अपयशाचं सावट दूर झालं.

हा सिनेमा सुपरहिट झालाच शिवाय नकुलच्या अभिनयाचं सुद्धा कौतुक झालं.

सिनेमा कितीही सुपरहिट असला तरीही एकदा तो थेटरमधून खाली उतरला की त्याची चर्चा हळूहळू बंद होते. सिनेमातले कलाकार अन्य कोणत्या सिनेमातून भेटीला आले नाहीत, तर त्यांच्याविषयीच्या बातम्या सुद्धा थांबतात. नकुल कपूरच्या बाबतीत असंच झालं. इतक्या कमी वेळात मिळालेलं स्टारडम नकुलला टिकवता आला नाही.

सुपरहिट सिनेमात प्रमुख भूमिका करूनसुद्धा नकुलला दुसऱ्या कोणत्या सिनेमाच्या ऑफर्स आल्या नाहीत. २००५ साली हॉलीवूडच्या ‘टर्मिनल सिटी’ मालिकेत त्याने काम केले. असं असलं तरी बॉलिवुड कडून सिनेमांच्या ऑफर्स येत नव्हत्या.

पैसे कमावण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं, त्यामुळे बॉलिवूडवर अवलंबून न राहता नकुल कपूरने बॉलिवुडचा आणि भारताचा निरोप घेतला.

खूप वर्ष नकुल एका अज्ञातवासात असल्यासारखा वावरत होता. तो कुठे गेलाय? काय करतोय? याची कोणालाच काही खबर नव्हती. नकुलचे बॉलिवुडमध्ये कोणी मित्र नव्हते, त्यामुळे त्याच्याविषयी कोणाला काही माहीत नव्हतं. त्याच्या चाहत्यांनी इंटरनेट वर दिवस – रात्र नकुलचा काही ठावठिकाणा सापडतोय का? याविषयी शोधमोहीम हाती घेतली.

खूप जणांनी, असंही अनुमान लावलं की, नकुल कपूर या जगात नाही.

सर्वांपासून अलिप्त झालेल्या नकुलच्या कानावर त्याच्या मृत्यूची बातमी आली. हे कळाल्यावर अधिक वेळ न दवडता नकुलने स्वतः मीडिया समोर येऊन तो उत्तम असल्याचं सर्वांना सांगितलं. नकुल कॅनडा येथील नॉर्थ वैंकूवर भागात स्वतःचं ‘डीवाईन लाईट’ हे योगा सेंटर चालवत आहे. येथे तो परदेशी नागरिकांना योगासन करण्याचं महत्त्व आणि योगा शिकवण्याचं काम करतो. नकुलची दाढी आणि केस वाढले आहेत.

नकुलचं सध्याचं रूप पाहून कोणाला विश्वास बसणार नाही की, हा एके काळचा मोठा नट होता.

नकुल कपूरचं आयुष्य जाणून घेतल्यानंतर एवढंच वाटलं की.. कलाकाराभोवती असणारं वलय, प्रसिद्धी ही तात्पुरती असते. तुम्ही अभिनेता म्हणून टिकू शकला नाहीत, तर लोकं तुम्हाला पटकन विसरतात. आणखी एक महत्वाची गोष्ट.. प्रचंड मेहनत जरी केली तरी समोरून अभिनय करण्याची संधी मिळत नसेल, तर कलाक्षेत्रावर अधिक विसंबून न राहता स्वतःची गुजराण करण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा. जसं नकुल कपूरने केलं. आज नकुल जरी प्रकाशझोतात नसला तरी जे काम करतोय त्यात तो समाधानी आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.