अंधेरा हटेगा और पासपोर्ट पर ‘कमल’ खिलेगा !!

परवाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या विनीत अग्रवाल नामक कार्यकर्त्याचा सभेत जीव तोडून भाषण करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ते बिचार ओरडत होतं

“कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल”

आता गड्यान किती वेळा कमल उच्चारलाय हे कोणाला पण कळाल नाही. पण त्याला म्हणायचं काये ते सगळ्यांना कळाल. फक्त त्यालाच नाही भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हेच म्हणायचं होतं की अख्ख्या देशात आता फक्त आणि फक्त भाजपचीच सत्ता येणार आहे.

मोदीजीनी पंतप्रधान होऊन हे दाखवून ही दिल. कॉंग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी पराभूत झाले, कॉंग्रेसमुक्त भारतच मोदींच स्वप्न अमित शहाजी पूर्ण करतात की काय असच वाटू लागलं होतं. पण मध्यंतरी काही राज्यातल्या निवडणुकामुळे ते स्वप्न थोड लांबलं.

असो विषय लांबतोय. थेट मुद्द्यावर येऊन सांगतो. प्रत्येक राज्यात नसेल पण आपल्या देशाच्या पासपोर्टवर कमळ उगवणार आहे.

झालं अस की केरळमधले कॉंग्रेस खासदार राघवन यांच्या मतदारसंघात कोझईकोडेमध्ये नवीन पासपोर्टवाटप सुरु होते. त्यावेळी तिथल्या नागरिकांच्या लक्षात आले की या पासपोर्टवर कमळाचा वॉटरमार्क आहे. या आधी तसं काही नव्हत. आता केरळ म्हणजे भाजपविरोधकांची खाण.

त्यांनी दंगा सुरु केला की भाजपवाले आता पासपोर्टचा सुद्धा वापर प्रचारासाठी करत आहेत.

खासदारांनी मुद्दा संसदेत उठवला. राष्ट्रीय पातळीवर पासपोर्टवरच कमळ गाजू लागल. पासपोर्टचं सुद्धा भगवेकरण होत आहे असा आरोप विरोधकांनी केला. तेव्हा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.(हे रविशकुमार वेगळे)

रविशकुमार हे सुद्धा म्हणाले की भारताचे राष्ट्रीय चिन्ह कमळ असल्यामुळे ते पासपोर्टवर वापरले. हे सध्या टेम्पररी आहे, पुढच्या महिन्यात राष्ट्रीय चिन्हापैकी राष्ट्रीय प्राणी किंवा राष्ट्रीय झाड हे वापरण्यात येईल आणि दर महिन्याला ते रोटेट केले जाईल.

भारताचे राजचिन्ह म्हणजे अशोक स्तंभावरचे चार सिंह हेच भारताच्या पासपोर्टवर असेल आणि आतील पानात इतर राष्ट्रीय चिन्हे वॉटरमार्क म्हणून वापरली जातील

आता मुद्दा इथे संपायला हवा होता. पण अजून मुद्दा उपस्थित होतो की खरंच कमळ हे राष्ट्रीय चिन्ह आहे का?

कारण सरकारतर्फे याबद्दल बरच कन्फ्युजन आहे. मध्यंतरी ओरिसाचे खासदार प्रसन्न आचार्य यांनी राज्यसभेमध्ये भारताचा राष्ट्रीय पशु, पक्षी आणि फुल कोणते हा प्रश्न विचारला तर त्याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री किरण रीजुजू यांनी सांगितलं की ,

भारतीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय पशु वाघ आणि राष्ट्रीय पक्षी मोर हे  जाहीर केले आहे पण राष्ट्रीय फुलाबद्दलचे नोटिफिकेशन मंत्रालयाने कधी काढले नाही. 

याचाच अर्थ भारताचा राष्ट्रीय फुल हा प्रकारच अस्तित्वात नाही. काही वर्षापूर्वी ऐश्वर्या पराशर या मुलीने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नात सुद्धा सरकारकडून तिला हेच उत्तर मिळाले. मग अस असेल तर आपल्याला शाळा कॉलेजमधून गेल्या अनेक वर्षांपासून हे का शिकवले जाते, अजूनही सरकारी वेबसाईटवर हीच माहिती दिसते. मग खरं काय मानायचं?

असो. तर बाकी काही का असेना चाळीस वर्षापूर्वी अटलजीनी एक भाषण केलं होतं त्यात ते म्हणाले होते, अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा. हे राजकीयदृष्ट्या खरं ठरलंच पण शिवाय पासपोर्टच्या वॉटरमार्कमूळ ते कमळ उन्हात चमकणार आहे आणि अटलजींचे शब्द खरे होणार आहेत.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.