तिच्या रोजा पिक्चरमधला मी “अरविंद स्वामी” झालो अन् आमचं जमलं.
डॅशिंग रावडी लूक असणारे शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचं लग्न कस झालं? त्यांची स्टोरी काय आहे? हे जाणून घ्यायला बोलभिडू कार्यकर्त्यांनी त्यांना फोन लावला. खासदार साहेबांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली पण सोबत मॅडमना फोन लावण्याची विनंती केली. त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनाही आम्ही फोन लावला.
दोघांसोबत बोलल्यानंतर आम्हाला अस्सल आणि दमदार लव्ह स्टोरी मिळाली. त्यांची लव्ह-स्टोरी त्यांच्याच भाषेत.
आमची स्टोरी सुरु होते १९९६ पासून. मराठा सेवा संघाच्या एका कार्यक्रमात मी राजश्रीला पहिल्यांदा बघितलं. ती सूत्रसंचालन करत होती. पण झालं असं कि माझ्या एका मित्राला ती आवडली. आमच्याजवळ असलेल्या कोडॅकच्या कॅमेऱ्यात आम्ही तिचे हळूच फोटो काढले. बहुतेक फोटो काढल्याचं तिच्या लक्षात आलं असावं. ती आमच्याकडं रागानं बघत होती.
पुढचे २ दिवस ती मला गाठण्याचा प्रयत्न करत होती, पण मी निसटण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर मी सापडलोच. आजूबाजूला मोठी नेते मंडळी होती त्यामुळे ती माझ्यावर राग काढू शकली नाही पण चांगली गोष्ट अशी झाली की ओळख झाली. मी तिला याबद्दल एकदा नंतर विचारलं तर ती म्हणाली,
“तेव्हा मी तुझा कॅमेरा फोडायलाच आले होते पण तूला पाहिलं आणि रोजा सिनेमातला अरविंद स्वामी आठवला. तेव्हाचं ठरवलं लग्न करायचं तर तूझ्यासाठी. चोरून फोटो काढण्याच्या या प्रकरणात आमची ओळख झाली.”
राजश्रीसोबत काही दिवसांनी ओळख वाटली, भेटीगाठी वाढल्या. पण मी रावडी, गावगुंड, अंगावर पोलीस केसेस, मध्यमवर्गीय आणि कट्टर शिवसैनिक. तर ती जमीनदार बाबासाहेब महल्ले या जमीनदारांची मुलगी. तीही एकुलती एक. कुठेच मेळ बसत न्हवता. आमच्या भेटी आणि टेलिफोनवरच बोलणं वाढत होत आणि टेलिफोनचं बिलसुद्धा.
एकीकडे आमचं जुळत होतं आणि दूसरीकडे राजश्रीला IAS मुलाचं स्थळ आलं. आता आमचं पुढे काही होईल असं मला अजिबात वाटत न्हवत. मी सुद्धा १९९१ ला PSI ची परिक्षा पास झालो होतो. पण राजकारणाची आवडीमुळे मी राजकारणाकडे ओढला गेलो. राजश्री मोठ्या घराण्यातली होती. १०० एकर शेती, घरच सगळं उत्तम त्यामुळे मी तिला सांगून टाकलं आपण लग्न नको करायला. कारण तिला हवं ते सुखाचं आयुष्यम मी देऊ शकणार नाही याची कल्पना मला आलेली.
तेव्हा तिने मला एकच प्रश्न विचारला,
‘तू मला २ वेळच खायला देऊ शकतोस का?
माझं उत्तर हो होतं. ती म्हणाली, “बास मगं चलं लग्न करू ….”
लग्न करणं एवढं सोप्प न्हवत, नातेवाईकांचा खूप विरोध होता. घरी सांगितल्यावर तिच्या घरच्यांनी नांदेडला चौकशी केली तेव्हा माझ्याविषयी चांगलं बोलणार कोणी नव्हतच. सगळ्यांनी सल्ला दिला या गावगुंडांच्या नादाला नका लागू, मुलीचं आयुष्य बरबाद होईल. पण राजश्री आणि मी लग्नाचा निर्णय पक्का केलेला, तिच्या आई वडिलांनी खूप समजुतीने घेतलं. त्यांच्या मुलीला सुखात ठेवण्याच्या अटीवर ते लग्नाला तयार झाले.
७ फेब्रुवारी १९९९ ला अगदी साधेपणाने आणि रजिस्टर पध्दतीने आम्ही लग्न केलं..
आलिशान घराण्यातली राजश्री ३ रूमच्या छोट्या माझ्या घरात राहायला येणार होती. तिच्यासाठी स्पेशल काहीतरी करायचं म्हणून मी अजून एक बेडरूम बांधली आणि त्याच्या टाईल्स व्याजावर पैसे घेऊन हैद्राबादवरुन आणल्या. शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला.
तिला मी आज विचारतो तू नक्की काय पाहून इतक्या मोठ्या घरातून तीन खोल्यांच्या माझ्या घरात येण्याचा निर्णय घेतलास तेव्हा ती म्हणते, “तूझ्या विचारांच्या”.
मी माझ्या भाषणातून अनेकदा सांगायचो की, पुरूष महिलांना घरातून बाहेर पडून देत नाहीत. त्यांना अस वाटतं की आपण ज्या नजरेतून इतर महिलांकडे पाहतो तसेच आपल्या बायकोकडे लोक पाहतील. पण त्यांनी आपली नजर सुधारण्याची गरज आहे. हे पहिला बदलायला हवं. ती मी केलेली भाषणे, बोललेली वाक्य आजही सांगते.
आमच्या दोघांच्या आवडीनिवडी जवळजवळ सारख्याच. दोघांनाही वाचनाची, गाण्याची आणि साहित्याची आवड. आम्ही एकमेकांशी पुस्तकांबद्दल बोलतो, नवनवीन माणसांना भेटतो. आमचा मुलगा रुद्र म्हणजे आमच्या सहजीवनाचा एक अविभाज्य हिस्सा. त्याच्या येण्यानंतर आमचं आयुष्य अगदी पूर्णत्वाला गेलं. राजश्री म्हणजे माझ्या घरची खरी लक्ष्मी आहे. तिच्या येण्याने घराची परिस्थिती पालटली. तिने मला साथ दिली मी काम करत राहिलो.
२००२ साली शिवसेनेचा नगरसेवक झालो. २००५ साली जिल्हाप्रमुख, २०१४ ला आमदार आणि आता २०१९ ला खासदार झालोय, ती सोबत होती म्हणून हे शक्य झालं. ती आहे म्हणून माझं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर आहे.
आजकाल कामाच्या व्यापामुळे आमचं बोलणं होत नाही, १५ दिवस भेटही होत नाही पण कुठे काही छान वाटलं तर मी तिला हमखास व्हिडीओ कॉल करतो. तिच्याकडे असलेल्या साड्यांपैकी बऱ्याच साड्या मीचं तिला दिलेल्या आहेत. कुठेही गेलो तर तिकडून काय आणू असा प्रश्न मी तिला विचारला की तीचं उत्तर असत,
काही नको, तुम्ही या फक्त…
हेमंत पाटलांनी त्यांची संपुर्ण स्टोरी सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना फोन लावला. तेव्हा त्या म्हणाल्या,
तो खासदार असल्यानं त्याला आता कमी वेळ असतो, आता ७ फेब्रुवारी ला आमचा लग्नाचा वाढदिवस झाला २१ वा. कोणीतरी मला विचारलं लग्नाला किती वर्ष झाली, मी म्हटलं १ च वर्ष झालं. कारण अजूनही मला तेच प्रेम हेमंतच्या डोळ्यात दिसत. यावेळी वाढदिवस एकत्र साजरा करता येण शक्य नव्हतं. लोकसभेचे अधिवेशन असल्यानं तो दिल्लीला होता. मग काय मी पोहोचले दिल्लीत. त्याच्यासोबत थोडा वेळ घालवायला मिळणं हाच माझा सगळ्यात मोठा आनंद आहे.
प्रेम व्यक्त करायला आम्हांला कुठला दिवस लागतं नाही, लग्नाच्या २१ वर्षांनंतरही आम्ही एकमेकांचे खुप चांगले मित्र आहोत आणि ही मैत्री आमच्या प्रेमाचा खरा आधार आहे..
शब्दांकन : आरती मोरे-पाटील
हे ही वाच भिडू.
- रविश कुमारने पण UPSC केली होती, तो सुद्धा प्रेमात पडला होता.
- ४० वर्षीय मोहम्मद अली जीनांच्या १६ वर्षीय रूटी बरोबरच्या खळबळजनक प्रेम विवाहाची गोष्ट !
- रविद्रनाथ टागोरांच पहिलं प्रेम असणारी ती मराठी मुलगी.