४० वर्षीय मोहम्मद अली जीनांच्या १६ वर्षीय रूटी बरोबरच्या खळबळजनक प्रेम विवाहाची गोष्ट !

मोहोम्मद अली जिना.

पाकिस्तानचे संस्थापक. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडून वेगळ्या पाकिस्तानची निर्मिती करणारा माणूस.

१९१८ साली याच मोहोम्मद अली जिना यांच्या प्रेम विवाहाने मात्र मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. या लग्नाने खळबळ माजण्याची  २ प्रमुख कारणं  होती. एक म्हणजे हे लग्न आंतरधर्मीय होतं आणि दुसरं म्हणजे त्या दोघांच्या वयांमधील दुपटीपेक्षा अधिक असणारी तफावत.

जीनांचं वय त्यावेळी होतं ४० वर्षे आणि त्यांनी  ज्या रूटी पेटीट नावाच्या एका गर्भश्रीमंत पारशी मुलीशी लग्न केलं होतं, तिचं वय होतं अवघं १६ वर्षे.

ज्येष्ठ पत्रकार शीला रेड्डी यांनी आपल्या ‘मिस्टर एंड मिसेज जिन्ना: द मैरिज दैट शुक इंडिया’ या पुस्तकात जिना यांच्या या बहुचर्चित लग्नाविषयी आणि जिना तसेच रूटी पेटीट यांच्याविषयीच्या अनेक किस्स्यांवर प्रकाश टाकलाय.

शीला रेड्डी यांच्या पुस्तकानुसार ज्यावेळी हे लग्न ठरलं होतं त्यावेळी रूटी पेटीट यांनी जिना यांच्यासमोर आपल्या मिशा काढण्याची अट ठेवली होती. जीनांनी फक्त रूटीची अटच मान्य केली नाही, तर तिला इम्प्रेस करण्यासाठी जीनांनी आपली हेअरस्टाईल देखील बदलली होती.

१९१६ साली सुरु झालेल्या या रूटी-जिना यांच्या प्रेम प्रकरणाला लग्नाचं रूप धारण करायला जवळपास २ वर्षांचा कालावधी गेला. मोहोम्मद अली जिना ज्यावेळी मुलीचा हात मागण्यासाठी रूटीच्या घरी गेले त्यावेळी आधी त्यांनी रूटीच्या वडिलांना आंतरधर्मीय लग्नासंदर्भात काय वाटतं याची विचारणा केली.

“आंतरधर्मीय लग्न व्हायला हवीत, कारण देशाच्या एकतेच्या दृष्टीने ती खूप चांगली गोष्ट आहे” असं पॉलिटीकली करेक्ट उत्तर दिनशा मानेकजींनी म्हणजेच रूटीच्या वडिलांनी दिलं होतं.

त्यानंतर जीनांनी मानेकजी यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण हे ऐकून चिडलेल्या मानेकजींनी जिना यांना धक्के देऊन घराच्या बाहेर काढलं होतं. त्यानंतर मात्र त्यांची कधीच भेट झाली नाही. रूटी मात्र आपल्या लग्नाच्या निर्णयावर कायम होती. शेवटी हे लग्न पार पाडला परंतु लग्न सोहळ्याला रूटीच्या घरातून कुणीच उपस्थित नव्हतं.

मुंबईच्या जिना हाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नासाठी रूटी यांनी इस्लाम कबूल केला होता आणि लग्नानंतर ‘मरीअम’ नाव धारण केलं होतं. या लग्नातून पुढे त्यांना दिना नावाची मुलगी देखील झाली.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.