मी पॉलिटिक्समध्ये आहे आणि तिचं पॉलिटिकल सायन्स झालय, अशी आहे आमची केमिस्ट्री.

माझी सासरवाडी जयपूरची. जयपूरला आजपर्यन्त मी तीन वेळा गेलोय. पहिल्यांदा लग्न ठरवण्यासाठी. दूसऱ्यांदा लग्न झाल्यानंतर आणि तिसऱ्यांदा मला महाविकास आघाडीमुळे जयपूरला जाण्याचा योग आला. चार दिवसांपुर्वीच माझ्या लग्नाला एक वर्ष पुर्ण झालं.

व्हॅलेंन्टाईन डे च्या निमित्ताने तुमची लव्ह स्टोरी सांगता का? अस मला बोलभिडूतून विचारण्यात आलं आणि मी माझी ही लव्ह स्टोरी लिहायला घेतली.

आम्ही भेटलो तेव्हा ऑगस्ट महिना सुरू होता. नक्की तारिख आठवणार नाही कारण मुलांना सहसा तारखा आठवत नाहीत. आमचं अरेंज मॅरेंज असल्याने दोन्हीकडचे कुटूंब पुण्यात एकत्र भेटतील अस ठरवण्यात आलं होतं. ते मराठीच कुटूंब. मात्र राजस्थानला स्थायिक झालेलं. तिचं माहेरच आडनाव मोरे आणि नाव पूजा. तिच्यासाठी हे माझं पहिलच स्थळ होतं. पुण्यात ठरलेल्या ठिकाणी आम्ही कुटूंबीय भेटलो. ओळख झाली. गप्पागोष्टी झाल्यानंतर तिच्या वडिलांनी आम्हाला आत्ता तुम्ही दोघे बोलून घ्या म्हणून सांगितलं. माझ्यापुढे पहिला प्रश्न होता तो म्हणजे काय विचारायचं. आपण कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी भिती नावाची गोष्ट लपून रहात नाही. ती माझ्या समोर बसली.

काही क्षण शांततेत गेले आणि तिने पहिला प्रश्न केला?

तूम्ही काय करता..?

तिला माझ्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मुली प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची चौकशी करतात, तिला मात्र माझ्याबद्दल बेसिक देखील माहिती नसल्याचं मला “भारी” वाटलं. कुटूंबासंबधीत सर्व गोष्टी तिला माहिती होत्या मात्र माझ्याबाबतीत तिला कमीच माहिती होती. मी DY पाटील ग्रुपशी संबधित आहे. कोल्हापूरच्या कॉलेजच्या संदर्भातून काम पहातो. तिथे ट्रस्टी आहे या सर्व गोष्टी मी तिला सांगितल्या. मलाही तिच्याबद्दल अधिक माहिती नव्हती. तिने सांगितलं की तिचं पोलिटिकल सायन्समधून शिक्षण झालं आहे. तिने दोन वेळा UPSC चे अटेम्प्ट दिले. त्यानंतर फॅशन डिझायनिंग संबधित कोर्स केला.

मी माझ्या बायकोत आई पहात होतो. मला वाटतं कुठलाही मुलगा आपल्या होणाऱ्या पत्नीमध्ये आईलाच पाहतो. बंटी काकांच्या लग्नानंतर घरातले हे पहिले लग्न होते. घरी माझी बहिण, लहान भाऊ, आई-वडिल, काका त्यांचे कुटूंब असे खूप मोठ्ठे कुटूंब. या सर्व कुटूंबाला बांधून ठेवणारी व्यक्ती मला पत्नी म्हणून हवी होती. जेव्हा तिने मला तूम्ही काय करता? असा प्रश्न केला तेव्हा मला तो इनोसंटपणा खूप आवडला. निस्वार्थीपणे पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारी आईसारखी व्यक्ती आपण पहात असतो. मला तिथेच तिचे अस्तित्व क्लिक झाले.

त्यानंतर आम्ही कुटूंबिय जयपूरला भेटलो. लग्न ठरलं. पण माझ्यासाठी सर्वात धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे  एन्गेजमेंटचा मुहूर्त दहा दिवसांनी काढण्यात आला होता. पुढच्या महिन्यानंतर मुहूर्तच नसल्यानं दहा दिवसात एन्गजमेंट करणं भाग होतं. एन्गजमेंटची तारिख ठरवून मी पुण्याला आलो. मनापासून सांगतो आजवर कॉलेजच्या कार्यक्रमापासून अनेक कार्यक्रमांच नियोजन मी पुढाकार घेवून केलं. घरात एखादा कार्यक्रम असला तर काय तयारी करायला लागते याची चांगलीच माहिती मला होती. एकाही व्यक्तीचं निमंत्रण चुकता कामा नये इथपासून ते स्वत:साठी खरेदी करण्यापर्यन्तची तयारी मला करायची होती आणि यात तिच्याशी बोलायचं देखील होतं.

खरं सांगू का लग्न ठरवून आल्यानंतरही तिचा नंबर माझ्याकडे सेव्ह नव्हता.

दूसऱ्या दिवशी तिच्याच नंबरवरून मला मॅसेज आला. आपण बोलू शकतो का? तेव्हा नेमका मी कामात होतो. मी तीला नंतर फोन करतो असा मॅसेज केला. तिथून पुढचे पाच दिवस मी फक्त तिला मॅसेजच करत होतो. खरेदी आणि इन्गेजमेंटच्या तयारीतच दिवस चालले होते. त्यानंतर मी कोल्हापूरला आलो आणि तिला फोन केला. तो पहिल्यांदा फोन केल्यानंतरचा आवाज आजही मला आठवतोय. फोनवर आम्ही पहिल्यांदा बोललो. त्यानंतर थेट इन्गजमेंटमध्येच. सप्टेंबरमध्ये इन्गजमेंट झाली.

आत्ता फोनवर बोलणं हे कायमचं होतं. इथे एक गमंत अशी होती की तिच्या भावाला आणि तिला दोघांनाही घरातून एक नियम होता. तो म्हणजे रात्रीचे दहा वाजले की फोन आपल्या वडिलांच्या जवळ ठेवून देणं. रात्री दहानंतर फोन वापरण्यावर त्यांच्या घरात बंदीच होती. बरं आमचं लग्न ठरलं तरी या नियमात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. दहा वाजता फोन वडिलांकडे जमा होत असे.

याच दरम्यान “राजकारण” सुरू होतं. लोकसभेच्या इलेक्शन येणार होत्या. बंटी काकांसोबत मी देखील सक्रियपणे बैठकांमध्ये भाग घेतला होता. निवडणूका दोन तीन महिन्यांवरच होत्या आणि इकडे माझ्यासाठी रात्री दहाची डेडलाईन ठरलेली होती. बऱ्याचदा तिचा मॅसेज यायचा. दहा वाजत आले आहेत फोन करणार आहात का? तेव्हा आज करू शकणार नाही म्हणून मी सांगायचो आणि थेट दूसऱ्या दिवसाची वाट पहायची वेळ यायची. यातून मार्ग काढण्यासाठी मीच वडिलांना रिक्वेस्ट करायला लावली व रात्री दहाचा नियमांमध्ये थोडीशी शिथिलता आली.

लग्नाची तारिख ठरलेली फेब्रुवारीमध्ये.

रिसेप्शनमध्ये एकूण लाखभर लोक आले होते. हे तिच्यासाठी नवीन होतं. मला आठवतय आम्ही संध्याकाळी पाच सहा वाजता उभे राहिलो होतो ते रात्री दोन वाजता काही वेळ बसलो होतो. इथं मला तिचं कौतुक वाटतं कारण या जपलेल्या माणसांना तिने देखील विनातक्रार रिस्पेक्ट दिला. तिचेही पाय दुखत होते पण एक शब्दाने न बोलता ती माझ्यासोबत उभी होती.

फेब्रुवारी महिन्यात लग्न झालं. संसार, बायको, नवीन नाती समजून घेण्याची वेळ होती. अशा काळात लोकसभेच्या इलेक्शन आल्या.

दिवसभर मिटींग चालू झाल्या. रात्रीचे एक दोन वाजू लागले. नवीन लग्न झालेली ती, पण “आमचं ठरलय” असल्याने आम्ही आमच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा राज्यातला पहिला प्रयोग राबवत होतो. सभा चालू असायच्या. कधी कधी राज्याबद्दल मत मांडताना पण तिला फोन लावू वाटायचा. पण इथे वेळ नव्हता. अगदी एका घरात रहात असून आमचं दोन तीन दिवस बोलणं देखील होत नव्हतं.

लोकसभेचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संसार सुरू करण्यासाठी थोडा वेळ मिळाला. पण येणाऱ्या विधानसभेसाठी कोल्हापूर दक्षिण मधून उत्तर देण्याच ठरलेलं. पुन्हा मिटींग पुन्हा बैठका पुन्हा सभांच सत्र सुरू झालं. आई आणि वडिल यातलं तुम्हाला कोण आवडतं अस विचारल्यानंतर उत्तर देता येत नाही तसच इथे झालं. लोकांसाठी काहीतरी करायचं हे देखील माझं प्रेम होतं. पोटतिडकीने एखादा व्यक्ती समस्या सांगत असल्यानंतर माझी ती समस्या दूर करण्यासाठी कितीही वेळ देण्याची तयारी असायची. विधानसभेसाठी उमेदवारी ठरली आणि प्रचार सुरू झाला.

प्रचारात तिने शक्य ती मदत केली. घरी गेल्यानंतर कोल्हापूरी तांबडा पांढरा आणि जयपूरी डिश असा कॉम्बो पॅक जेवणासाठी मिळू लागला.

ठरल्याप्रमाणे विजयी झालो. आत्ता काही काळ तिच्यासाठी द्यावा असं ठरलं. पण महाविकास आघाडीच्या सरकारचे प्रयत्न सुरू झाले आणि आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांची रवानगी जयपूरला करण्यात आली. चांगली वाटणारी गोष्ट म्हणजे त्यानिमत्ताने का होईना मला सासरवाडीत रहाता आलं. महाविकास आघाडी साकार झाली आणि घरी आलो.

नेहमी माझ्यासाठी स्वयंपाक करणाऱ्या तिने अगदी खूषीत माझ्यासाठी जेवण तयार केलं होतं. आमदारकीची टर्म आणि संसाराची टर्म एकदम सुरू झाली. आपल्या लोकांना समजून घेण्याचा वर्ष म्हणून मी २०१९ या वर्षाकडे पाहतो. तिला वडापाव आवडतो मला भेळ आवडते या दोन्ही गोष्टी एकत्र खाणं हे आमचं सुख असतं. वेळ काढून आम्ही ते पुर्ण करतो. मी पॉलिटिक्समध्ये आहे आणि तिचं पॉलिटिकल सायन्स झालं आहे. तिच्या शिक्षणात “सायन्स” असल्यानेच राजकारणी व्यक्तीला समजून घेण्याची गोष्ट तिच्याकडे आली असावी.

तिच्या निस्वार्थीपणे पाठीमागे उभा राहण्याचं मला खूपदा कौतुक करू वाटतं, पण खूप गोष्टी बोलता येवू शकत नाहीत म्हणूनच या गोष्टी लिहल्या. प्रेमाच्या या दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा !!

हे ही वाच भिडू.