पहिल्याच पिक्चरमध्ये अफाट स्टारडम मिळवलेला लव्हरबॉय कुमार गौरव कुठं गायब झाला ?

बॉलिवूडमध्ये कुणीही असो तो स्टारडम कस मिळेल याचा विचार करत असतो. भरपूर काम करूनही कधी कधी स्टारडम मिळत नाही तर काहींना आयतं स्टारडम मिळालेलं असतं. पण या आयत्या स्टारडमच्या जीवावर निभावणं महाअवघड कामं. तर मेन मुद्दा आहे कुमार गौरव या बॉलिवूडच्या लव्हरबॉयचा. कुमार गौरवला लाभलेला स्टारडम त्याला पेलवता आला नाही आणि तो बॉलिवूडमधून बाहेर फेकला गेला.

वडील राजेंद्र कुमार अर्थात त्याकाळचे ज्युबली कुमार म्हणून प्रसिद्ध होते त्यामुळे कुमार गौरववर अगोदरच अपेक्षांचा बोजा होता. ज्याअर्थी राजेंद्र कुमारला सक्सेस मिळाली होती तीच सक्सेस कुमार गौरव मिळविल अशी लोकांची अपेक्षा होती पण तसं घडलं नाही. कुमार गौरव हा देखणा हिरो होता पण तो स्थिरावू शकला नाही. 

१९८१ साली ज्युबली कुमार यांनी आपल्या मुलाला लॉन्च करण्याचा प्लॅन बनवला. स्वतः राजेंद्र कुमार यांनी आपल्या प्रोडक्शनमधून लव्ह स्टोरी नावाचा सिनेमा तयार केला. हिरो होता कुमार गौरव आणि हा सिनेमा भयंकर चालला.

या सिनेमामुळे कुमार गौरव लव्हर बॉय म्हणून फेमस झाला. १९८२ साली ‘तेरी कसम नावाचा सिनेमा कुमार गौरवला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला.

या सिनेमांमुळे वाढलेलं स्टारडम आणि नवीन हिरोची आवई कुमार गौरवला प्रसिद्धीच्या शिखरावर टिकवू शकली नाही. पुढच्या हिटसाठी कुमार गौरवला भरपूर वाट पाहावी लागली. १९८५ साली महेश भट्टचा जन्म हा सिनेमा आला आणि पुन्हा एकदा कुमार गौरवाचा एरा सुरु झाला. या सिनेमामध्ये कुमार गौरवच्या अभिनयाची भरपूर चर्चा झाली होती.

१९८६ साली नाम नावाचा सिनेमा संजय दत्त, कुमार गौरव यांच्या करिअरला चार चांद लावून गेला. नाम सिनेमातलं चिठ्ठी आयी है आयी है हे गाणं भयंकर गाजलं. या सिनेमामुळे संजय दत्तचं करियर सुरळीत झालं आणि कुमार गौरव पुन्हा यशाच्या शिखरावर पोहचला. अशा एकामागोमाग एक हिट सिनेमांनंतर कुमार गौरवचा अचानक पडता काळ सुरु झाला. 

या गाजलेल्या सिनेमानंतर कुमार गौरवची बॉलिवूडमधून पीछेहाट होऊ लागली. १९९९ साली वडील राजेंद्र कुमार यांचं कॅन्सरने निधन झालं आणि कुमार गौरवच्या हक्काची एक बाजू निखळली. वडिलांच्या निधनाने अगोदर ज्या साध्या सिनेमांच्या ऑफर येत होत्या त्या ऑफरही यायच्या बंद झाल्या. हे कुमार गौरव साठी धक्कादायक होतं. 

गॅंग सिनेमात बऱ्याच काळानंतर कुमार गौरव झळकला पण यात मेन लीड तो नव्हता, नंतर २००२ च्या कांटे या सिनेमात तो दिसला. या काही फिल्म्सनंतर कुमार गौरव बॉलिवूडमधून गायब झाला. एकेकाळचा लव्हरबॉय, चॉकलेट बॉय असलेला कुमार गौरव सिनेमा मिळावा म्हणून बरीच धडपड करत राहिला पण शेवटी तो बॉलिवूडमधून गेला तो कायमचाच.

सिनेमांमध्ये न दिसणारा कुमार गौरव इतर इव्हेंटला हजर राहायचा तेव्हा त्याचे चाहते त्याला जाब विचारायचे, तेव्हा कुमार गौरवकडे उत्तर नसायचं. वडिलांच्या काळात जे स्टारडम त्याला मिळाल ते कुमार गौरवला पेलवलं नाही आणि लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षाही बऱ्याच होत्या, त्या तो पूर्ण करायला पूर्णपणे सक्षम नव्हता. 

पण कुमार गौरव हा आजही बऱ्याच लोकांचा आवड्ता अभिनेता आहे, ८०- ९० च्या दशकात अनेक फिमेल फॅन्सचा तो क्रश होता, पण कुमार गौरव बॉलिवूडमध्ये स्थिरावू शकला नाही, आज घडीला तो एक यशस्वी मर्चंट आहे तेही मीडियापासून आणि बॉलिवूडपासून लपून.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.