गरजुंसाठी मोफत कपडे देणारा लखनऊतला ‘अनोखा’ मॉल…

“हीच आमची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे…

माणसाने माणसाशी माणसासम वागणे…”

या ओळी ऐकायला फार भारी वाटतात आणि त्यांचा अर्थही सुंदर आहे. आता, माणसाने माणसाशी माणसासम वागायचं म्हणजे काय करायचं? तर, याबाबतची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. साधारणपणे प्रत्येकाशी आपुलकीने, प्रेमाने आणि आदराने वागलं पाहिजे असा काहीसा अर्थ काढता येऊ शकतो.

या ओळी खऱ्या तेव्हा वाटल्या जेव्हा माणुसकीची भिंत ही काय कॉन्सेप्ट असते हे पहिल्यांदा लक्षात आलं.

ही माणुसकीची भिंत काय असते? तर, शहरातली एखादी जागा ठरलेली असते क जिता माणुसकीची भिंत म्हणून घोषित केलेलं असतं. शक्यतो ही माणुसकीची भिंत रहदारीच्या ठिकाणी असलेली एखादी भिंत असते आणि त्या भिंतीला बरेच खिळे ठोकून ठेवलेले असतात.

या भिंतीवर असलेल्या खिळ्यांवर लोकांनी त्यांना नको असलेल्या किंवा उपयोगात नसलेल्या वस्तू आणून अडकवायच्या असतात. उपयोगाच्या नाहीत म्हणून अडकवून गेलेल्या वस्तू, कपडे हे ज्यांना हव्या असतील त्यांनी त्या घेऊन जायच्या. इतक्या साध्या पद्धतीने ही माणुसकीची भिंत काम करते.

वस्तू घेऊन गेलेल्याच्या मनात कुणाचीही मदत घेतल्याचं दडपण राहत नाही की, वस्तू ठेवलेल्याच्या मनात एखाद्यावर उपकार केल्याचा अहंकार राहत नाही.

ही जी माणुसकीची भिंत वाली कॉन्सेप्ट आहे तिच कॉन्सेप्ट घेऊन लखनऊमध्ये एक नवा उपक्रम सुरू करण्यात आला. त्याला नाव दिलं ‘अनोखा मॉल’. लखनौच्या रहीम नगर भागात हा अनोखा मॉल सुरू असतो.

अनोखा मॉल म्हणजे नक्की काय?

याचं नाव जसं अनोखा आहे. तसंच हा मॉलसुद्धा इतर मॉल्सपेक्षा अनोखा आहे. या मॉलमध्ये थंडीचे कपडे मोफत दिले जातात. हा मॉल वर्षातले फक्त ३ महिने सुरू असतो. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये सुरू असणाऱ्या या मॉलमध्ये थंडीसाठी वापरले जाणारे लोकरीचे कपडे, उबेचे कपडे हे गरजू लोकांसाठी मोफत दिले जातात.

मॉलचं काम कशाप्रकारे चालतं?

जो कुणी गरजू व्यक्ती असतील त्यांनी या मॉलमध्ये यायचं. मॉलमध्ये असलेल्या सगळ्या वस्तुंपैकी जे आवडेल ते घ्यायचं. थंडीचे कपडे, साधे कपडे इतर काही उपकरणं यापैकी जे हवं ते घ्यायचं आणि एकही रुपया न देता निघून जायचं. अशा प्रकारे या मॉलमधलं काम चालतं.

या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी या मॉलमध्ये ४ कामगार सकाळी १० वाजल्यापासूनते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम असतात.

याशिवाय, या मॉलमध्ये चप्पला, सँडल्स, बॅग्ज, शालेय सामग्री अशा गोष्टीही असतात. या सर्व वस्तू मोफत घेऊन जाता येतात.

हे सगळं सामान येतं कुठून?

आपल्याकडच्या माणुसकीची भिंतचा कॉन्सेप्ट इथं पुढे येतो. ज्या लोकांकडे लहान होणारे, जुने झालेले किंवा काही कारणाने त्यांना नको आहेत अशा प्रकारचे उबेचे कपडे, साधे कपडे, चप्पला, बॅग्ज असं साहित्य आहे त्यांच्याकडून हे सामान घेतलं जातं आणि अनोखा मॉलमध्ये ठेवलं जातं. याशिवाय या उपक्रमासाठी काही देणगीदारही आहेत.

या उपक्रमाचे व्यवस्थापन करणारे अहमद रझा खान यांनी माध्यमांना या उपक्रमाविषयी माहिती दिलीय,

“हा उपक्रम मागचे ५ वर्ष यशस्वीरित्या पार पडतोय. मागील वर्षी जवळपास ४,००० लोकांनी या मॉलमध्ये येऊन वस्तू नेल्या होत्या. सुरूवातीच्या काळात आम्हाला मॉल चालवण्यासाठी देणगीदार मिळत नव्हते, पण हळू हळू या चांगल्या कामासाठी लोक स्वत:हून मदत करायला लागले.”

याशिवाय, लोकांनी पुर्वी इथून कपडे नेऊन बाहेर मार्केटमध्ये विकले असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

या मॉलमधून मदत मिळवणाऱ्यांमध्ये रिक्षा चालक, रोजंदारीवर काम करणारे मजूर, बेघर लोक या लोकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचंही वृत्त आहे. तर, या मॉलसाठी कपडे देणाऱ्या आणि कपडे नेणाऱ्या अशा सगळ्यांचीच माहिती व्यवस्थापनाने नोंद करून ठेवली असल्याचाही दावा माध्यमांमधून करण्यात आलाय.

हा अनोखा मॉल एक उत्तम उपक्रम आहे आणि गरजू नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे असं लखनऊमधल्या नागरिकांचं म्हणणं आहे. माणुसकीची भिंत हा उपक्रम हल्ली फार दिसत नाही. पण, तशाच प्रकारचा हा अनोखा मॉल मागच्या ५ वर्षांपासून लोकांसाठी वर्षातून ३ महिने सुरू असतो…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.