महाभारताच्याही आधीपासून हा ल्युडोचा फासा गेम करतोय

तर काय म्हणतंय क्वारंटाईन? ल्युडोची सोंगटी घरात जाते की नाही? गेली काही वर्ष या गेमने मुलामुलींना बायाबाप्या अबाल वृद्धांना वेड लावलंय. कोण ऑनलाईन खेळतय. कोण पैसे लावून खेळतय. कोण क्रश कडून मुद्दाम हरतंय.

पण या गेम वर खरं राज्य करतो तो म्हणजे फासा/ ठोकळा.

हा फासा कधी आपल्या मनाप्रमाणे चालतच नाही. एक तर कधी सहा पडत नाही. आणि पडले तर सलग तीन वेळा सहा पडतात. गप्प आपल्या मूळ जागी यावे लागते.

हा एवढा छोटासा फाशाचा ठोकळा ठरवतो कोण जिंकेल आणि कोण हरेल.

या फाश्यामुळे हवालदिल झालेल्या आमच्या आदित्य बेनीचेटके नावाच्या भिडूने आम्हाला प्रश्न विचारला की

एवढा त्रास देणारा ठोकळा आला तरी कुठून?

आधी ज्यांना माहीतच नाही असं कोण असेल तर त्यांना सांगतो, फासा म्हणजे सामान्यपणे छोटासा चौरस किंवा आयताकृती ठोकळा. या ठोकळ्याच्या सहा बाजूंवर एकापासून सहापर्यंत ठिपके काढलेले असतात ते अशा रीतीने की कोणत्याही दोन विरुद्ध बाजूंवरील ठिपक्यांची बेरीज सात भरावी.

तर एवढा दिमाग लावून बनवलेला ठोकळा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.

ग्रीक इतिहासकार म्हणतात की ठोकळ्याचा शोध इसवीसनाच्या पूर्वी 1244 साली लागला म्हणजे जवळपास 3 हजार वर्षांपूर्वी. पण हे झालं तिथल्या इतिहासकारांच मत.

परंतु या काळाच्याही खूप पूर्वीपासून फाशांचा वापर होत असल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसून येते. अतिप्राचीन आदिमानवी टोळ्यांमध्ये यातुविद्येतील एक साधन म्हणून फाशांचा वापर होत असावा.

मेंढीच्या घोट्याच्या हाडांचा वापर फासे म्हणून करीत.

अनेक आदिम जमातींमध्ये फाशांचे जुगारी फाशांचे जुगारी खेळ खेळले जात. अमेरिकन इंडियन, ॲझटेक, माया, एस्किमो, आफ्रिकन जमाती इत्यादींचा उदाहरणादाखल उल्‍लेख करता येईल.

चीनमधील उत्खननात इ. स. पू. सहाव्या शतकातील फासे आढळले आहेत तर ईजिप्शियन थडग्यांमध्ये सापडलेले फासे इ. स. पू. दुसऱ्या सहस्त्रकातील आहेत.

खुद्द भारतात त्यात द्यूतक्रीडा, सोंगट्यांचे खेळ, पटावरील किंवा सारीपाटावरील खेळ प्रसिद्ध आहेत. तसेच सापशिडी, व्यापार यांसारखे घरगुती बैठे खेळ फाशांच्या साहाय्याने खेळले जातात. आर्यपूर्व सिंधू संस्कृतीत द्यूत प्रचलित असावा.

मध्यंतरी हडप्पामध्ये दगडी फासे सापडले. हे ठोकळे पाच हजार वर्षांपूर्वीचे आहेत.

वैदिक वाङ्‌मयात, विशेषतः ऋग्वेदात अक्षसूक्तामध्ये फासे आणि त्याचे खेळ यांचा उल्‍लेख आढळतो.

महाभारतातील कौरव-पांडवांच्या द्युताचा व त्यात पांडव सर्वस्व हरल्याचा संदर्भ सर्वश्रुतच आहे. यात सुद्धा शकुनी मामांनी खास बनवून आणलेल्या ठोकळ्यानी गेम केला.

हे फासे शकुनी मामा म्हणतील तसेच पडायचे. या ठोकळ्यांनी पांडवांना हरवलं.

महाभारत घडलं यालासुद्धा फासे कारणीभूत ठरले.

आचार्य शूलपाणीच्या चतुरंग दीपिका ह्या संस्कृत ग्रंथात द्यूतासंबंधी माहिती आहे. द्यूतासाठी वापरले जाणारे फासे बेहड्याचे, मातीचे, दगडाचे वा हस्तिदंताचे असत. फाशांच्या ऐवजी कधीकधी कवड्याही वापरल्या जात.

अजिंठा, वेरूळ, भाजे या लेण्यांमध्येही या फास्यानी खेळले जाणारे द्युतसारखे गेम कोरले आहेत.

हाच द्युत पुढे चौपाल म्हणून ओळखला जाऊ लागला. मुघल बादशाह अकबर सुद्धा या सोंगट्याच्या गेमचा चाहता होता.

आपल्या लहानपणापासून या ठोकळ्याने रिकामा वेळ, सुट्ट्याचा काळ सत्कारणी घालवला. भारतातल्या सापशिडीपासून ते वेगासच्या कॅसिनो पर्यंत हजारो गेम्स च भवितव्य फास्याच्या ठोकळ्याच्या हातात आहे.

आजही एकविसाव्या शतकात ल्युडोमुळे फास्याचा ठोकळा ऑनलाइन का असेना परत चर्चेत आला.

आता नशीब असलं तर तो आपल्या मनाप्रमाणे चालतो. नशीब गंडल असेल तर तो महाभारत घडवतो.

त्यामुळे भिडूनो टेन्शन घेऊ नका, या ठोकळ्याने पांडवांना सुद्धा साथ दिली नाही आपण कोण चीज आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.