दिग्विजय सिंगांनी गोव्यात ५ वर्षांपूर्वी घातलेल्या घोळाची फळ काँग्रेस आज सुद्धा भोगतीय…

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस पक्षाला राम-राम केलायं. सोबतच त्यांनी आमदारकीचा पण राजीनामा देऊ केलाय. यानंतर आज त्यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून एक पत्र लिहिलंय. यात त्यांनी काँग्रेसवर बरीच नाराजी व्यक्त केली आहे. त्याच बरोबर त्यांनी पक्षावर काही गंभीर आरोप देखील केलेत. यातील एक प्रमुख आरोप आहे तो म्हणजे,

२०१७ च्या निकालात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येऊन देखील काँग्रेसचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही. आणि याला काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह जबाबदार आहेत.

फालेरो यांच्या या गंभीर आरोपानंतर एका बाजूला गोवा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आलीय. दुसऱ्या बाजूला एकेकाळी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असलेल्या गोवा विधानसभेत आता काँग्रेसचे अवघे ४ आमदार शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे गोव्यातील सर्वात मोठा पक्ष ते सर्वात छोटा पक्ष असा प्रवास काँग्रेसने अवघ्या साडे वर्षात पूर्ण केलाय.

आणि याच खापर गोव्यातील काँग्रेसचे नेते आजही दिग्विजय सिंहांवर आणि त्यांनी घातलेल्या घोळावर फोडतात.

नेमका काय घोळ घातला होता दिग्विजय सिंग यांनी?

गोव्यात काँग्रेसची सुरुवातीपासूनच मोठी ताकद होती. १९९३ पासून ५ वर्षाचा अपवाद वगळता २०१२ पर्यंत काँग्रेस सत्तेत होती. २०१२ पासून गोव्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. त्यावेळी गोवा विधानसभेत भाजपचे २१ आमदार निवडून आले होते. तर काँग्रेसचे ९, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे ३, गोवा विकास पार्टीचे २ तर ५ आमदार अपक्ष निवडून आले होते. 

त्यानंतर विधानसभेची मुदत संपायला अडीच महिने असताना जानेवारी २०१७ मध्ये पुढची निवडणूक जाहीर झाली. त्या निवडणुकीवेळी गोवा काँग्रेसचे प्रभारी होते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह. तर भाजपचे प्रभारी होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

पुढे मार्च २०१७ मध्ये जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसने ४० पैकी सर्वाधिक १७ जागा जिंकल्या. तर १३ जागांसह भाजपची चांगलीच पीछेहाट झाली होती. याशिवाय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ३, गोवा फॉरवर्ड पार्टी ३ आणि २ अपक्षांनी विजय मिळवाल. सर्वाधिक आमदार निवडून आल्यामुळे साहजिक काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी होती.

त्यानुसार ११ मार्चला निकाल जाहीर झाल्यानंतर लुईझिन फालेरो यांच्या मते काँग्रेसला एक अपक्ष आमदारासह एकूण ४ आमदारांचा पाठिंबा होता. त्यामुळे काँग्रेसकडे बहुमताचा २१ आकडा होता. पण बहूमत असूनही दिग्विजय सिंह यांनी मला ३ दिवस राज्यपालांकडे जाण्यापासून अडवलं. तसेच आणखी ४ आमदारांच्या पाठिंब्यासाठी वाट पाहायला लावलं. 

एका बाजूला काँग्रेसवाले हातावर हात ठेऊन बसून राहिले असताना दुसऱ्या बाजूला याच ३ दिवसाच्या काळात नितीन गडकरी यांनी यशस्वीरित्या मोर्चेबांधणी करत बहुमतासाठी आवश्यक असलेले गणित जुळवले. छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची साथ भाजपला मिळाली. यानुसार २ अपक्ष तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या दोन पक्षांच्या प्रत्येकी ३ आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला.

याच छोट्या पक्षांनी त्यावेळी अट ठेवली कि केंद्रात संरक्षणमंत्री असलेल्या मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा गोव्याच्या राजकारणात येत मुख्यमंत्रीपद स्वीकारावे. भाजपने देखील हि अट मान्य केली आणि त्यानुसार मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा १४ मार्च २०१७ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अवघ्या ४ दिवसांमध्ये काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या पदरी निराशा आली. 

मात्र यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाटयावर आली होती. काँग्रेसच्या अनेक आमदारांनी या परिस्थितीसाठी दिग्विजय सिंग यांनाच जबाबदार धरले होते. गोव्यातील तत्कालीन काँग्रेसचे दिग्गज नेते विश्वजीत राणे तर स्पष्टपणे म्हणाले होते कि मला वाटत मी चुकीच्या पक्षात आहे. तर गोव्यात जनशक्तीऐवजी पैशाचा विजय झाला असं म्हणतं दिग्विजय सिंह यांनी सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याने गोव्यातील जनतेची माफी देखील मागितली होती.

मात्र त्यानंतर काँग्रेसमधील गळतीला सुरुवात झाली. मतमोजणीनंतर आमदार विश्‍वजित राणे यांनी अवघ्या ६ दिवासात काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसात दुसरा धक्का देत दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांनीही काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. 

अलीकडेच गोवा काँग्रेसला सगळ्यात मोठा धक्का बसला तो दीड वर्षांपूर्वी. एकाच वेळी तब्बल कॉंग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे गोव्यात आज भाजपचं संख्याबळ २७ वर पोहोचलं आहे. तर काँग्रेसचे अवघे ५ आमदार राहिले होते. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर लुईझिन फालेरो यांनी राजीनामा दिल्यामुळे हि संख्या केवळ ४ वर आली आहे.

त्यानंतर आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे अजूनही काही नेते राजीनामा देण्याची शक्यता असून हि संख्या अजून कमी होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे एकूणच काय तर दिग्विजय सिंगांनी ५ वर्षांपूर्वी गोव्यात घातलेल्या घोळाची फळ काँग्रेस आज सुद्धा भोगतीय असचं म्हणावं लागेल.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.