आज अडगळीत पडलेली लुना म्हणजे एकेकाळी भारतातल्या मुलींना मिळालेलं नवं पंख होतं !

आपल्या लहानपणी एक जाहिरात लागायची. सरकारी ऑफिसमध्ये कामाला असणारा एक माणूस. जो नेहमी घरी उशिरा पोहचवायचा. बायकोच लाटणं डोळ्यासमोर नाचायचं. मग त्याला एक आयडिया सुचते,

चल मेरी लुना.

अगदी स्वस्तात मिळणारी, मजबूत टिकाऊ लुना. या छोट्या बाईकने अगदी शांतपणे भारतातल्या मध्यमवर्गीय घरात प्रचंड मोठी क्रांती घडवून आणली.

सत्तरच्या दशकात 50 cc ची लुना ही गाडी भारतात आली.

पुण्याच्या फिरोदियांच्या कायनेटिक ग्रुप कंपनीने जपानच्या होंडाच्या सहकार्याने लुनाची निर्मिती केली होती. इटालीयन प्याजिओच्या चिआओ नावाच्या गाडीची ही लायसन्स कॉपी होती.

१९७२ साली ही गाडी लॉंच झाली आणि आल्या आल्या भारतभरात या गाडीची हवा सुरू झाली.

वजनाला अगदी हलकी, छोटी सुटसुटीत बाईक सायकलला एक उत्तम पर्याय होती. पुण्यासारख्या सायकलींच्या शहरात तयार होणाऱ्या लुनाने झटक्यात मार्केट मारले. कित्येकांनी ही गाडी बुक केली.

सुरवातीला अनेकांना शंका होती की,

भारतात अनेक ठिकाणी रस्ते कच्चे आहेत तर ही गाडी तिथे कशी टिकेल?

पण फक्त पुण्यातच नाही, मुंबई, दिल्ली, बेंगलोर, कलकत्ता पासून चंदीगड, पटना, अहमदाबाद अशा शहरांमध्ये देखील लुनाच्या बुकिंग साठी नंबर लागत होते.

यासाठी फिरोदियानी केलेली लुनाची पब्लिसिटी देखील तितकीच कारणीभूत ठरली.

टीव्ही वर्तमानपत्रात याच्या जाहिराती झळकू लागल्या. तरुणांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेटच्या सामन्यावेळी मॅन ऑफ द मॅच म्हणून ही लुना बक्षीस दिली जाऊ लागली.

फोर्स मोटर्सचे चेअरमन अरुण फिरोदिया यांना आठवते त्या प्रमाणे फेमस क्रिकेटर संदीप पाटील, चंद्रशेखर यांनी ही लुना जिंकली होती. दहावी बारावीच्या बोर्डात नंबर काढणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लुना बक्षीस दिली जायची.

फक्त क्रिकेटच नाही तर सिनेमामध्येही लुना झळकू लागली.

राज कपूरच्या जासुस गोपीचंद मध्ये तो लुना चालवताना दिसतो. सिनेमामध्ये आल्यापासून अनेकांनी आपल्या सायकली टाकून लुना घेतल्या.

फिरोदियांनी लुना मुलींच्यात फेमस व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले.

भारतात या पूर्वी गाड्या चालवणाऱ्या मुलींचं प्रमान अतिशय कमी होतं. खास मुलींसाठी गाड्याच नव्हत्या. मोठमोठाल्या अवजड बुलेट, स्कुटर अशा गाड्या मुलींना झेपायच्या नाहीत.

त्यामुळे सायकल सोडून पर्याय नव्हता.

हेच कारण होत की अनेक मुलींना शाळा कॉलेज घरापासून अंतर जास्त आहे या कारणामुळे सोडून द्यावं लागतं होत. नोकरी करतानाही काही लिमिटेशन असत होते.

भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी होत्या. अख्खा देश तेव्हा एक महिला चालवत होती पण सर्व सामान्य महिलांना चालवण्यासाठी गाडी नव्हती.

भारतीय मुलींना महिलांना लुनामुळे नवीन पंख मिळाले.

लुनाची जाहिरात मुद्दामहून शबाना आझमी, स्मिता पाटील अशा स्वतःची वेगळी ओळख असलेल्या अभिनेत्रींनी केली याचाही फायदा झाला.

आपल्या आईच्या वयाच्या कित्येक जणीच्या आयुष्यात चालवलेली पहिली गाडी म्हणजे लुना !

ऐंशी नव्वदच्या दशकात बँकेत नोकरीला, कॉलेजला ऐटीत लुना वरून जाणाऱ्या मुली ही त्याकाळच्या सामाजिक क्रांतीच पहिलं पाऊल होतं. मुली सुद्धा गाडी चालवू शकतात हा विश्वास लुनानेच मिळवून दिला होता.

नव्वदच्या जागतिकीकरणानंतर हळूहळू मार्केट मध्ये अनेक मोपेड आल्या. लुनानेही आपले पाच मॉडेल आणले. पण वेगाच्या स्पर्धेत ही गाडी मागे पडू लागली.

साधारण २०००च्या दशकात फिरोदियांनी लुनाने प्रोडक्शन बंद केले.

पुढे महिंद्रा आणि टिव्हीएस अशा कंपन्यांनी लुना परत आणायचा प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरला नाही.

अनेकांच पहिलं प्रेम याच गाडीवर बहरल. कित्येक घरात पहिल्या गाडीच्या पहिलेपणाच्या हळव्या आठवणी म्हणून सफलता की पहचान लुना जपून ठेवलेली आढळते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.