आर्यनच्या रेव्ह पार्टीमुळे बदनाम झालेली कोर्डेलिया क्रूझ शुद्ध शाकाहारी गरबा पार्टी करणार..!

आपल्याकडे एक म्हण आहे बघा…करून करून भागली आणि देवपूजेला लागली. असच काहीस झालंय कोर्डेलिया सोबत.

कोण ही कोर्डेलिया ? 

तर एनसीबीने शनिवारी रात्री एका क्रूझवर छापा मारला होता. त्यात स्टार अभिनेता शाहरुख खानच्या मुलासह आठ जणांना ताब्यात घेतल होतं. तीच ही हायप्रोफाईल कोर्डेलिया क्रूझ.

मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या या क्रूझमध्ये हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टी सुरू होती. एनसीबीचे अधिकारी प्रवाशांच्या रूपात क्रूझमधून प्रवास करत होते. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. क्रूझवर पार्टीला आलेल्या लोकांनी आपल्या पॅंटच्या शिलाईमध्ये, महिलांच्या पर्सच्या हँडलमध्ये, अंडवेअरच्या शिलाईच्या भागात आणि कॉलरच्या शिलाईत ड्रग्ज लपवले होते.

आता ताब्यात घेतलेल्यांचे फोटो सगळीकडे झळकायच्या ऐवजी कोर्डेलियाचेच फोटो यायला लागले. बिचारी बदनाम झाली. म्हणून तिच्या मालकाने एक निर्णय घेतलाय. ह्या क्रूझला नवरात्रीच्या मुहूर्तावर धार्मिक पर्यटनाच्या क्षेत्रात घालवण्याचा निर्णय घेतलाय.

कोर्डेलियाचे मालक कोण आहेत ? 

कोर्डेलिया क्रूझ वॉटरवेज लेझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेडची आहे. ड्रग्जच्या कारवाईसंदर्भात कोर्डेलिया क्रूझचे मालक जुर्गेन बैलोम म्हणाले, की या प्रकरणाशी  कोर्डेलिया क्रूझचा कोणताही संबंध नाही. आम्ही अशा कृत्यांचा निषेध करत असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्नशील राहू. म्हणूनच त्यांनी कोर्डेलियाला धार्मिक क्षेत्रात उतरावयच ठरवलं.

हे पर्यटन नेमकं असणार काय आहे ? 

कोर्डेलियाच्या मालकाने नवरात्री निमित्त खास टूर पॅकेजची घोषणा केलीय. त्याला खूपच मनस्ताप झाला आहे या पार्टीमुळे. त्यात आणि आता नवरात्री पण जवळ आली आहे. तोच मुहूर्त साधून त्याने धार्मिक क्षेत्रात या क्रूझला विस्थापित करायचं ठरवलं.

तुम्हाला जर या धार्मिक कोर्डेलियावर सफारीसाठी जायचं असेल तर यासाठी स्पेशल पॅकेज आहे 

कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या पॅकेजमध्ये क्रूझवर नवरात्रीनिमित्त म्युजिक सेशन, डान्स आणि स्टॅण्डअप कॉमेडीचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि संपूर्ण रात्रभर पार्टी करण्याचा चान्स ही या स्पेशल पॅकेजमध्ये देण्यात येणार आहे. नऊ दिवस शाकाहारी जेवण मिळेल.

(ड्रिंक्स, चरस गांजा, ड्रग्ज, नॉनव्हेज असलं काही काही चालणार नाहीये. कोणी चोरून आणलं तर त्याला एनसीबीच्या ताब्यात देणार असल्याचं सूत्र म्हंटले आहेत.) 

कोर्डेलिया समुद्रात फिरता फिरता एका धार्मिक स्थळालाही भेट देणार आहे.

सोमनाथ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कोर्डेलियाला बंदरावर थांबवली जाणार आहे. क्रूझ कुठे कुठे थांबा घेणार आहे त्या शहरांच्या यादीमध्ये सोमनाथचं नाव आहे. विशेष म्हणजे या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये क्रूझवर पूर्णपणे शाकाहारी जेवण दिलं जाणार आहे. या क्रूझमध्ये मोठं फूड कोर्ट असून त्यात तीन स्पेशल रेस्टॉरंट आणि चार बारचा समावेश आहे.

पण हे धार्मिक पॅकेज पण इतकं महाग आहे की, सर्वसामान्यांना हे परवडणार नाही.

या क्रुझवर एक फिटनेस सेंटर आहे. त्यासोबतच स्पा, सलून याचीही यात सुविधा देण्यात आली आहे. यासोबत या क्रूझमध्ये एक कसिनो आणि थिएटरही आहे. तसेच मोठा स्विमिंगपूल, नाईटक्लब, लाईव्ह बँड, डिजे यासारख्या सुसज्ज सुविधाही यात देण्यात आल्या आहे.

भाडं किती ?

या क्रूझवर इतक्या सुविधा दिल्या गेल्या असल्यामुळेच त्याचे पॅकेज महाग आहे. कॉर्डेलिया क्रूझचे टूर पॅकेज १७,७०० पासून सुरू होते. हा दर केवळ एका रात्रीसाठी आहे. कॉर्डेलिया क्रूझचे दोन रात्रीचे दोन जणांसाठीचे मुंबई ते गोवा टूर पॅकेज ५३,१०० रुपये आहे. तर, दोन जणांसाठी दोन रात्रीचे हाय सी पॅकेज ३५,४०० रुपये आहे.

जस आपण नशेडी माणसांना सुधारण्याची संधी देतो अगदी तसंच कॉर्डेलियाला पण द्यायला पाहिजे. शेवटी किती ही म्हंटल तरी ती निर्जीवच वस्तू.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.