एकविसाव्या शतकाची भाषा जाणणारा गीतकार.

भारतीय चित्रपटाने ९०च्या दशकानंतर कात टाकली. तशीच फिल्म संगीतानेही कात टाकली. २००० साल उजाडले तेच मोबाईल आणि कंप्युटर चे युग घेऊन. युवा पिढीच्या नव्या आकांक्षा नव्या गरजा होत्या. जागतिकीकरणाची फळे चाखू लागलेला तरुण जुन्या टिपिकल गाण्यामध्ये अडकून पडणारा नव्हता. ए.आर. रेहमान मुळे भारतीय चित्रपट संगीताला नवे वळण मिळाले. पण चित्रपटगीतांचे काय?

त्या काळात गीतकार समीर राज्य करायचा. मागणी पुरवठा नियमाप्रमाणे फॅक्टरी मधून प्रोडक्ट बाहेर पडावे तशी सपासप गाणी त्याच्या ‘फॅक्टरी’ मधून बाहेर पडत होती. टॅलेंट असूनही म्हणावी तशी भारी गाणी त्याच्याकडून लिहिणे बंद झाले होते.किती काळ आपण साहीरच्या, शैलेन्द्रच्या आठवणी जागवायच्या? मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी ह्यांचा काळ संपला होता. जरी गुलजार आणि जावेद अख्तरनी नव्या काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून घेतले असले तरी कधी ना कधी त्यांच्या पुढे जावेच लागणार होते.

अशा वेळी आगमन झालं प्रसून जोशीचं. मिलेनीयल पिढीच्या भावना आपल्या शब्दात मांडू शकणारा कवी ,गीतकार.

प्रसून जोशी मुळचा उत्तराखंडचा.वडिलांच्या फिरतीच्या सरकारी नोकरीमुळे प्रसून जोशीचं बालपण अल्मोडा, नैनिताल, डेहराडून अशा निसर्गरम्य शहरात गेलं. अशा गावात वाढल्यावर गाण्यांमध्ये ही अकृत्रिम सौंदर्य येणारच. प्रसूनची आई आकाशवाणी वर गाणारी शास्त्रीय संगीत गायिका. त्यामुळे सुरांचे बाळकडू त्याला घरूनच मिळाले. मैदानात खेळण्याच्या वयात त्याला शब्दांशी खेळण्याचा नाद लागला. शाळेतल्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटेशन मध्ये जेव्हा बाकीची मुले आर्मीचा जवान, डॉक्टर, पोलीस यांच्या वेशात आली होती तेव्हा छोटा प्रसून हा एका कवीच्या वेशात आला होता. एवढेच नाही तर त्याने त्या कवीची  ‘आंसू’  ही कवितासुद्धा स्टेजवर सादर केली.

घरातूनही त्याच्या कलेला उत्तेजन मिळालं. अवघ्या १७व्या वर्षी त्याचं “मै और वो” पहिलं पुस्तक प्रकाशित झाले.

आई वडिलांच्या इच्छे खातर त्यानं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं पण टिपिकल मॅनेजरच्या नोकरी मागे तो गेला नाही. आपल्या लेखणीच्या कौशल्याला वाव मिळेल अशा नोकरीचा शोध घेतला. दिल्लीमध्ये ‘ओग्लिवी अँड मॅदर’ या प्रतिष्ठित जाहिरात एजन्सी मध्ये त्याला नोकरी मिळाली. काव्यप्रतिभेचा वापर करून त्याने एका पेक्षा एक जबरदस्त अॅड बनवले. ठंडा मतलब कोका कोला ही कोक ची जाहिरात तुफान गाजली. या जाहिरातीला आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील बक्षिसे मिळाली.

हे ही वाच भिडू –  

हे यश मिळतच होतं पण तो त्याचं पहिलं प्रेम विसरू शकत नव्हता. ते म्हणजे सिनेगीत.

१९९९ साली खूप स्ट्रगलनंतर त्याला अखेर शंकर एहसान लॉय यांच संगीत असलेल्या भोपाल एक्सप्रेस मध्ये ब्रेक मिळाला. यातील त्याची गाणी दुर्लक्षित राहिली. मात्र राजकुमार संतोषीच्या लज्जा चित्रपटातल्या “कौन डगर कौन शहर” या गीतामुळे रसिकांचे लक्ष प्रसून जोशीकडे वेधले गेलं. त्याला खरे यश यशराज बॅनर च्या ‘हम तुम’ या चित्रपटाने मिळवून दिलं . यातलं “सांसो को सांसो मे ढलने दो जरा”  हे टायटल सॉंग विशेष गाजलं.

मग आला रंग दे बसंती.

या चित्रपटातली फक्त गाणीच नाही तर डायलॉग सुद्धा प्रसून ने लिहिले आहे . “अपनी तो पाठशाला” हे गाणं तर नव्या पिढीच अँथम सॉंग बनलं. ” खलबली” असो “तू बिन बताये” असो “खून चला” असो अथवा “लुक्का छुपी ” असो प्रसूनने त्याच्या अष्टपैलुत्वाचे दर्शन  घडवले. रेहमानच्या अवीट संगीताला प्रसून ने साज चढवला. टायटल सॉंग ने तर धुमाकूळ घातला. २००६ साल प्रसून जोशी साठी महत्वाच ठरलं. रंग दे बसंती च्या “रूबरू” आणि फना चित्रपटातल्या “चांद सिफारिश” गाण्यासाठी प्रसून ला  फिल्मफेअर मिळालं. तसेच त्या वर्षीचे डायलॉग चे फिल्मफेअर सुद्धा त्यालाच होतं.

तारे जमीन पर मधल्या गाण्यांनी तर त्याला नॅशनल अवार्ड आणि फिल्मफेअर दोन्ही मिळवून दिला. आजही “तुझे सब है पता है ना माँ ” हे गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी उभं राहत.

गजनी, दिल्ली ६ ,भाग मिल्खा भाग अशा चित्रपटातून त्याचा आलेख चढताच राहिला आहे. अनेक अवाॅर्ड्स त्याच्या नावावर आहेत. त्याला २०१५ साली भारत सरकारने पद्मश्रीसुद्धा जाहीर केला . आज सेन्सॉर बोर्ड च्या चेअरमन पदी तो आहे.

4 14
प्रसून जोशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते पद्मश्री स्वीकारताना

या सगळ्या मानसन्माना पेक्षाही त्याने नवीन पिढीच्या गीतकारांना रसिकांच्यात आदराच मिळवून दिलं हा त्याच्या साठी मोठा सन्मान आहे. आज इर्शाद कमिल, वरून ग्रोवर, अमिताभ भट्टाचार्य हे गीतकार त्या बद्दल त्याचे ऋणी असतील.

हे ही वाच भिडू – 

 

Leave A Reply

Your email address will not be published.